टी20 कर्णधार : रोहित शर्माच विराटला सक्षम पर्याय

टी20 कर्णधार : रोहित शर्माच विराटला सक्षम पर्याय
Published on
Updated on

विराट कोहलीने टी-20 मध्ये कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर हे कर्णधारपद कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. यामध्ये सर्वात आघाडीवर रोहित शर्माचे नाव आहे. यापूर्वीदेखील रोहितला टी-20 कर्णधारपद देण्यात यावे, असे अनेक विशेषज्ञाने सांगितले होते. आकड्यांमध्येदेखील रोहित विराटपेक्षा सरस आहे. टी-20 क्रिकेटमध्ये रोहितची विजयी टक्केवारी 78.94 अशी आहे.आयपीएलच्या 2013 च्या सत्रात मुंबई इंडियन्स संघाने स्पर्धेच्या मध्येच रिकी पाँटिंगकडून कर्णधारपद काढून रोहित शर्माला दिले आणि रोहितने संघाला पहिल्यांदा आयपीएल जेतेपद मिळवून दिले. यानंतर रोहितने कधीही मागे वळून पाहिले नाही. रोहितने आजवर 5 आयपीएल जेतेपद मिळवले आहे. रोहितने मुंबईला 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 ला जेतेपद मिळवून दिले होते.

कोहलीकडून निराशा

2012 मध्ये विराटला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे कर्णधारपद देण्यात आले. मात्र, नऊ वर्षांत त्याला एकदाही जेतेपद मिळवता आले नाही. 2016 मध्ये कोहलीचा संघ फायनलमध्ये पोहोचला होता. मात्र, त्यांना जेतेपद मिळवण्यात अपयश आले. विराट कोहलीला 2017 मध्ये निर्धारित षटकांच्या संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. आतापर्यंत त्याने 45 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये 27 लढतीत विजय मिळवले. तर, 14 सामन्यांत त्याला पराभूत व्हावे लागले. दोन सामन्यांचा निकाल लागला नाही आणि दोन सामने टाय राहिले. कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाला 2017 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये, 2019 चा एकदिवसीय विश्वचषक उपांत्य सामना आणि 2021 जागतिक कसोटी अजिंक्यपद 2021 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत व्हावे लागले.

रोहितने श्रीलंका सीरिज, निदहास ट्रॉफी, आशिया कपमध्ये मिळवून दिले जेतेपद

2017 मध्ये रोहित शर्माला पहिल्यांदा भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली. त्यावेळी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत कोहलीला आराम देण्यात आला होता. भारताने ही एकदिवसीय मालिका 2-1 ने जिंकली. 2018 मध्ये रोहितने आपल्या नेतृत्वाखाली भारताला निदहास ट्रॉफीचे जेतेपद मिळवून दिले आणि त्याचवर्षी आशिया कप जिंकण्यातदेखील त्याला यश मिळाले. आतापर्यंत 19 आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये रोहितने कर्णधारपदाची भूमिका पार पाडताना 15 विजय मिळवले. फक्त चार सामन्यांत त्याला पराभूत व्हावे लागले. एकदिवसीय सामन्यांमध्येदेखील रोहितने 10 सामन्यांपैकी आठ सामन्यांत विजय मिळवला तर, दोनमध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला.

शतकांच्या बाबतीतही रोहित कोहलीच्या पुढे

गेल्या पाच वर्षांबाबत बोलायचे झाल्यास टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने एकूण 17 शतके झळकावली आहेत. तर, रोहित शर्माने 22 शतके झळकावली आहेत. 2020 च्या सुरुवातीपासून विराटला एकही शतक झळकावता आलेले नाही.

के. एल. राहुलला कर्णधार बनवा : गावसकर

विराट कोहली याने विश्वचषकानंतर टी-20 कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पुढचा कर्णधार कोण याबाबत क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. तर टी-20 संघासाठी रोहित शर्मा हा प्रबळ दावेदार मानला जात आहे. दुसरीकडे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी भारताच्या भावी कर्णधाराबाबत भविष्यवाणी केली आहे. भारतीय फलंदाज के. एल. राहुल याच्यात कर्णधारपदाचे सर्व गुण असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्याला त्यासाठी तयार करणे गरजेचे असल्याचे मत सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे.

'बीसीसीआय संघाच्या भविष्याचा विचार करीत आहे. ही चांगली बाब आहे; पण अजूनही त्यापुढे विचार करणे गरजेचे आहे. जर नवीन कर्णधाराचा विचार केला तर के. एल. राहुलकडे त्याद़ृष्टीने पाहिले जाऊ शकते. त्याला उपकर्णधारपद दिले जाण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये राहुल पंजाब किंग्जचे नेतृत्व करीत आहे. त्याने आयपीएलमध्ये खूप चांगले नेतृत्व गुण दाखवले आहेत. कर्णधारपदाचे कोणतेही दडपण त्याच्यावर दिसले नाही. त्याच्या नावाचा विचार होणे गरजेचे आहे,' असे मत सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news