शिये; पुढारी वृत्तसेवा : बोलेरो चालकाच्या बेजबाबदार व हलगर्जीपणामुळे एका तीन वर्षाच्या बालिकेचा चाकाखाली चिरडून मृत्यू झाल्याची ह्रूदयद्रावक घटना घडली. एका स्क्रॅप व्यवसायाच्या गाडी चालकामुळे घडली. या घटनेचे गांभीर्य न घेता काही कथीत पुढाऱ्याकडून अल्पशा रकमेत हे प्रकरण परस्पर मिटवून त्याची विल्हेवाट लावण्याची घटना पुलाची शिरोली येथे घडली.
मात्र शिरोली एमआयडीसी पोलिसांच्या सतर्कतेमुळे या घटनेस न्याय देत गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे पोलिसांचे परिसरात कौतुक होत आहे.
पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथील सनद माळावर अन्वर स्क्रॅप डेपो येथे बुधवारी दुपारी बोलेरो महिंद्रा गाडी स्क्रॅप घेऊन डेपोमध्ये आली होती. हा परिसर औद्योगिक आणि रहिवासी दृष्टीने गजबजलेला आहे. येथे अनेक परप्रांतीय कुटुंबातील लोक रोजगारासाठी येथे येऊन भाडोत्री घरात रहात आहेत. अशाच पध्दतीने शर्मा कुटुंबीय येथे रहाण्यास आले आहे.
या कुटुंबातील तीन वर्षाची बालिका दीपा ही अन्य काही सवंगड्यासह येथे खेळत होती. स्क्रॅप व्यवसायाकडे आलेल्या बोलेरो चालकाने गाडीच्या मागे वळून न पहाता भरधाव वेगाने गाडी रिव्हर्स घेतली. गाडीत वजनदार स्क्रॅप असल्यामुळे कोवळ्या जिवाचा जागीच चेंदामेंदा झाला.
एक कळी फुलण्याआधीच एका बेजबाबदार चालकामुळे चिरडली गेली. हे पाहताच तिच्या आईने टाहो फोडला. बघता बघता अनेक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र संबंधित व्यावसायिक व कथित पुढाऱ्याने या मृत्यूचा बाजार मांडला. शर्मा कुटुंबावर दबाव टाकून अल्पशा रकमेत हे प्रकरण परस्पर मिटवण्यासाठी प्रयत्न केला.
पण शिरोली एमआयडीसी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तात्काळ या प्रकरणी चौकशी सुरू केली. आणि नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी चोवीस तासात या प्रकरणाचा छडा लावून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला.
हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केलेल्या संबंधितांवर पोलिस कोणती कारवाई करणार याकडे शिरोली परिसरातील लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.