नाशिक : विहिरीत आढळला विशेष शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह | पुढारी

नाशिक : विहिरीत आढळला विशेष शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : नाशिक पोलिस आयुक्तालात विशेष शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह एका विहिरीत सापडल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

विलास सुरेश सोनार (५२) असे या मृत कर्मचाऱ्याचे नाव असून, नाशिक येथील अशोक स्तंभावरील ढोल्या गणपती मंदिराजवळ ते राहत होते. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेष शाखेत कार्यरत असलेले सोनार यांची ड्यूटी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत होती. गेल्या २१ वर्षांपासून ते पोलीस दलात कार्यरत होते. गंगापूर रोड परिसरातील शहीद अरुण चित्ते पुलाजवळील काकड मळ्यातील विहिरीत बुधवारी (दि.२९) दुपारी अडीचच्या सुमारास सोनार यांचा मृतदेह तरंगलेल्या अवस्थेत आढळला.

नाशिक

दहा ते बारा दिवसांपासून ते कामावर नव्हते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. दरम्यान, पोलीस आयुक्त पांडे यांनीही जिल्हा रुग्णालयात धाव घेत यासंदर्भात माहिती जाणून घेतली. या घटनेबद्दल आयुक्त पाण्डेय यांनी दुःख व्यक्त करताना सांगितले की, सोनार हे पोलीस खात्यातील तत्पर कर्मचारी होते. त्यांच्याकडे प्रचंड गोपनीय माहिती असायची, असेही ते म्हणाले. सोनार यांच्या मृत्यूमुळे पोलीस दलातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

आयकार्डवरून पटली ओळख

घटनेची माहिती कळताच म्हसरुळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक साखरे, सहायक निरीक्षक आहिरे व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला. तेव्हा सोनार यांच्या खिशातील आयकार्डवरून त्यांची ओळख पटली. सोनार यांच्या मृत्यूचे नेमके कारण कळले नसून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Back to top button