

आई अन् मामा प्रचारात उतरले परस्परांच्या विरोधात
माजी नगरसेवक, महापौर, आमदार, काँग्रेसचे शहराध्यक्ष, प्रादेशिक नगररचना मंडळाचे सदस्य, मितभाषी व निष्ठावान नेते, अशी बाळासाहेब शिवरकर यांची ओळख. वयाच्या 21 व्या वर्षीच राजकारणात त्यांचे पहिले पाऊल पडले. त्यानंतर तीन वेळा नगरसेवक, महापौर आणि तीन वेळा आमदार म्हणून त्यांनी वानवडी आणि पुणेकरांचे प्रतिनिधित्व केले. महापालिकेची पहिली निवडणूक त्यांना आपल्या सख्ख्या मामेभावाविरुद्धच लढावी लागली. या निवडणुकीच्या आठवणी त्यांच्याच शब्दात....
बाळासाहेब शिवरकर
वानवडीतील एक कार्यकर्ता म्हणून 1971 पासून माझा राजकारणाशी संबंध आला. त्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून मोहन धारिया उभे होते. वानवडी परिसरात त्यांच्या प्रचाराची जबाबदारी आम्हा तरुणांवर होती. प्रचाराची पॅम्प्लेट्स वाटणे, मतदार याद्यांनुसार स्लिपा तयार करणे आणि त्या घरोघर पोहोचविणे, पोस्टर्स चिकटविणे, अशी सारी कामे आम्ही त्यावेळी उत्साहाने केली. त्यानंतर 1972 मध्ये शिवाजीराव ढेरे यांचा प्रचारही याच पद्धतीने केला. माझ्या वडिलांनी दोन निवडणुका लढविल्या असल्याने त्याचा अनुभवही गाठीशी होताच.
अशात 1974 मध्ये महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यावेळी माझी पदवीची परीक्षा सुरू होती. उमेदवारांच्या मुलाखती ज्या दिवशी होत्या, नेमक्या त्याच दिवशी माझा पदवी परीक्षेचा पेपरही होता. परंतु, त्याला न जाता मी मुलाखतीला गेलो. वानवडी परिसरातील दीड- दोनशे कार्यकर्तेही सोबत होते. एवढी मोठी फौज पाहून मुलाखती घेणाऱ्या मोहन धारिया यांनी कार्यकर्त्यांनाच विचारले, ‘शिवरकर यांना निवडून देणार ना?’ जल्लोषात त्यांनी दिलेला होकार ऐकून माझ्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले.
आमच्या घरी एकत्र कुटुंब पद्धती होती. पण याच वेळी विरोधकांनी आमच्यातच फूट पाडण्यासाठी डाव टाकला. त्यांनी माझ्या मोठ्या मामाच्या मुलाला म्हणजे माझ्या सख्ख्या मामेभावालाच (प्रकाश जांभूळकर) माझ्याविरुद्ध अपक्ष म्हणून उभे केले. अनेक नातेवाईक व मित्रांना हे आवडले नाही. त्यामुळे तरुण कार्यकर्ते व मित्रपरिवार पाठीशी ठाम उभा राहिला अन् सर्वांनी माझा प्रचार केला. घरातील सर्वजण प्रचारात उतरले. माझी आई तर भरउन्हात डोक्यावर पदराची चुंबळ ठेवून घरोघरी जात होती. तसेच पदयात्रांमध्येही सहभागी होत होती. एकीकडे आई माझा प्रचार करत होती, तर दुसरीकडे तिचा भाऊ (माझे मोठे मामा) आपल्या मुलाचा प्रचार करत फिरत असल्याचे एक वेगळेच दृश्य या निवडणुकीत दिसून आले. उन्हातान्हात घामाघूम होऊन फिरणाऱ्या माझ्या आईची ती प्रतिमा माझ्या मनावर कायमची कोरली गेली. ही निवडणूक मी 750 मतांच्या फरकाने जिंकलो.
काँग्रेसचा नगरसेवक म्हणून वानवडी भागात मी भरपूर काम केले. गावात नळ, घराघरांत वीज व नळजोड, शाळांची उभारणी, स्वच्छतागृहांची निर्मिती, लहान मुलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, भुयारी गटारे व परिसराच्या स्वच्छतेसाठी अनेक उपक्रम राबविले. परिणामी ‘काम करणारा मुलगा’ अशी माझी प्रतिमा निर्माण झाली होती. त्यामुळे 1979 मधील महापालिका निवडणुकीत इंदिरा काँग्रेसच्या पंजाच्या चिन्हावर निवडणूक लढविताना मला फारसे कष्टही घ्यावे लागले नाहीत. लोकांनी मला भरभरून मते देत तब्बल पावणेपाच हजारांच्या मताधिक्याने विजयी केले. माझ्या विरुद्ध जनता दलाचे राम कुरे होते.
महापालिकेच्या 1984 मध्ये झालेल्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर मला महापौरपद मिळाले. 1984-85 या काळात पुण्याचा महापौर म्हणून काम करताना दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भेटीची संधी मिळाली. इंदिरा गांधी यांची ती भेट माझ्या राजकीय जीवनातील एक अविस्मरणीय अशी घटना होती. पंतप्रधानांच्या कार्यालयात दुपारी 12 वाजून 5 मिनिटांनी त्या भेटणार होत्या. त्यासाठी पावणेबारा वाजण्यापूर्वीच आम्ही तेथे पोहोचलो. सोबत नगरसेवक शरद रणपिसे, रियाझ वस्ताद व अंबादास मोरे होते. वेळ होताच धवन यांनी आम्हाला बोलावले, तसेच इंदिरा गांधी यांनाही पुण्याचे महापौर भेटीसाठी आले असल्याचे कळविले. या वेळी झालेल्या गप्पांमध्ये आमच्या अटकेची आठवणही निघाली. इंदिरा गांधी यांना अटक झाल्यानंतर त्याच्या निषेधार्थ पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करताना आम्हाला अटक झाली होती आणि त्यासाठी शिक्षाही भोगावी लागली होती. ‘आपण माझ्यासाठी अकरा दिवस कारावास भोगला, हे मला ठाऊक आहे,’ असे त्यांनी कृतज्ञतापूर्वक सांगितले.
मी महापौर असताना 1985 मध्ये दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी पुणे विमानतळावर येणार होते. महापौर म्हणून त्यांच्या स्वागतासाठी मी पुष्पहार घेऊन विमानतळावर पोहोचलो. मुख्यमंत्री वसंतदादा पाटीलही तेथे आलेेे. पण पंतप्रधानाचे स्वागत करण्याचा पहिला मान त्यांनी मला दिला. त्यांच्या या कृतीने प्रोटोकॉल म्हणजे काय असते हे तर समजलेच, पण आपला मुख्यमंत्री किती मोठ्या मनाचा आहे हे देखील कळले.
(शब्दांकन : सुनील कडूसकर)