

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) उपाध्यक्ष, लेडी हवाबाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे अध्यक्ष, काँग्रेसचे व मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, लष्कर भागातील जुने कापड व्यापारी, अशी उस्मान हिरोली यांची ओळख. पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाची त्याचप्रमाणे महापालिकेचीही निवडणूक त्यांनी लढविली. या दोन्ही निवडणुका त्यांच्यासाठी संस्मरणीय आठवणींचा ठेवा आहेत. तो कसा हे त्यांच्याच शब्दांत....
माझे आजोबा हाजी अब्दुल गनी हिरोली यांनी खिलाफत आणि स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. त्यामुळे वडील हाजी कुतुबुद्दिन हिरोली हेही काँग्रेसचे काम करू लागले. साहजिकच मीही काँग्रेसच्या विचारधारेशी जोडलो गेलो. काँग्रेसचे नेते उल्हासदादा पवार त्यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष होते. 1969 च्या सुमारास मीही युवक काँग्रेसच्या पुणे कॅन्टोन्मेंटचा प्रमुख संघटक म्हणून काम करू लागलो. तडफेने काम करण्याची माझी पद्धत पाहून आमदार रामभाऊ तेलंग आणि शिवाजीराव ढेरे मला सतत प्रोत्साहन देत असत. पण एकेदिवशी, कॅन्टोन्मेंटमध्ये कामाला फारसा स्कोप नाही, असे आमदार रामभाऊ तेलंग व शिवाजीराव ढेरे यांनी मला सांगितले. त्यामुळे मी महापालिका क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला.
महापालिकेशी वा तेथे काम करणाऱ्या नगरसेवकांशी माझा फारसा संबंध नव्हता. तरीही 1992 च्या निवडणुकीत मी भवानी पेठेतील हरकानगर भागातून महापालिका लढविण्यासाठी पक्षाकडे तिकिट मागितले. त्यावेळी तेथून तेज पारवानी निवडून येत असत. पण बाळासाहेब शिवरकर, शरद रणपिसे व सुरेश कलमाडी या तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी जागा अश्रफ रामपुरी यांना द्यायची अशा वाटाघाटी केलेल्या होत्या.
याच दरम्यान, शरद पवार सर्किट हाऊसवर येणार होते. मी माझ्या मित्रांसोबत घराजवळील पानटपरीपाशी थांबलेलो असताना अमिनुद्दिन पेनवाले घाईघाईने तेथे आले आणि त्यांनी मला स्कूटरवरून सर्किटहाऊसवर सोडण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांना सर्किटहाऊसवर सोडून मी परत निघालो असताना शरद पवार सर्किटहाऊसमध्ये प्रवेश करत होते. त्यांनी मला पाहिले आणि एका पोलिस अधिकाऱ्यामार्फत निरोप पाठवून मला तातडीने भेटायला बोलाविले. ‘तू निवडणुकीला का उभा रहात नाहीस’, असा थेट प्रश्न त्यांनी मला विचारले. त्यावर ‘पक्षाने तिकिट नाकारले आहे’, असे मी उत्तर दिले. ते ऐकताच त्यांनी थेट कलमाडींना फोन लावला आणि मला तिकिट का नाकारले याबद्दल त्यांना जाबच विचारला. कलमाडी यांनी दिलेल्या उत्तरानेही त्यांचे समाधान झाले नाही. कलमाडींशी बोलताना ते म्हणाले की, उस्मानच्या वडिलांनी अनेक वर्षे अत्यंत निष्ठेने काँग्रेसचे काम केले आहे. आजवर त्यांना आपण काहीच दिलेले नाही, आता उस्मानला पुढची काही कमिटमेंट देता येईल का? अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर कलमाडी म्हणाले, ‘स्कूल बोर्डावर आपण त्यांना संधी देऊया.’ शरद पवार यांच्याकडून ही कमिटमेंट घेऊनच मी घरी पोहोचलो. तोवर घरी अनेकांचे फोन आले होते. तू साहेबांना भेटायलाच का गेलास इथंपासून ते बरे झाले त्यामुळे तुला शिक्षण मंडळ तरी मिळाले, अशी मते व्यक्त करणाऱ्यांचा समावेश होता.
परिणामी, शिक्षण मंडळाची निवडणूक लागताच मला उमेदवारी देण्यात आली. माझ्यासाठी पक्षाने 11 नगरसेवकांचा कोटा दिला गेला होता. या वेळी मतदान करताना, शांतीलाल सुरतवाला म्हणाले, ‘उस्मान तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. येथे तू भष्टाचाराला अजिबात थारा देऊ नकोस.’ माझ्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात सुरतवाला यांच्या अपेक्षांना पुरेपूर उतरण्याचा मी कसोशीने प्रयत्न केला, याचे मला विशेष समाधान आहे. गरीब मुलांच्या गणवेश व वह्या-पुस्तकातून पैसे कमविणे हे मलाही अयोग्य वाटत होते.
शिक्षण मंडळात चांगले काम केल्याने कलमाडींच्या गुड बुक्समध्ये माझा समावेश झाला. त्यामुळे 1997 च्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी मला विचारले, ‘कुठून उभे रहायचे हे तूच ठरव व मला सांग’ त्यावर फारसा विचार न करता, ‘मी सॅलिसबरी पार्क वॉर्डातून लढतो’ असे सांगून टाकले. सॅलिसबरी पार्क वॉर्डात मुस्लिम मतदार जास्त आहेत, असा माझा त्यावेळी समज होता. पण मतदार याद्या पाहिल्यावर माझी चूक मला उमगली. सुमारे 15 हजार मतदारांच्या या मतदारसंघात मुस्लिम समाजाची फक्त 580 मते होती. सर्वाधिक मते जैन व ख्रिश्चन समाजाची होती. या वेळी अजय छाजेड व चंद्रकांत छाजेड यांनी मला भरपूर मदत केली. त्यांनी जैन समाज आणि व्यापारी वर्गाला कन्व्हिन्स करून माझ्या पाठीशी उभे केले. तर, कलमाडींनी माझ्यासाठी सायरस पूनावालांना साकडे घातले. भवानी पेठेत उभारल्या जात असलेल्या जैन मंदिराबाबत भाजपचे उमेदवार श्रीकांत भडके यांची भूमिका त्या समाजाला फारशी पसंत नव्हती. त्यामुळे मला पाठिंबा जाहीर करण्यासाठी भवानी पेठेतील व्यापाऱ्यांनी प्रसिद्ध डाळमिलचे मालक बाबूशेठ पारेख यांच्या बंगल्यावर एका मेळाव्याचे आयोजन केले होते. बाबूशेठना तर माझे नावही नीट माहिती नव्हते. भाषण करताना दोन-तीन वेळा त्यांनी ‘हे हिरवानी साहेब आपले उमेदवार आहेत,’ असा उल्लेख केला. अशा विविध हितचिंतकांमुळेच या मतदारसंघात मुस्लिम समाजाची सर्वांत कमी मते असतानाही ही निवडणूक जिंकू शकलो.
नगरसेवकपदाच्या माझ्या कार्यकाळात महापालिका आयुक्त रमानाथ झा यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. स्थायी समितीच्या सुरुवातीच्या बैठकांना त्यांच्याखेरीज महापालिकेचा एकही अधिकारी उपस्थित रहात नसे. त्याबाबत त्यांना विचारले तेव्हा ते म्हणाले की, मी महापालिकेचा आयुक्त आहे. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी देऊ शकतो. त्यामुळे इतर खातेप्रमुख नसले, तरी काम अडणार नाही. दीड- दोन महिने हाच सिलसिला सुरू होता. अखेर महापौरांसोबत मी त्यांची भेट घेतली, तेव्हा त्यांच्या या कृतीचा उलगडा झाला. त्यावेळी आम्ही दिलेल्या आश्वासनानंतर पुढील बैठका नियमित सुरू झाल्या.
पुणेकरांचे हितरक्षण करणाऱ्या या अधिकाऱ्यांची शिकवण मी आजही विसरलेलो नाही. मनपा आयुक्त रत्नाकर गायकवाड यांचा सहवासही मला लाभला, त्यांच्या सहकार्यामुळेच सॅलिसबरी पार्क परिसरातील तब्बल तीन एकर परिसरात मुस्लिम समाजासाठी सर्वोत्तम दफनभूमी मला उभारता आली. आज ही दफनभूमी समाजाला उत्तम सेवा देत आहे, याचे विशेष समाधान वाटते.
(शब्दांकन : सुनील कडूसकर)