PMC Election: विरोधकांचा डाव उलटवणारा शिवा मंत्री : एका झुंजार प्रवासाची कहाणी
शिवा मंत्री
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष, कट्टर कलमाडी समर्थक अशी शिवा मंत्री यांची ओळख. ज्येष्ठ बंधू व नगरसेवक राजा मंत्री यांच्या अकाली निधनाने त्यांचा राजकारण प्रवेश झाला. परंतु, नंतर स्वकर्तृत्वावर निवडणुका जिंकून स्वतःचे राजकारणात स्वतःची ओळख निर्माण केली. दुसऱ्या निवडणुकीत त्यांनी मिळविलेल्या विक्रमी मताधिक्याची दखल खुद्द शरद पवार यांनाही घ्यावी लागली होती. या व त्यानंतरही एका ज्येष्ठ व नामवंत भाजप नगरसेवकाला पराभूत करून दाखविण्याची किमया त्यांनी साध्य करून दाखविली होती. लक्षवेधी ठरलेल्या या निवडणुकीच्या अविस्मरणीय आठवणी त्यांच्याच शब्दात...
महापालिकेची निवडणूक लढवावी लागेल, असे मला कधीच वाटले नव्हते. कारण ज्येष्ठ बंधू राजा मंत्री यांनी आपल्या कर्तृत्वाने राजकारणात व काँग्रेस पक्षातही चांगलाच दबदबा निर्माण केला होता. त्यांच्या कामामुळे दिवसेंदिवस त्यांची लोकप्रियता व पक्षातील महत्त्वही वाढत होते. परिणामी, राजकारणाशी माझा फारसा संबंध नव्हता. राजा मंत्री सांगतील ते काम करणे आणि शहीद भगतसिंग मित्रमंडळाचा कार्यकर्ता म्हणून काम करणे एवढ्यापुरते माझे समाजकार्य व राजकारण मर्यादित होते. नगरसेवक होण्यापूर्वी फार तर दोनच वेळा मी महापालिकेत गेलो असेन. घरातील तातडीच्या कामासाठी कधीतरी राजाभाऊंना (नगरसेवक राजा मंत्री) निरोप देण्यासाठी महापालिकेत गेल्याचे आठवते. तर, दुसऱ्यांदा राजाभाऊ स्थायी समितीचे अध्यक्ष झाल्यावर त्यांच्या विजयाचा गुलाल उधळण्यासाठी कार्यकर्त्यांबरोबर महापालिकेत गेलो होतो.
1992 च्या महापालिका निवडणुकीत राजाभाऊंनी दणदणीत विजयी मिळवून आपले नेतृत्त्व निर्विवाद सिद्ध केले. यातूनच 1993 मध्ये फेबुवारी महिन्यात त्यांची हत्या केली गेली. राजाभाऊंच्या निधनाने संपूर्ण मंत्री परिवार दुःखाच्या खाईत लोटला गेला. संपूर्ण परिवार भीतीच्या सावटाखाली होता. अशात एप्रिल 1993 मध्ये राजाभाऊंच्या जाण्याने रिक्त झालेल्या जागेसाठीची पोटनिवडणूक जाहीर झाली. ही जागा मंत्री परिवारापैकी कोणीतरी लढवावी, असे काँग्रेस श्रेष्ठींचे म्हणणे होते. परंतु, घरातील कोणीही त्यासाठी तयार नव्हते. अखेर काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांनी माझे नाव पुढे केले. मुळात निवडणूक लढविण्यास मी तयारच नव्हतो, घरातूनही विरोध होता. मी नाही, नाही म्हणत असतानाही काँग्रेस श्रेष्ठींनी माझी व परिवाराची समजूत काढून मला या निवडणुकीला उभे राहण्यासाठी तयार केले. परिस्थितीच अशी होती की, मला लोकांसमोर नीट बोलताही येत नव्हते, तर मी भाषण कसे करणार, असा प्रश्न होता. पण काँग्रेस नेते सुरेश कलमाडी पुढे आले. त्यांनी निवडणुकीची सारी सूत्रे हाती घेतली. अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला, अभय छाजेड, चंद्रकांत छाजेड (मामू) असे सर्व नेते पूर्ण तयारीनिशी प्रचारात उतरले. ज्येष्ठ नेते दादाराजे खर्डेकरही माझ्या प्रचारासाठी आले. या पोटनिवडणुकीसाठी भाजने माझ्याविरोधात बाळासाहेब मोकाटे यांना उमेदवारी दिली होती. सर्व वरिष्ठ नेते आणि शहीद भगतसिंग मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार करून वॉर्डात वातावरण निर्मिती केली. त्यामुळे सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन ही निवडणूक मी चांगल्या मताधिक्याने जिंकू शकलो.
मी स्पष्टवक्ता होतो, स्वभावही तापट होता. त्यामुळे तापट स्वभावाचा अशीच माझी इमेज झाली होती. त्याबाबत काही ज्येष्ठांकडूनच स्पष्ट शब्दांत माझी कानउघाडणी करण्यात आली होती. त्यामुळे मी जाणीवपूर्वक माझ्यात बदल करायला सुरुवात केली. राजाभाऊंबरोबर काम केलेले असल्याने त्यांच्या कामाची स्टाईल, त्यांची बोलण्याची पद्धत मला माहीत होती. त्यामुळे प्रयत्नपूर्वक ती मी आत्मसात करू लागलो. त्यामुळे कार्यकर्त्यांची मोठी फळी तर निर्माण झालीच पण त्याचबरोबर वॉर्डातील कामेही मार्गी लागू लागली. वॉर्डातील अनेक समस्या त्यामुळे सुटल्या व कार्यकर्त्यांच्या विविध मागण्याही पूर्ण झाल्या. त्यातूनच महापालिकेच्या 1997 च्या निवडणुकीसाठीची माझी उमेदवारी निश्चित झाली. पक्षाने मला पुन्हा एकदा संधी दिली. या वेळी शिवसेनेचे अनुभवी शिवसैनिक गजानन थरकुडे विरोधात होते. राजाभाऊंचे एकेकाळचे सहकारी, शहीद भगतसिंग मित्रमंडळाचे सचिव आणि माझे चांगले मित्र भारत जाधव यांनीही या वेळी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. पक्षातील एका ज्येष्ठानेच त्यांना माझ्याविरुद्ध उभे केल्याचे नंतर मला समजले. त्याखेरीजही चार- पाच जण रिंगणात होते.
पोटनिवडणुकीत सहानुभूतीच्या जोरावर विजयी झालो असल्याने आता माझा टिकाव लागणार नाही, असे विरोधकांना वाटत होते. किंबहुना त्यांचा प्रचाराचा रोखही तसाच होता. परंतु, दरम्यानच्या काळात राजाभाऊंप्रमाणेच काम करणारा मुलगा अशी माझी प्रतिमा निर्माण झाली होती. त्यामुळे विरोधकांच्या त्या प्रचाराकडे कोणीही लक्ष दिले नाही. परिणामी दुसरी निवडणुकही मी विक्रमी मताधिक्याने जिंकलो. त्यावेळी विक्रमी मताधिक्याने विजयी झालेल्या नगरसेवकांमध्ये माझा दुसरा क्रमांक होता. तर काँग्रेसमध्ये सर्वाधिक मतांनी विजयी होणारा मी एकमेव नगरसेवक होतो. माझ्या या पराक्रमी कामगिरीची विशेष दखल खुद्द शरद पवार यांनाही घ्यावीशी वाटली होती. त्यावेळी काँग्रेस भवनमध्ये एका जाहीर कार्यक्रमात विक्रमी मताधिक्याने विजयी होणारा नगरसेवक म्हणून त्यांनी माझा सत्कारच केला. पवार साहेबांकडून झालेला हा सत्कार माझ्या दृष्टीने लाख मोलाचा होता. माझ्या कामाला मिळालेली ही दाद माझ्यासाठी लाखमोलाची होती.
माझी तिसरी 2002 ची निवडणूक तर खूपच टफ म्हणावी अशी होती. या वेळी तीन वॉर्डांचा प्रभाग झाला होता. भाजपसाठी अनुकूल असलेल्या प्रभात रस्ता आणि लॉ कॉलेज रस्त्याच्या काही भागाचा समावेशही या प्रभागात करण्यात आला होता. प्रभागातील अ गट सर्वसाधारण महिलेसाठी तर ब व क गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला होता. त्यापैकी अ गटासाठी भाजपने राज्यसभेच्या विद्यमान खासदार प्रा. मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात काँग्रेसने देविका नडिग यांना उभे केले होते. तर ब गटात माझ्या विरोधात भाजपचे अनुभवी नगरसेवक श्याम सातपुते उभे होते. दोन विद्यमान नगरसेवकांमध्ये होत असलेल्या या लढतीकडे साऱ्या शहराचे लक्ष लागून राहिले होते. भाजपचे अनेक कार्यकर्ते व नेते मला पराभूत करण्यासाठी पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरले होते. सातपुतेंनीही आपली सर्व शक्ती व संघटन कौशल्य पणाला लावले. परंतु, त्याचवेळी शांतपणे मतदारांच्या गाठी-भेटी घेत व त्यांचा विश्वास संपादन करीत मी विरोधकांचे हे हल्ले उलटवून लावले. सुसंस्कृतपणे मतदारांना सामोरे जाण्याची माझी पद्धत अनेक कट्टर भाजप समर्थकांनाही भावली होती. घराघरांत फिरताना मला हे प्रकर्षाने जाणवले. या निवडणुकीत महिलांच्या गटात मेधा कुलकर्णी चांगल्या मताने विजयी झाल्या. त्यामुळे मतदारांचा कल भाजपकडे झुकल्याचे चित्र निर्माण झाले होते. तरीही, ब गटात मतदारांनी माझ्या बाजूने कौल दिला. श्याम सातपुते यांना तब्बल 666 मतांच्या मताधिक्याने पराभूत करत मी तिसऱ्यांदा विजयी झालो. माझ्या मनमिळाऊ कार्यपद्धतीने विरोधकांनी माझ्यासाठी रचलेला डाव त्यांच्यावरच उलटवण्यात मी यशस्वी ठरलो होतो.

