

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मुंबईत धारावीत राहणार्या जान मोहम्मद शेख याच्यासह राजस्थान, दिल्ली आणि उत्तर प्रदेशातून सहा जणांना बेड्या ठोकल्या होत्या. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने ही कारवाई केली होती. आता महाराष्ट्र एटीएसनं (Maharashtra ATS) मुंबईमधील जोगेश्वरी भागातून एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतले आहे.
दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांशी संबंधित हा व्यक्ती असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला जोगेश्वरी येथून ताब्यात घेण्यात आले. महाराष्ट्र एटीएस (Maharashtra ATS) आणि मुंबई पोलिस क्राइम ब्रँचने (Mumbai Police Crime Branch) ही संयुक्त कारवाई केली. ताब्यात घेतलेल्या संशयित दहशतवाद्याची कसून चौकशी केली जात आहे.
दाऊदच्या इशार्यावर महाराष्ट्रासह देशभरात घातपात घडवण्यास निघालेल्या सहा पैकी एक जान मोहम्मद शेख ऊर्फ समीर कालिया हा 47 वर्षीय अतिरेकी अंडरवर्ल्डचा हस्तक म्हणून ओळखला जातो. धारावीतील केलाबखरमध्ये तो लहानाचा मोठा झाला. काही वर्षांपूर्वी त्याच्या आई वडिलांचे निधन झाले.
पत्नी आणि एक 22 वर्ष आणि एक 11 वर्षाच्या मुलीसह तो इथे राहतो. तो चालक म्हणून काम करत असे. स्वत: कमी शिकलेला पण त्याच्या दोन्ही मुली शिक्षण घेत होत्या. पत्नी हाताला मिळेल ते काम करते. त्याला अटक होताच सर्वांनाच धक्का बसला होता.
धारावीतील समीर कालिया हा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिमच्या अत्यंत जवळच्या हस्तकासाठी काम करतो. त्याचे कार्यक्षेत्र मुंबईच राहिले. मात्र, ऐन सणासुदीत घातपात करण्यासाठी या हस्तकाने समीरची निवड केली आणि पाकिस्तानात बोलावत त्याला प्रशिक्षणही दिले. ज्या ठिकाणी स्फोट घडवायचे होते त्या सर्व ठिकाणी अत्यंत स्फोटक आयईडी पोहोचवणे, अतिरेक्यांसाठी शस्त्रास्त्रे तसेच हातबॉम्ब पोहोचवण्याची जबाबदारी समीर कालियावर टाकण्यात आली होती. राजस्थानातील कोटा येथून दिल्लीकडे जात असतानाच त्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली होती.