

प्रभाग क्रमांक : 15 मांजरी-केशवनगर-साडेसतरानळी
महापालिकेत समाविष्ट केलेल्या गावांतील नागरिकांची भावना विकासाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष हडपसर लगत असलेल्या मांजरी, शेवळेवाडी, केशवनगर आणि साडेसतराळी येथे पूर्वी ग्रामपंचायती होत्या. या भागात नागरीकरण झपाट्याने झाल्याने ग्रामपंचायतींच्या विकासकामांवर मर्यादा येऊन लागल्या. त्यामुळे या गावांचा महापालिकेत समावेश करण्यात आला. विकासापासून वंचित असलेल्या या भागाचा महापालिकेत आल्यानंतर तरी विकास होईल, अशी आशा या ग्रामस्थांना होती. मात्र अपेक्षित विकास अद्यापही झाला नाही. परिणामी आगीतून फुफाट्यात पडल्याची भावना या गावांतील रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.
प्रमोद गिरी, नितीन वाबळे
प्रभाग क्रमांक पंधरामध्ये मांजरी बुद्रुक, केशवनगर, साडेसतरानळी आणि शेवाळेवाडी या भागांचा समावेश आहे. या गावांमध्ये पूर्वी ग्रामपंचायती होत्या. त्या वेळी विविध राजकीय पक्षांच्या दबावाखाली या ग्रामपंचायतींचा कारभार चालत होता. नागरीकरण झपाट्याने वाढल्याने अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात होऊ लागली. नागरिकांना सोयीसुविधा पुरविण्यासह विकासकामे करताना ग्रामपंचायतींना मर्यादा येऊ लागल्या.
यामुळे या भागाचा महापालिकेत समावेश करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत होती. त्यानुसार काही वर्षांपूर्वी या गावांचा महापालिकेत समावेश करण्यात आला. मात्र, महापालिकेचेही या गावांच्या विकासाकडे दुर्लक्ष झाल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. महादेवनगर-मांजरी रस्ता, मांजरी बुद्रुक-केशवनगर रस्ता आणि मुंढवा रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मांजरी बुद्रुक-भापकरमळा रस्ता आणि मांजरी बुद्रुक-गोपाळपट्टी-दीपकनगर रस्त्याची सध्या मोठी दुरवस्था झाली आहे. ढेरे बंगला, घुलेवस्ती आणि महादेवनगर परिसरातील रस्त्यांवर अतिक्रमणे दिवसेंदिवस वाढत आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. मांजरी बुद्रुक येथील स्मशानभूमीला पूर्णवेळ रखवालदार नाही. मांजरी, केशवनगर परिसरातील अंतर्गत रस्ते, ड्रेनेजलाइनची दुरवस्था झाली आहे. तसेच परिसरातील नागरिकांना अद्यापही पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. भापकरमळा परिसरात जलवाहिन्या टाकण्यात आल्या नसल्याचे नागरिकांनी सांगितले. साडेसतरानळी परिसरातील रस्ते, पाणी यांसह विविध सुविधांचा अभाव आहे. या भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे.
आरोग्यसेवा, सार्वजनिक स्वच्छतागृह आणि कचरा व्यवस्थापन आदी सुविधांचा अभाव आहे. परिसरातील उद्यानांची दुरवस्था झाली आहे. मूलभूत सुविधांसाठी आंदोलन करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. केशवनगरचा 2017 मध्ये महापालिकेत समावेश करण्यात आला. मात्र, मागील आठ वर्षांपासून या ठिकाणी महापालिकेने एकही मोठा प्रकल्प उभारला नाही. तसेच मूलभूत सुविधा पुरविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून एक रस्ता रेणुकामाता मंदिर आणि एक रस्ता मांजरीकडे जातो. हे रस्ते अरुंद असल्याने या चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, अपघातही होत आहेत. या रस्त्यांच्या रुंदीकरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
काही ठिकाणी अद्यापही जलवाहिन्या टाकण्यात आल्या नसल्याने रहिवाशांना दररोज टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. यामुळे सोसायट्यांचे आर्थिक नियोजन कोलमडत आहे. महापालिकेला कर देऊन पिण्याचे पाणी मिळत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. शेवाळेवाडी परिसरात अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. परिसरातील नागरीकरण दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहेत. मात्र, महापालिकेकडून परिसराच्या विकासाकडे दुर्लक्ष होत आहे. या भागात पाणीपुरवठा, ड्रेनेजलाइन, रस्त्यांची दुरवस्था आदी समस्या आहेत.
केशवनगर-मांजरी या रस्त्यावर अतिक्रमणे झाल्याने वाहतूक कोंडी
अतिक्रमण झाल्याने ओढे आणि नाल्यांचे अस्तित्व धोक्यात
पिण्याच्या पाण्याचा अनियमित आणि अपुरा पुरवठा
मोठ्या सोसायट्यांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागते
अंतर्गत रस्त्यांची खड्डे पडल्यामुळे झालेली दुरवस्था
मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर पदपथांचा अभाव
केशवनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रेणुकामाता मंदिर रोड आणि मांजरी रस्त्याचे डांबरीकरण झाले
मांजरी बुद्रुक, साडेसतरानळी आणि शेवाळेवाडी परिसरात जलवाहिन्या आणि ड्रेनेज लाइन टाकल्या
केशवनगर ते मांजरी या रस्त्याच्या कडेला पथदिवे बसविले
प्रभागातील दुरवस्था झालेल्या मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती
केशवनगर येथे नदीपात्रालगतचा परिसर कचरामुक्त करण्यात आला
छत्रपती संभाजी महाराज चौक, पवारवस्ती, कुंभारवाडा, गायरान फलाटवस्ती, भोईवस्ती, गोदरेज सोसायटी, गुरुकृपा सोसायटी, हनुमाननगर, म्हसोबानगर, ससाणे कॉलनी, सिद्धिविनायक कॉलनी, फ्लोरीडा इस्टेट, शिंदेवस्ती, आनंदनगर, लोणकरवस्ती, जय महाराष्ट्र कॉलनी, झेड कॉर्नर परिसर, श्रीकृष्ण सोसायटी, घुलेनगर, गोडबोले वस्ती, म्हसोबानगर, मांजरी बुद्रुक, मांजरी फार्म, स्वोजस पॅलेस, भापकर मळा, गोपाळपट्टी, महादेवनगर, शेवाळेवाडी, साडेसतरानळी.
पुणे-सोलापूर रोडलगत शेवाळेवाडीच्या प्रवेशद्वारासमोरील ड्रेनेज लाइनची दुरवस्था झाल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. या ठिकाणी मोठ्या व्यासाची ड्रेनेज लाइन टाकणे आवश्यक आहे. शेवाळेवाडीचा महापालिकेत समावेश होऊनही ही वाहिनी अद्याप बदलण्यात आली नाही. तसेच परिसरातील ओढ्यांत ड्रेनेजचे पाणीही सोडले जात आहे. पाणीपुरवठा, कचरा, रस्त्याची दुरवस्था आदी समस्यांनाही नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. भाजीमंडई नसल्याने विक्रेत रस्त्यांवर बसत असल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे.
संदीप शेवाळे, रहिवासी
मांजरी बुद्रुक परिसरात नागरीकरण झपाट्याने वाढत असल्याने पायाभूत सुविधांवर ताण येत आहे. नागरिकांना पुरेसे पाणी मिळण्यासाठी अपूर्ण असलेल्या पाणी योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांची रखडलेली कामेही मार्गी लागणे आवश्यक आहे. पुढील 50 वर्षांच्या विकासाचे शाश्वत नियोजन करण्यासाठी प्रशासनाने स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा.
प्रवीण रणदिवे, रहिवासी
मांजरी बुद्रुक-केशवनगर रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघात होत आहेत. झेड कॉर्नर, मांजरी ते केशवनगर, मुंढवा चौकापर्यंत जायला रोज कमीत कमी दोन तासांचा कालावधी लागत आहे. मात्र, उपाययोजना करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
शैलेंद्र बेल्हेकर, रहिवासी
मांजरी बुद्रुक येथील स्मशानभूमीसाठी पूर्णवेळ सुरक्षारक्षक आणि मदतनीस नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. महापालिकेने तातडीने सुरक्षारक्षक नेमावा आणि या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.
शंकर बावकर, रहिवासी