

सुनील माळी
देशपातळीवरील राजकारण-समाजकारण गाजवणाऱ्या विविध दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या पायधुळीने आणि नुसत्या पायधुळीने नव्हे तर त्यांच्या बहुमूल्य अशा कामगिरीने पुणे पालिकेचा इतिहास संपन्न झाला आहे. लोकमान्य टिळक, महात्मा फुले, नामदार गोपाळ कृष्ण गोखले आदी मान्यवरांच्या मांदियाळीतील आणखी एक लखलखते नाव आहे साहित्यसमाट न. चिं. केळकर... अर्थात निवडणुकीबाबतच्या या सदरात त्यांच्या निवडणुकींच्या आठवणींना उजाळा देताना दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या निवडणुकांतही आतासारख्याच होणाऱ्या गमतीजमती जशा सांगितल्या तशाच केळकर यांच्याबाबतचे गमतीदार प्रसंगही ऐकण्यासारखे आहेत.
लोकमान्य टिळक यांच्याप्रमाणेच केळकर हेही सर्वसाधारण गटातून निवडून न येता प्राप्तिकर देणाऱ्या नागरिकांच्या गटातून प्रथम निवडून आले. अशा वेगवेगळ्या गटांतून उमेदवार निवडून येई. प्रत्येक प्रौढाला मतदानाचा अधिकार म्हणजेच ‘एक व्यक्ती एक मत’ असे तत्त्व त्यावेळी नव्हते. प्रत्येकाला मताचा अधिकार असला पाहिजे, असे आता ठामपणाने मांडले जाते, पण विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात यावर गणपतराव नलावडे यांनी केलेली टिप्पणी वेगळेच सांगून जाते. त्यांनी पालिकेच्या आठवणी लिहिताना म्हटले आहे... ‘या उमेदवारांत शहरातील व्यापारी, वकील, डॉक्टर, सार्वजनिक क्षेत्रांत वरचे स्थान असलेली मंडळी उभी राहात. प्रतिनिधित्व अनेक प्रकारांत विभागले होते. म्युनिसिपल कर भरणारे, प्राप्तीवर कर भरणारे, शैक्षणिक पदवी असलेले, सरकारी नोकरीत असलेले अशा प्रकारचे मतदारसंघ पूर्वी होते. आताच्या प्रमाणे मिशी फुटलेली मते असा प्रकार नव्हता...’ या लिखाणाचा अर्थ म्हणजे वयाने प्रौढ झाला की लायक मतदार झाला असा होत नाही, असा घ्यायचा का ? तो अर्थ काहीही असला तरी प्राप्तिकर देणाऱ्यांच्या गटातून केळकर यांनी निवडणूक लढवली तेव्हा त्यांच्या विरोधात नगरशेठ खूपचंद परशराम उभे होते.
प्राप्तिकर भरणाऱ्यांमध्ये घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणावर होते. त्या बळावर खूपचंद यांच्या विजयाची निश्चिती होती. अर्थात केळकर हे टिळकांचे निष्ठावान अनुयायी असल्याने त्यांच्याबाबतही व्यापाऱ्यांना आदर होता. खूपचंद निवडून येणार, पण केळकर आले पाहिजेत, असे वाटणाऱ्यांची संख्या खूप होती. शेठच्या कार्यकर्त्यांच्या मोटारीतून मतदार येत होते, मात्र वाहन नसलेले केळकर यांचे अनेक मतदार पायी येऊन मत देत होते. फुले मंडईतील मतदान केंद्रावर दुपारी खूपचंद खूपच पुढे गेल्याची हवा पसरली. शेठजी मनाने मोकळे असल्याने त्यांनी ‘मला भरपूर मते देऊन झाली आता (थोडीतरी) केळकरांना द्या’, असे सांगायला सुरुवात केली. खूपचंद यांना विजयाचा पूर्ण विश्वास होता..., पण मतमोजणी झाली आणि... केळकर प्रचंड मतांनी विजयी झाले... त्यानंतर अनेक वर्षे ‘फार घमेंडीत राहू नका... तुमचा खूपचंद होईल...’ असे म्हटले जाई...
... केळकर यांच्याबाबत केवळ नगरपालिकेच्या निवडणुकीमध्येच चटकदार प्रसंग घडले नाहीत तर त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतही घडले. केळकर नगरपालिकेचे पहिले लोकनियुक्त अध्यक्ष 1918 मध्ये झाले. नगरपालिकेच्या स्थापनेनंतर 1882 पर्यंत सर्व सरकारनियुक्त सदस्य होते, त्यानंतर लॉर्ड रिपनच्या सुधारणेनंतर काही लोकनियुक्त सदस्यही नेमले जाऊ लागले. नगरपालिकेचे अध्यक्ष मात्र सुरुवातीला जिल्हाधिकारी हे असत आणि 1882 पासून अध्यक्षपदी सरकारनियुक्त सदस्यालाही नेमले जाऊ लागले. लोकांच्या हाती कारभार देण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून 1918 पासून प्रथमच मतदारांनी निवडणुकीने निवडलेला अध्यक्ष नेमला जाऊ लागला. पुण्याचे पहिले निवडून आलेले अध्यक्ष होण्याचा मान केळकर यांना मिळाला. या निवडणुकीत केळकर निश्चित निवडून यावेत, यासाठी सध्याच्या निवडणुकीत जसे डावपेच रचले जातात, तसेच रचण्यात आलेले डावपेच पाहिले की आश्चर्य वाटते. केळकर यांच्याविरोधात अध्यक्षपदाची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला मत देण्याची शक्यता असलेले पुण्यातील एक बॅरिस्टर होते. त्यांना कसे थोपवता येईल? यावर केळकर गटात खल झाला.
शेवटी एकाने शक्कल लढवली. विरोधी मत देणार असलेल्या बॅरिस्टरसाहेबांना मोठी फी देण्यात आली आणि परगावच्या कोर्टात बाजू मांडायला नेण्यात आले. कोर्टातील कामकाज संपले की लागलीच मतदानाच्या वेळेत परत येण्याच्या बोलीवर खास मोटारीने त्यांना नेण्यात आले. खटल्याचे कामकाज संपले, बॅरिस्टर मोटारीत येऊन बसले, मोटार पुण्याकडे मतदानाला येण्यासाठी धावू लागली..., पण थोडे अंतर गेल्यावर मोटार ‘बिघडली’, तिच्यातले पेट्रोलही संपले... ड्रायव्हर पेट्रोल आणण्यासाठी डबा घेऊन गेला... तो परतला आणि त्याने संथपणाने मोटार त्यावेळच्या रे मार्केटमध्ये म्हणजे आताच्या फुले मंडईत आणली. तोपर्यंत मतदानाची वेळ संपून गेली होती... केळकर निवडून आले होते...
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतील या गमतीजमती आणि डावपेच बाजूला ठेवले तरी नगराध्यक्षपद सांभाळताना केळकर यांचे नेतृत्वगुण उठून दिसले. त्याआधी 1912 मध्ये ते उपनगराध्यक्ष झाले होते, पण नगराध्यक्षपदाचा कारभार त्यांनी अनेक वर्षे समर्थरीत्या सांभाळला. सभासदांवर त्यांचे वजन होते. लोकमान्य टिळक यांचे ते पट्टशिष्य तसेच चतुर, बुद्धिमान, मुत्सद्दी, त्यागी, निःस्वार्थी अशी त्यांची कीर्ती होती. त्यामुळे ते पुणे नगराचे अध्यक्ष असेपर्यंत दरवर्षी होणाऱ्या निवडणुकीत उपाध्यक्ष, स्थायी समिती-इतर समित्यांचे अध्यक्ष कोण असावेत ? याचा निर्णय तेच घेत. या पदांवरील व्यक्ती ठरवताना आपल्या पक्षातील सर्व सभासदांना त्यांच्या कुवतीनुसार निरनिराळ्या समित्यांत काम करण्याची संधी कशी मिळेल? याची ते दक्षता घेत असत आणि कोण कोणत्या समितीत जाणार आहे? किंवा कोणाला समितीचे अध्यक्षपद मिळणार आहे? याचा थांगपत्ता कोणालाच लागत नसे. पदांवरील नगरसेवकांची ठरलेली नावे ते सभेत वाचून दाखवत आणि त्यांच्या पक्षाचे सभासद ती मान्य करीत असत. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला घडलेल्या या घटना त्या शतकाच्या शेवटीशेवटी म्हणजे 1991 नंतरच्या खासदार सुरेश कलमाडी यांच्या नेतृत्वाच्या कालखंडाची आठवण करून देणाऱ्या आहेत... म्हणूनच आपल्या सदराचे नाव आहे... निवडणूक...कालची-आजची.