

सासवड : गेल्या 10 दिवसांपासून वाढत चाललेल्या थंडीच्या कडाक्यामुळे तसेच अचानक झालेल्या ढगाळ वातावरणामुळे पुरंदर तालुक्यातील अंजीर, पेरू आणि डाळिंबबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. फळबागांचे अर्थकारण पूर्णपणे ढासळले असून, शेतकऱ्यांवर पुन्हा आर्थिक संकट कोसळले आहे.
सोनोरी, दिवे, काळेवाडी, गुरोळी, राजेवाडी, वाघापूर, सुपे खुर्द, वनपुरी, आंबळे या भागांत अंजीर उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. तालुक्यात एकूण 452 हेक्टर क्षेत्रावर अंजीर लागवड आहे. परंतु वाढत्या थंडीमुळे अंजीर तडकणे, फळकूज, तांबेरा यांसारखे रोग वाढले आहेत. लाल कोळी, मावा, तुडतुडे यांचा प्रादुर्भावही वाढला आहे. त्यामुळे कीटकनाशकांच्या फवारणीचाही खर्च वाढला आहे.
खरीप हंगामात अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाल्यानंतर आता रब्बी हंगामात थंडी व ढगाळ वातावरणाने पिकांची अवस्था दयनीय केली आहे. मागील आठवड्यापासून हवामानात सातत्याने बदल होत असून, त्याचा पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. अनेक फळबागांमध्ये किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे.
विशेषतः अंजीर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. वाढती थंडी आणि आर्द्रता यामुळे फळे पिवळी पडून गळू लागली आहेत, तसेच अंजीर जागेवरच उकलू लागल्याने मालाची गुणवत्ता आणि बाजारमूल्य मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे अनेक उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत.
पुरंदर तालुक्यात 452 हेक्टरवर अंजीर लागवड आहे. सध्या थंडी आणि ढगाळ वातावरणाचा मोठा परिणाम दिसत असल्याने शेतकऱ्यांनी तातडीने बुरशीनाशक फवारणी करावी. अंजीर उकलणे रोकण्यासाठी प्रतिलिटर पाण्यात 1.5 ग््रॉम बोरॉन आणि 5 ग््रॉम कॅल्शिअम नायट्रेट मिसळून फवारणी करणे आवश्यक आहे.
श्रीधर चव्हाण, कृषी अधिकारी, पुरंदर