

प्रभाग क्रमांक : 41 महंमदवाडी-उंड्री
महंमदवाडी-उंड्री या प्रभागात राजकारणात कसलेल्या शहरी आणि ग्रामीण उमेदवारांमध्ये तुल्यबळ लढत होणार आहे. प्रत्येक पक्षाकडे तुल्यबळ उमेदवार आहेत. या प्रभागात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) इच्छुकांची संख्या मोठी आहे. महायुतीच्या दृष्टीने हा प्रभाग अनुकूल दिसत असला, तरी महाआघाडीची ताकद देखील कमी नाही. आगामी निवडणुकीत या प्रभागात मोठ्या घडामोडी पाहायला मिळणार आहेत.
महापालिकेची अंतिम प्रभागरचना जाहीर झाली आहे. प्रभाग क्रमांक 41 मध्ये शहरी व ग्रामीण भागाचा समावेश आहे. या प्रभागाची लोकसंख्या जवळपास एक लाख 15 हजार इतकी आहे. महायुती आणि महाआघाडीतील घटक पक्ष एकत्रीत निवडणूक लढणार का? शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे एकत्र येणार का? याबाबत सध्या तरी संदिग्धता आहे. मात्र, सर्वच पक्षांत इच्छुकांची यादी मोठी आहे.
या प्रभागात गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण होते. त्यावेळी भाजपने दोन, शिवसेनेची एक व राष्ट्रवादी काँग्रेसने एक जागा जिंकली होती. महंमदवाडी परिसरात पहिल्यापासून शिवसेनेचे (शिंदे गट) शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांचे वर्चस्व आहे. मात्र, महापालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने या प्रभागातील चारपैकी दोन जागा जिंकल्या होत्या. पक्षाचे प्राची आल्हाट आणि संजय घुले निवडून आले होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नंदा लोणकर आणि शिवसेनेचे प्रमोद भानगिरे निवडून आले होते. या वेळीदेखील या प्रभागात ‘अ’ गट अनुसूचित जाती प्रवर्ग (महिला), ‘ब’ गट नागरिकांचा मागास प्रवर्ग, ‘क’ गट सर्वसाधारण प्रवर्ग (महिला) आणि ‘ड’ गट सर्वसाधारण प्रवर्ग, असे आरक्षण पडले आहे.
नवीन प्रभागरचनेत मुस्लिम मतांचा वाढलेला टक्का निर्णायक ठरू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेसला मानणारा वर्गही या प्रभागात आहे. यापूर्वी काँग्रेसच्या विजया वाडकर या येथून निवडून आल्या होत्या. सध्या त्या भाजपमधून इच्छुक आहेत. महायुती झाली नाही, तर या प्रभागात मित्रपक्ष आणि महाआघाडीमध्ये लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) माजी नगरसेवक फारुक इनामदार, माजी उपसभापती सचिन घुले, माजी सरपंच निवृत्ती बांदल यांच्यासह कलेश्वर घुले, मनोज घुले, सुजाता आबनावे, प्रवीण आबनावे, शिवा शेवाळे, उमेश कोंढाळकर, जयश्री पुणेकर, सुजाता हांडे, वैष्णवी सातव, रोहिणी क्षीरसागर, नवनाथ मासाळ, वसंत कड, प्रेम बांदल, मनीषा होले, अशोक न्हावले, जिजाबा बांदल, भरत झांबरे, जया धनवडे, सचिन गावडे हे इच्छुक आहेत.
भाजपकडून विजया वाडकर, संजय घुले, प्राची आल्हाट, जीवन जाधव, स्नेहल दगडे, डॉ. तेजस्विनी गोळे, अतुल तरवडे, संदीप बांदल, कांचन बांदल, राजेंद्र भिंताडे, आशिष आल्हाट, रवींद्र झांबरे, कल्पना हांडे, सचिन हांडे, स्वाती कुरणे, हनुमंत घुले, बाळा घुले पाटील, कार्तिकी घुले, दीक्षा तरवडे, शोभा लगड, ॲड.
प्रमोद सातव, अश्विनी सूर्यवंशी, योगेश सूर्यवंशी यांची नावे चर्चेत आहेत. शिवसेनेकडून (शिंदे गट) शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्वाती टकले, शैलेजा भानगिरे, सुभाष घुले, मच्छिंद्र दगडे, राकेश झांबरे, सारिका पवार, जोत्स्ना सातव, आरती आल्हाट हे इच्छुक आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार गट) औताडे हांडेवाडीचे माजी सरपंच संजय जाधव, रोहन गायकवाड, विजय दगडे, समशुद्दीन इनामदार, असिफ मनियार यांच्याकडून निवडणुकीची तयारी सुरू आहे. शिवसेनेकडून (ठाकरे गट) शाश्वत घुले, शुभांगी घुले, प्रवीण हिलगे हे इच्छुक आहेत. काँग्रेसकडून नसीम शेख, इमान शेख, शोयब इनामदार, अमित घुले यांची नावे चर्चेत आहेत. मनसेकडून शुभम टिंगरे हे इच्छुक आहेत.
महायुती होणार नाही असे गृहीत धरून या प्रभागातील इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. महाआघाडी होण्याची शक्यता अनेक जण वर्तवत आहेत. असे झाल्यास महायुतीतील मित्रपक्षांतील उमेदवारांना तोडीस तोड देणारे महाआघाडीचे उमेदवार आगामी निवडणुकीत पाहायला मिळणार आहेत. महायुतीमधील घटक पक्षांतील जवळजवळ 50 इच्छुक निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मात्र, तिकीट न मिळाल्यास काही नाराज इच्छुक बंडखोरी करून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याच्या तयारी असल्याचे बोलले जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा यापूर्वी अनुभव असलेले माजी उपसभापती, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, माजी सरपंच, माजी उपसरपंच, माजी ग्रामपंचायत सदस्या या प्रभागातून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. यात राजकारणात कसलेल्या ग्रामीण आणि शहरी भागातील उमेदवारांत लढत होणार आहे. तसेच यापूर्वी महापालिकेची निवडणूक जिंकलेले उमेदवारही त्यांचे प्रतिस्पर्धी असणार आहेत. त्यामुळे या प्रभागाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.