निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर जयश्री कटारे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी हिम्मत खराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर हवेलीच्या प्रांतअधिकारीपदी संजय आसवले यांची वर्णी लागली आहे.
जयश्री कटारे यांची बदली मुद्रांक जिल्हाधिकारी अंधेरी या ठिकाणी करण्यात आली आहे. तर पुणे येथे मुद्रांक उपमहानिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या हिम्मत खराडे यांच्याकडे निवासी उपजिल्हाधिकारी पदाची सूत्रे देण्यात आली आहेत. सातारा या ठिकाणी भूसंपादन अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या आसवले यांच्याकडे हवेली प्रांत म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
रात्री उशिरा शासनाने अध्यादेश काढून बदल्या केलेल्या आहेत. डॉक्टर जयश्री कटारे यांच्या कालखंडामध्ये जिल्हा प्रशासनाचे विविध प्रश्न मार्गी लागले आहेत. यामध्ये प्रामुख्याने पीएम किसान योजनेचे कर्जवाटप, पूर परिस्थिती, पदवीधर निवडणूका, 750 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लोकसभा विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत. महिला अधिकारी म्हणून कटारे यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे. पुणे जिल्ह्यातील त्या महिला म्हणून पहिल्या निवासी उपजिल्हाधिकारी ठरल्या. त्यांच्या या कालखंडामध्ये शासनाकडून विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.