Uddhav Thackeray : ‘ठाकरी गुगली’ने राजकीय गोंधळ! युतीचे संकेत की… | पुढारी

Uddhav Thackeray : ‘ठाकरी गुगली’ने राजकीय गोंधळ! युतीचे संकेत की...

औरंगाबाद/मुंबई; पुढारी वृत्तसेवा : व्यासपीठावर उपस्थित असलेले आजी-माजी आणि एकत्र आलो तर भावी सहकारी… असा उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी औरंगाबादेतील कार्यक्रमात केला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आजी-माजी आणि भावी, असा एकच गोंधळ उडाला.

मुख्यमंत्र्यांचे विधान एक आणि अर्थ मात्र अनेक काढले जाऊ लागले. मुख्यमंत्र्यांनी भाजपसोबत युती होण्याचे संकेत दिले आणि महाराष्ट्रात सत्तांतरच होऊ घातले आहे, असा एक अर्थ. सतत त्रास देणार्‍या राष्ट्रवादी आणि काँग्रेसला केवळ इशारा म्हणून मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांना भावी सहकारी म्हणून संबोधले, असा दुसरा अर्थ.

या दोन अर्थांनी राजकारणात एकाचवेळी पुरता गोंधळ उडवला असतानाच, चंद्रकांत पाटील यांच्या पक्षांतराची पुडीही खुद्द मुख्यमंत्र्यांनी सोडून दिली आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तर चंद्रकांत पाटील यांचा सेना प्रवेशही निश्चित करून टाकला. महाराष्ट्राच्या सत्ताकारणात नेमके काय होऊ घातले आहे, याचा अंदाज लागण्यापूर्वीच भाजपसोबत युती होण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनीच फेटाळून लावली. युती होणार का? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी काळावर सोपवले आणि उडवलेला गोंधळ कायम ठेवला.

शुक्रवारी हैदराबाद मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री (Uddhav Thackeray) औरंगाबाद दौर्‍यावर होते. तब्बल 26 वर्षे रखडलेल्या संतपीठाचे ऑनलाईन उद्घाटन त्यांनी केले आणि औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीचे भूमिपूजनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. या भूमिपूजनाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आ. हरिभाऊ बागडे, आ. प्रशांत बंब, आ. अतुल सावे या भाजप नेत्यांचीही उपस्थिती होती.

भावी सहकारी म्हणजे काय? ठाकरेंनी सांगितला अर्थ

भूमिपूजनाच्या भाषणात भाजप नेत्यांना भावी सहकारी संबोधून युतीची चर्चा घडवल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र नंतर राजकीय अंदाजाचे विमान सरळ खाली उतरवले. भाजप नेत्यांना भावी सहकारी संबोधले याचा अर्थ काय? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी काळावर सोपवले. उद्धव म्हणाले, सर्व काही काळच ठरवेल. अलीकडे राजकारणाला अतिशय विकृत स्वरूप येताना दिसत आहे. हे प्रकार थांबले पाहिजेत. राजकीय विसंवादाचा परिणाम विकासकामांवर होतो. त्यामुळेच आपण ‘आजी-माजी सहकारी आणि एकत्र आलो तर भावी सहकारी,’ असा उल्लेख केला.

असे म्हणण्यामागचे कारण एवढेच की, विकासकामांसाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. केंद्रात भाजपची सत्ता आणि राज्यात महाविकास आघाडीची. त्यामुळे दोघेही सोबत राहिलो, तर विकासकामे यशस्वीरीत्या पूर्ण होण्यास मदत होईल, या अर्थानेच हे वक्तव्य केल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

युती होईल अशी परिस्थिती नाही : फडणवीस

मुंबई : राजकारणात काहीही होऊ शकते; पण आताच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र येतील, अशी परिस्थिती दिसत नाही. ही अनैसर्गिक आघाडी फार दिवस टिकणार नाही, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात दिली.

आपण कशा लोकांबरोबर अनैसर्गिक युती केली आणि काय काम करत आहोत, हे ध्यानात आल्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी असे वक्तव्य केले असावे, असेही फडणवीस म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा व समर्पण साप्ताहा’चे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये भाजपच्या नेत्यांचा उल्लेख ‘भावी सहकारी’ असा केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यावर युतीची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली.

अनैसर्गिक आघाडीतून बनलेले हे सरकार टिकू शकणार नाही…

राजकारणात काहीही होऊ शकते; पण मला आज तशी कोणतीच शक्यता दिसत नाही. भाजपची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही सत्तेकडे डोळे लावून बसलेलो नाही. सरकार बनलेच पाहिजे, असा काही अट्टाहास नाही. आम्ही विरोधी पक्ष म्हणून सक्षमपणे काम करत आहोत, असे सांगून फडणवीस म्हणाले, अनैसर्गिक आघाडीतून बनलेले हे सरकार फार काळ टिकू शकणार नाही. कामे नीट मार्गी लागत नाहीत, भ्रष्टाचार बोकाळला आहे, हे ध्यानात आल्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केले असावे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : भाऊरंगारी कट्टा – राजकीय नेत्यांशी दिलखुलास गप्पा

Back to top button