मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा निषेध करण्यासाठी कोकणवासीय गेल्या दोन दिवसांपासून महामार्गावर मानवी साखळी करून उभे आहेत. तब्बल ५ हजार आंदोलनकर्त्यांची या मानवी साखळीने बुधवारी आंदोलनाचा समारोप झाला. पुढील वर्षभरात या महामार्गाचे काम पूर्ण झाले नाही, तर पुढील आंदोलनात कोकणी माणूस मुंबईच्या रस्त्यावर उतरेल, असा इशारा 'स्वराज्यभूमी कोकण महामार्ग जनआंदोलना'ने दिला आहे.
या आंदोलनात कोकणासाठी काम करणाऱ्या २५ सामाजिक संघटनांनी एकजूट दाखवली आहे. त्यातील 'समृद्ध कोकण संघटने'चे संस्थापक संजय यादवराव म्हणाले की, मुंबई ते नागपूरसारखा ७०० किलोमीटर लांब समृद्धी महामार्ग अवघ्या ४ ते ५ वर्षांत पूर्ण होतो. या महामार्गात भूसंपादनापासन सगळी प्रक्रिया पार पाडली जाते.
देशातील हिमाचल व लेह लडाख सारख्या दुर्गम भागामध्येही दोन-दोन वर्षांत रस्ते बनू शकतात; तर १२ वर्षे उलटली तरी मुंबई-गोवा महामार्ग अजून का पूर्ण झाला नाही? याचे उत्तर मिळायलाच हवे. या महामार्गाच्या दुरावस्थेमुळे अनेक नागरिकांचे बळी गेले आहेत. त्याचाच संताप व्यक्त करण्यासाठी हजारो कोकणवासी रस्त्यांवर उतरले आहेत. या महामार्गाच्या संथ कामाचा निषेध करत ५ सप्टेंबरपासून मानवी साखळीद्वारे 'स्वराज्यभूमी कोकण महामार्ग जनआंदोलन' चालू आहे.
"कोणी म्हणतंय कोल्हापूरमार्गे जा, कोणी म्हणतंय कराडमार्गे जा''. पण कोकण ही आमची कर्मभूमी आहे. आमच्यासाठी हे ठिकाण स्वर्गाप्रमाणे आहे. त्यामुळे आमच्या भूमीतून जाणारा मार्ग आम्हाला हवा आहे. जाहीर केल्याप्रमाणे हा मार्ग एक वर्षात पूर्ण झाला नाही तर लाखो कोकणवासी मुंबईत रस्त्यावर उतरतील, असा इशाराही संजय यादवराव यांनी दिला आहे.
पोलादपूर, संगमेश्वर, पनवेल, पळस्पे, चिपळूण या ठिकाणी एकूण ५ हजारांहून अधिक नागरिक काळी फित लावून आंदोलनात सहभागी झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकर पूर्ण व्हावे, ही आंदोलकाची प्रमुख मागणी आहे. या महामार्गाची दुरावस्था, खड्डे यामुळे प्राण गमावलेल्या नागरिकांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
पनवेल- पळस्पे ते शिरढोण आणि चिपळूण येथील बहादूरशेख नाका ते पाग नाका या ठिकाणी ७ सप्टेंबरला मानवी साखळी आंदोलन पार पडले. तर सिंधुदुर्ग, नांदगाव तिठा ते ओटव फाटा येथील आंदोलनाने बुधवारी आंदोलनाची सांगता झाली. महामार्गाचे काम पूर्ण झाल्याशिवाय टोल आकारू नये, शाळा-गावे अशा ठिकाणी भूमिगत रस्त्याची सोय करावी, अपघातासाठी कारणीभूत असणारी धोकादायक वळणे, घाट शक्य तितके सोपे करावेत अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या.
दरम्यान, हाती मागणीचे फलक घेत आणि जोरदार घोषणा करत अनेक मुंबईकर, कोकणवासी या आंदोलनात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. ग्राम संवर्धन सामाजिक संस्था कोकण कट्टा रायगड जिल्हा मेडिकल रिप्रेझेन्टेटीव्ह संघटनेने पनवेल तालुक्यातील पळस्पे फाटा येथे मानवी साखळीचे आयोजन केले होते. यावेळी पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांनी या आंदोलनाची दखल घेत आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांसोबत संवाद साधत निवेदन स्वीकारून संबंधित मागण्या वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्याचे मान्य केले.
जाहीर केल्याप्रमाणे पुढील एक वर्षात दर्जेदार आणि खड्डेमुक्त महामार्ग पूर्ण व्हावा.
शाळा, गावे अशा ठिकाणी भूमिगत रस्त्याची सोय करावी.
अपघातासाठी कारणीभूत असणारी धोकादायक वळणे, घाट शक्य तितके सोपे करावेत.
जेएनपीटी, दिघी, औद्योगिक पट्टा असणाऱ्या पनवेल ते माणगाव या रस्त्याला सहापदरी करत संपूर्ण सिमेंट रस्ता बनवावा, संपूर्ण सर्व्हिस रोड असावा.
महामार्गाचे काम पूर्ण झाल्याशिवाय टोल आकारू नये.
डोंगर पोखरण्याऐवजी भरावासाठी नदीतील गाळ महामार्गाच्या कामासाठी वापरावा.
महामार्गावर विविध झाडे लावत हा देशातील सुंदर ग्रीन हायवे बनवावा.
दर २५ किलोमीटरवर शेतकरी बाजाराची सुविधा करावी.