

कट्टर शिवसैनिक, माजी स्थायी समिती अध्यक्ष, महापालिकेत तब्बल 15 वर्षे गटनेते अशी रमेश बोडके यांची ओळख. शिवसैनिक म्हणून सुरू झालेल्या त्यांच्या राजकीय प्रवासात त्यांनी उपशाखा प्रमुख, विभागप्रमुख, उपशहर प्रमुख, शहरप्रमुख अशा विविध पदांवर काम करत तीन वेळा महापालिकेत शिवसेनेचे प्रतिनिधित्व केले. आपले राजकीय गुरू ॲड. नंदू घाटे यांच्याबरोबरच काँग्रेसचे नगरसेवक बुवा नलावडे यांच्याविरुद्ध लढलेल्या दोन निवडणुका त्यांच्या कायमच्या स्मरणात राहिल्या आहेत. त्याविषयीची माहिती त्यांच्याच शब्दांत...
रमेश बोडके
मीकसबा पेठेत रहात होतो. त्यावेळी शिवसेनेचे मार्मिक हे मासिक वाचनाची गोडी लागली. त्यामुळे शिवसेनेची काम करण्याची पद्धत, बाळासाहेब ठाकरे यांचे थेट विचार व धडाडी मनाला भिडत होती. त्यातूनच मी कधी शिवसेनेकडे आकर्षित झालो हे समजलेच नाही. घराजवळच तत्कालीन शिवसेना नेते ॲड. नंदू घाटे रहात होते. त्यामुळे त्यांच्याकडे जाणे-येणे सुरू झाले. आपोआपच त्यांच्यासोबत फिरू लागलो आणि हळूहळू शिवसेनेत सक्रिय होऊन चळवळीत सहभागी होऊ लागलो.
1975 पासून तर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण झाली. खुद्द बाळासाहेब ठाकरे मला रमेश म्हणून बोलावू लागले. परिणामी माझ्यावर उपशाखा प्रमुख आणि पाठोपाठ विभाग प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. जनतेचे प्रश्न, ते सोडविण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून करीत असलेली आंदोलने यामुळे मी घराघरांत पोहोचलो होतो. कार्यकर्त्यांचाही वाढता पाठिंबा मिळत होता. त्यातच 1986 मध्ये मला शहरप्रमुख पद देण्यात आले. 1986 ते 1992 या काळात शहरप्रमुख म्हणून पक्षवाढीसाठी मी लक्षणीय योगदान दिले. त्यामुळे 1992 च्या महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाने कसबा पेठेतून मला उमेदवारी दिली.
पक्षाचा हा निर्णय तत्कालीन नेते व माझे राजकीय गुरू ॲड. नंदू घाटे यांना फारसा पटला नाही. त्यामुळे त्यांनीही कसबा पेठेतूनच अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग््रेासने कसबा पेठेतील या वॉर्डातून रमेश भांड हा तुल्यबळ उमेदवार उतरविला होता. भाजप-शिवसेना युती नसल्याने भाजपने राजू कुलकर्णी यांना उमेदवारी दिली होती. ॲड. नंदू घाटे यांच्या बंडखोरीमुळे साऱ्या शहराचे लक्ष या लढतीकडे लागले होते.
माझ्या गुरुतुल्य नेत्याविरुद्धच मला निवडणूक लढवावी लागत असल्याने मोठी कठीण परिस्थिती निर्माण झाली होती. यातून मार्ग काढण्यासाठी खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनीच घाटे यांना फोन केला. त्यांनी घाटे यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, ‘नंदू आत्तापर्यंत तुम्ही चांगले काम केले. आता पक्षाने रमेशला संधी दिली आहे. त्यामुळे त्याला निवडून आणण्यातच तुमचा मोठेपणा कायम राहणार आहे.’ पण बाळासाहेबांच्या समजाविण्याचा त्यांच्यावर फारसा परिणाम झाला नाही. अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याच्या आपल्या निर्णयावर ते ठाम राहिले.
खुद्द बाळासाहेब ठाकरे बोलल्यानंतरही नंदू घाटे ऐकत नाही, हे समजल्यावर शिवसैनिकही चिडले होते. शिवसेनेच्या दृष्टीने प्रतिष्ठेची झालेल्या या निवडणुकीच्या प्रचारासाठी खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी कसबा पेठेत सभा घेतली. त्या पाठोपाठ तत्कालीन शिवसेना नेते छगन भुजबळ व दत्ताजी साळवे यांच्या सभाही झाल्या. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले. संघाशी जवळीक असलेले नेते बिंदुमाधव जोशी (नाना) हे देखील माझ्या घराजवळच रहात होते. नानांशी माझे जवळचे संबंध होते.
माझ्या कामाच्या पद्धतीवर ते खूष होते. बिंदुमाधव जोशी यांचे मित्र काका वडके (शिवसेना नेते) आणि श्रीकांत शिरोळे यांच्या युवक महामंडळाच्या माध्यमातून सामाजिक चळवळी सुरू असायच्या. अशाच चळवळींमुळे नाना माझ्या खूपच जवळ आले होते. त्यामुळे या निवडणुकीत त्यांनी मला जाहीरपणे मदत करण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर निवडणुकीसाठीचे माझे परिचय पत्रकही त्यांनी स्वतः तयार करून दिले. त्यांनी तयार केलेले हे परिचय पत्रक कसबा पेठेतील नागरिकांना खूपच आवडले होते.
कसबा पेठेतील ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात व्हावी, असा माझा प्रयत्न होता. आपल्या कोणत्याही कृतीने ॲड. नंदू घाटे दुखावले जाऊ नयेत, याची पुरेपूर खबरदारी घेण्याच्या सूचना मी शिवसैनिकांना दिल्या होत्या. त्यामुळे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर निघालेली विजयी मिरवणूक घाटे यांच्या घरावरून जाणार नाही याची खबरदारी आम्ही घेतली होती. महापालिकेत निवडून गेल्यानंतर गटनेतेपदाची जबाबदारी पक्षाने माझ्यावर सोपविली होती. तब्बल 15 वर्षे मी गटनेता म्हणून काम केले.
गटनेता म्हणून उत्तम काम करत असल्याने 1997 च्या निवडणुकीतही पक्षाने मला उमेदवारी दिली. या वेळी दोन वॉर्डांचा प्रभाग होता. या निवडणुकीचा अनुभव तर खूपच उत्साहवर्धक होता. सर्वसामान्य मतदार, वॉर्डातील ओळखीचे नागरिक स्वतः होऊन मला भेटत होते. तुम्ही सभागृहात चांगले बोलता. सर्वसामान्यांचे प्रश्न लावून धरता हे आम्हाला खूप आवडते. त्यामुळे यंदाही तुम्हीच निवडून आले पाहिजे, असे सांगून ते 100- 200 रुपये देत. मी पैसे घेण्यास नकार दिला की, ते म्हणत ‘अहो निवडणूक आहे, खर्चासाठी पैसे लागतात, राहू द्या हे’, असे सांगून पैसे ठेवून ते निघून जात.
त्यामुळे निवडणुकीतील खर्चाला आळा घालण्याचा निर्णय मी घेतला. त्यानुसार प्रचारासाठी प्रभागात माझा एकही बॅनर, पोस्टर इतकेच नव्हे तर पक्षाचा झेंडादेखील लावला नाही. माझ्या विरोधात काँग्रेसने तत्कालीन विद्यमान नगरसेवक बुवा नलावडे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे दोन विद्यमान नगरसेवकांमधील ही लक्ष्यवेधी लढत शहरात चर्चेचा विषय ठरली होती. शहराच्या विविध भागातील कार्यकर्ते व मतदार आवर्जून कसबा पेठेतील प्रचार पहायला येत असत. बुवा नलावडे हे देखील मात्तबर राजकारणी होते. त्यामुळे त्यांच्या वाटेला न जाता अतिशय शांतपणे सकारात्मक पद्धतीने आम्ही प्रचाराची सूत्रे हलविली. त्यामुळे तब्बल 700 मतांनी मी विजयी झालो.
2002 च्या निवडणुकीला सामोरे जाताना चारचा प्रभाग होता. या वेळी भाजप-सेना युती होती. आमच्या प्रभागात शिवसेनेचा प्रभाव असल्याने चारपैकी तीन जागा शिवसेनेला देण्याचा निर्णय झाला, तर एका जागा भाजपला दिली. शिवसेनेने माझ्याबरोबर विजय मारटकर, रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली, तर भाजपच्या वतीने मालती काची होत्या. या निवडणुकीतही आमचे संपूर्ण पॅनेल विजयी झाले.
(शब्दांकन : सुनील कडूसकर)