प्रभाग क्रमांक : 23 रविवार पेठ-नाना पेठ
गणेश खळदकर
शहराच्या मध्यवर्ती भागातील नागरिकांचा सवाल; वाहतूक कोंडी, कचरा, पाण्यासह विविध समस्या शनिवारवाड्याजवळील लालमहालाच्या कॉर्नरपासून सुरू होणाऱ्या या प्रभागात एकूण सहा पेठांचा समावेश आहे. यात नाना पेठ, रविवार पेठ, बुधवार पेठ, गणेश पेठ, भवानी पेठ आणि शुक्रवार पेठेतील एका गल्लीचा समावेश आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागात हा प्रभाग आहे. पूर्वीच्या प्रभाग क्रमांक 17 मधील 52 हजार नागरिकांचा या प्रभागात समावेश आहे. तसेच प्रभाग क्रमांक 20मधील 28 हजार नागरिक आणि रास्ता पेठ, गणेश पेठेतील 22 हजार नागरिकांचा देखील या प्रभागात समावेश आहे. त्यामुळे पेठांनी गजबजलेल्या दाट लोकवस्तीचा भाग या प्रभागात येते असल्यामुळे नागरी समस्या देखील मोठ्या प्रमाणात आहेत.
शहरातील मुख्य रस्ता असलेल्या शिवाजी रस्त्याला सोन्या मारुती चौक ते कस्तुरे चौकादरम्यानच्या रस्ता पर्यायी मार्ग आहे. या रस्त्यावर कायमच वाहतूक कोंडी होत असल्याने आहे. त्यातच अरुंद असलेल्या या रस्त्यावर व्यावसायिक आणि ग््रााहकांच्या वाहनांचे पार्किंग केले जात असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव असल्याने महिला आणि नागरिकांची कुंचबना होत आहे. या प्रभागात लहान मुलांसाठी उद्यान आणि मैदानाचा अभाव आहे. ठिकठिकाणी कचरा साचत असल्याने दुर्गंधी पसरत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. काही भागात अनियमित आणि कामी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील विविध समस्या आणि प्रश्नांकडे माजी नगरसेवक आणि महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. नगरसेवक निवडून येण्यापूर्वी प्रभागातील समस्या सोडवविण्याचे आश्वासन देतात. मात्र, नंतर त्यांना या आश्वासनाचा विसर पडत आहे. परिणामी गेल्या काही वर्षांत मूलभूत सुविधांची प्रभागात वाणवा असून, विविध प्रश्नही ’जैसे थे’ असल्याचे नागरिकांनी सांगितले.
आगामी निवडणुकीत निवडून येणाऱ्या नगरसेवकांनी प्रभागातील विविध समस्या, प्रश्नांचा अभ्यास करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी तज्ज्ञांशी चर्चा करावी आणि प्रभागाचा विकास आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
बुधवार चौक, पासोड्या विठोबा मंदिर, शुक्रवार पेठ पोलिस चौकी, रांका ज्वेलर्स चौक, कस्तुरी चौक, स्वामी समर्थ मंदिर, जय महाराष्ट्र मंडळ, रामोशी गेट, भवानी माता मंदिर, नागझरी नाला, बाबाजान दर्गाचौक, पदमजी पोलिस चौकी, महात्मा फुले शाळा, क्वार्टरगेट चौक, अरुणा चौक, डुल्या मारुती चौक, दारूवाला पूल चौक, फडके हौद चौक, लालमहाल चौक या भागांचा या प्रभागात समावेश आहे.
अरुंद रस्ते, पार्किंमुळे होणारी वाहतूक कोंडी
कचरा संकलनाबाबत महापालिका प्रशासनाची उदासीनता
पेठांमधील रस्त्यांवर होणारे अनधिकृत पार्किंग
सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव
युवा आणि महिलांसाठी व्यवसाय केंद्र नाहीत
लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान नाही
ताराचंद हॉस्पिटलसमोर ओपन जीम
काही रस्त्यांचे सिंमेट क्राँक्रिटीकरण
स्वामी समर्थ उद्यानामध्ये पुरुषांसाठी जीम
दुधभट्टी विकसित करण्यात आली
डुल्या मारुती चौकात उभारला महाराणा प्रतापांचा पुतळा
उतारा चौकाचे सुशोभीकरण
माननीयांना द्यावीत या प्रश्नांची उत्तरे
रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची समस्या का सुटली नाही?
पाणीपुरवठा, कचरा, ड्रेनेजची समस्या कधी सुटणार?
लहान मुलांना उद्याने, खेळाची मैदाने आजपर्यंत का मिळाली नाही?
आरक्षित जागांचा अद्याप विकास का झाला नाही?
काही भागातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित का?
मी माझ्या कार्यकाळात प्रभागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला. प्रभागात जलवाहिन्या, ड्रेनेजलाइन, रस्ते आदींसह विविध विकासकामे केली आहेत. मात्र, महापालिकेतील विरोधी बाकावर असल्याने अपेक्षित निधी न मिळाल्याने विकासकामे करताना मर्यादा आल्या आहेत. मात्र, पुढील काळात प्रभागाचा परिपूर्ण विकास करण्यावर भर देणार आहे.विशाल धनवडे, माजी नगरसेवक
प्रभागात वाहतूक कोडींची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नाना पेठेत दुचाकी वाहनांचा मोठा बाजार असल्याने या ठिकाणी नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे परिसरातील रस्त्यांवर कायमच वाहतूक कोंडी होत आहे. काही ठिकाणी रस्त्यांवरच दुचाकी वाहनांची दुरूस्ती केली जात असल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना होणे गरजेचे आहे.विशाल अडागळे, रहिवासी
प्रभागात गेल्या अनेक वर्षांपासून महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव आहे. लहान मुलांना खेळायला मैदान आणि नागरिकांना फिरण्यासाठी उद्यानाची देखील कमतरता आहे. महापालिका प्रशासनाने आरक्षित जागा ताब्यात घेऊन त्यांचा त्यांचा जलहितासाठी उपयोग करणे गरजेचे आहे.सुलोचना पवार, रहिवासी
प्रभागातील काही सोसायट्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांची सध्या मोठी दुरवस्था झाली आहे. महापालिका प्रशासनाने या रस्त्यांची दुरूस्ती करून नागरिकांची गैरसोय दूर करावी.रोहन मांढरे, रहिवासी
प्रभागातील क्वार्टरगेट चौक आणि लालमहल चौकात नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने या भागात पार्किंग स्पॉट तयार करण्याची मागणी आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहोत. परंतु वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याबाबत प्रशासन मात्र उदासीन आहे.सुरेखा साठे, रहिवासी
नाना पेठेत वाटेल तेथे दुचाकी वाहनांची दुरूस्ती केली जात आहे. तसेच रस्त्यांवर अनधिकृत वाहनांचे पार्किंग केले जात असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी परिसरात एकाच छताखाली टू व्हिलर आणि फोरव्हीलर हब होणे गरजचे आहे.गणेश आवटे, रहिवासी, नाना पेठ परिसर