

भिगवण : युनेस्कोचे स्थलांतरित पक्ष्यांचे जागतिक वारसास्थळ असलेले राजस्थानमधील भरतपूर जसे धोक्यात आले तशीच काहीशी वाटचाल उजनीची होत असल्याचा धोक्याचा इशारा बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ उन्मेष काटवटे यांनी दिला आहे.
उजनीसह भीमेच्या वरील व खालील बाजूने खदरा, कोयरा, तांबऱ्या, नकटा यासह इतरही माश्यांच्या प्रजाती पूर्णपणे नष्ट व काही दुर्मीळ झाल्या आहेत. विशेषतः छोटे मासे नष्ट झाले तर मोठे मासे जगुच शकत नाहीत, लहान माश्यामुळेच उजनीला पक्षीवैभव लाभले आहे. त्यामुळे लहान मासे व देशी प्रजातींच्या माश्यांचे संरक्षण झाले पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.
मागील 15 वर्षात उजनीत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या वतीने देशी व प्रमुख कार्प जातींच्या माश्यांचे संवर्धन केले जाणार आहे, त्यासाठी स्थानिक मच्छिमार तसेच मत्स्यव्यवसाय विभाग, जलसंपदा व इतर विभागांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. मंगळवार (दि. 9) व बुधवारी (दि. 10) भिगवण येथील एका हॉटेलमध्ये दोनदिवसीय कार्यशाळा झाली. त्यावेळी काटवटे व त्यांच्या सहकारी टीमने चार महिन्यात केलेल्या अभ्यासातून ही धक्कादायक माहिती उपस्थितांना दिली.
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी व सिप्ला कंपनीच्या वतीने उजनीतील नष्ट झालेल्या देशी माश्यांचे वैभव परत मिळवण्यासाठी दीर्घकालीन कामाचे नियोजन करण्यात आले आहे. उजनीतून ज्या माश्यांच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत त्या कोयना, वेरणा, गंगा, कृष्णा व तिच्या उपनदीतून या जाती शोधून आणण्यात येणार आहेत. त्यातील अनेक प्रजाती मिळवून त्यांची पैदास (प्रजनन) करण्यावर भर देण्यात येणार आहे. खदऱ्या माश्यांचे बीज हे टाटा कंपनीकडून खरेदी करण्यात येणार आहे. 1839 विल्यम हेंन्द्री या शास्त्रज्ञाने पूर्वजांना भेटून अनेक माश्यांच्या जातींच्या नोंदी ठेवल्याने याचा फायदा माश्यांच्या जाती ओळखण्यासाठी होत आहे; अन्यथा कोणत्या प्रजाती नष्ट झाल्या हे आज कोणाला सांगता आले नसते, असेही काटवटे यांनी सांगितले.
सिप्ला फाउंडेशनचे अध्यक्ष अनुराग मिश्रा म्हणाले, उजनीत जलसंर्वधन व देशी प्रजाती तसेच प्रवासी पक्ष्यांना लागणारे लहान मासे पुनर्स्थापना करण्यावर भर दिला जाणार आहे.
याप्रसंगी सिप्ला फाउंडेशनचे प्रमुख अनुराग मिश्रा, कुरकुंभ सिप्ला कंपनीचे साइटप्रमुख अमोल सरमंडल, साइट एचआरप्रमुख नरेंद्र सिंग, सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त अर्चना शिंदे तसेच दीपाली गुंड, रिपाइं जिल्हाध्यक्ष विक्रम शेलार, अनिल नगरे आदी उपस्थित होते. वैष्णवी पाटील हिने सूत्रसंचलन व प्रास्ताविक केले.
उजनीतील लहान माश्यांच्या जाती या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महत्त्वाच्या आहेत, परंतु चाची, आमळी, फेक, मुनिया अश्या विविध जाती संपुष्टात येऊ लागल्याने पक्षीवैभवाला व मोठ्या माश्यांनाही मोठा धोका निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. यातून भविष्यात रोजगारावर याचा गंभीर धोका निर्माण होण्याची भीती उन्मेष काटवटे यांनी व्यक्त केली आहे.