प्रभाग क्रमांक : 29 डेक्कन-हॅप्पी कॉलनी
डेक्कन जिमखाना-हॅप्पी कॉलनी प्रभागात गेली 20 ते 25 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता असे काही प्रश्न राज्यकर्त्यांनी मार्गी लावले असले, तरी वाहतूक कोंडी, नाल्यांमधील अस्वच्छता, डुक्कर पैदास केंद्र, भटकी कुत्री, बेकायदा टपऱ्यांची अतिक्रमणे आदी समस्यांना आळा घालण्यात महापालिका प्रशासन आणि माजी नागरसेवकांना फारसे यश आलेले दिसत नाही.
सुनील कडूसकर
पुण्यातील वेगाने विकसित झालेले उपनगर म्हणजे कोथरूड. नव्वदच्या दशकात तत्कालीन राज्यकर्त्यांनी या परिसराचा नियोजनबद्ध विकास सुरू केला आणि शहरातील शनिवार, सदाशिव, नारायण या पेठांमध्ये राहणाऱ्या बहुसंख्य रहिवाशांनी कोथरूडमध्ये स्थलांतर करण्यास सुरुवात केली. गेल्या तीस-चाळीस वर्षांत या भागाचा विकास झाला, पण त्याचबरोबर येथील बकालपणाही दिवसेंदिवस वाढतच गेला. या प्रभागात पुनर्विकासासाठी सुरू झालेल्या बांधकामाचे प्रमाण मोठे आहे. अहोरात्र सुरू असलेल्या या बांधकामांमुळे रहिवाशांची झोप उडाली असली, तरी बांधकाम व्यावसायिकांना नियमानुसार वठणीवर आणण्याऐवजी प्रशासन व राज्यकर्ते त्यांचीच भलावण करण्यात धन्यता मानताना दिसतात.
मृत्युंजय मंदिराशेजारून वाहणाऱ्या नैसर्गिक नाल्यात गेल्या अनेक वर्षांपासून चक्क डुक्करपालन आणि पैदास केंद्र चालविले जात आहे. यामुळे कर्वे रस्त्यावरील पुलापासून ते पटवर्धनबागेपर्यंतच्या नाल्यात अनेक ठिकाणी डुकरांचा वावर दिसून येत आहे. नाल्यातील ड्रेनेज फोडून त्यांच्या खाद्याची सोय केली जाते. हे कमी की काय, म्हणून डुक्कर व्यावसायिक भल्या पहाटे येथील पुलांवरून हॉटेल वेस्ट नाल्यात टाकताना दिसून येतात. काही महिन्यांपूर्वी एका रहिवाशाने त्याचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला असता, या व्यावसायिकांनी मोबाईल हिसकावून घेत त्यालाच नाल्यात फेकले. याबाबत तक्रार देण्यासाठी गेल्यावर पोलिसच दबाव आणत असल्याचे रहिवाशांनी सांगितले.
हरित लवादाच्या निर्देशानुसार नैसर्गिक नाल्यातील प्रवाहात अडथळा ठरेल असे पूल वा रस्ता बांधता येत नाही. मात्र, कायद्याला बगल देत या प्रभागात नाल्यावर चक्क पूल उभारून रस्ता करण्याचा घाट घातल्याचे दिसून येत आहे. गेल्या काळात पर्यावरणप्रेमी नागरिकांनी आंदोलने करून याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याची दखल घेण्यात आली नाही. सुमारे अर्धा किलोमीटर लांबीच्या या रस्ता पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहचले असून, गेल्या तीन-चार महिन्यांपासून ते बंद असल्याचे परिसरातील रहिवाशांनी सांगितले.
खिलारे पथ, नळ स्टॉप चौक, कर्वे रस्ता, कर्वे पुतळा चौक परिसरातील पदपथांवर दररोज नवनव्या टपऱ्या उभ्या राहताना दिसतात. मध्यरात्रीनंतरही सुरू राहणाऱ्या या टपऱ्यांमुळे रहिवाशांचे जीवन त्रासदायक झाले असले, तरी राज्यकर्ते आणि प्रशासनाला त्याचे देणे-घेणे नाही. तक्रार केली की कारवाईचा फार्स केला जात असून, दुसऱ्या दिवशी पुन्हा परिस्थितीत ‘जैसे थे’ होत आहे. कर्वे रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवर नागरिकांना नेहमीच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
वाहतूक नियंत्रक दिव्यांचीही दुरवस्था झाली आहे. पुनर्विकासामुळे या भागात नागरीकरण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे पार्किंगचा प्रश्न गंभीर होत आहे. या प्रभागात महापालिकेचे एकही उद्यान, क्रीडांगण वा जलतरण तलाव नाही. बऱ्याच राखीव जागा मात्र अद्याप अविकसितच असल्याचे चित्र दिसून येत आहे. ज्या जागा विकसित करण्यात आल्या आहेत, तेथील काही भाग माननीयांच्या कार्यालयांसाठी लाटला गेल्याची कुजबुज नागरिकांमध्ये आहे. गेल्या काळात एका आरक्षित जागेवर उद्यान उभारण्याचा प्रयत्नही झाला. मात्र, कोट्यवधी रुपये खर्चून पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या नावाने विकसित केलेले हे उद्यान काही वर्षांपासून धूळ खात पडून आहे. या परिसरात सर्व सुविधायुक्त सर्वोपचार दवाखानाही नसल्याची खंत परिसरातील जाणकार व्यक्त करीत आहेत.
पीवायसी जिमखाना, हिंदू जिमखाना, गुडलक चौक, प्रभात रस्त्याचा काही भाग, विधी महाविद्यालय रस्ता, वसंतनगर, भीमनगर, शीला विहार कॉलनी, ताथवडे उद्यान, डीपी रोड, पंडित फार्म, खंडोजीबाबा चौक, गरवारे चौक, कर्वे पुतळा चौक, राहुलनगर, पिनाक सोसायटी, गोसावी वस्ती, हॅप्पी कॉलनी, डहाणूकर कॉलनी चौक, कोथरुड बस स्टॉप.
या प्रभागात गोसावी वस्ती या झोपडपट्टीचा समावेश आहे. पिनाक सोसायटी, डहाणूकर कॉलनी, सहवास सोसायटी या उच्चभ्रूंच्या सोसायट्यांनी वेढलेल्या भागात ही वस्ती आहे. एकीकडे पंचतारांकीत सुविधा असलेल्या सोसायट्या, तर दुसरीकडे कचरा, सांडपाणी आणि दुर्गंधीने वेढलेली ही वस्ती असा विरोधाभास या प्रभागात दिसून येतो. या वस्तीचे पुनर्वसन तर दूरच, पण किमान ही वस्ती स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत.
नाला स्वच्छता व डुकरांच्या निर्मूलनाकडे दुर्लक्ष
नाल्याची पडलेली भिंत बांधण्याकडे दुर्लक्ष
पुलामुळे नाल्याच्या प्रवाहाला अडथळा
नाले बंदिस्त करण्याकडे दुर्लक्ष
मूळ प्रश्नांना बगल व केवळ वरवरची मलमपट्टी
सोसायट्यांच्या पुनर्विकासामुळे समस्यांची भर
झोपडपट्टी भागात कचरा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष
पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी अनेक ठिकाणी पावसाळी वाहिन्या टाकल्या, पर्यावरण संवर्धनासाठी रस्त्यांचे काँक्रिटकरण न करता डांबरीकरण करण्यात आले
भोंडे कॉलनी, थोरात कॉलनी परिसरात मोठ्या व्यासाच्या ड्रेनेज लाइन टाकल्या
सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसविले
जागोजागी नागरिक कट्टे निर्माण केले
ठिकठिकाणी वॉकिंग ट्रॅकची सुविधा उपलब्ध
प्रधानमंत्री आयुष्यमान भारत आरोग्य योजना राबविली
मृत्युंजयेश्वर मंदिरालगत वाहणाऱ्या नाल्यावर रस्ता उभारण्याचे काम सुरू झाले आहे. सांडपाण्यावर डुक्कर पोषण केंद्र सुरू असलेल्या या नाल्यात त्यासाठी भराव टाकून पाणी अडविण्यात आले आहे. या रस्त्याचे आणि पुलाचे काम कायदेशीर की बेकायदेशीर, यापेक्षा परिसरातील नागरिकांना यामुळे दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे.अतुल जोशी, सचिव, सक्सेस स्क्वेअर सोसायटी
पंडित जितेंद्र अभिषेकी उद्यानामुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एक चांगली सुविधा उपलब्ध होईल. मात्र, या उद्यानाच्या उद्घाटनाची नागरिकांना अद्यापही प्रतीक्षा आहे. हे उद्यान लवकरात लवकर खुले होणे गरजेचे आहे.एल. व्ही. कुलकर्णी, रहिवासी
मी माझ्या दहा वर्षांच्या कार्यकाळात नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले. प्रभागात ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ला प्राधान्य देऊन शासकीय इमारतींवर देखील त्याचा अवलंब केला. बालरंजन केंद्राच्या माध्यमातून बालविकासाचे काम केले. यासह प्रभागात विविध विकासकामे केली आहेत.माधुरी सहस्रबुद्धे, माजी नगरसेविका
प्रभागात मोठ्या व्यासाच्या ड्रेनेजलाइन आणि पावसाळी वाहिन्यांची कामे मार्गी लावली आहेत. जलवाहिन्यांची गळती थांबविण्याला प्राधान्य दिले. शाळा परिसरात स्वच्छतागृहांची निर्मिती केली. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रजपूत वीटभट्टी आणि खिलारेवाडी परिसरातील रस्त्याचे रुंदीकरण केले.दीपक पोटे, माजी नगरसेवक
कचरा विलगीकरणाच्या जागेत योग केंद्र उभारले असून, या ठिकाणी योगाचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. प्रभागात दिव्यांग आधार केंद्र सुरू केले. वॉर्ड ऑफिसमध्ये हिरकणी कक्षाची निर्मिती केली. ‘मेडिकल वेस्ट’च्या संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था उभी केली. प्रभागात श्रेडिंग मशिनची उपलब्धता केली.मंजुश्री खर्डेकर, माजी नगरसेविका
सात चाळ भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविला आहे. नाल्याच्या काही भागांत मोठ्या व्यासाची (1600 मिमी) लाइन टाकली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याऐवजी डांबरीकरण करण्यावर भर दिला. तसेच प्रभागात विविध विकासकामे करण्यावर भर दिला आहे.जयंत भावे, माजी नगरसेवक