धुळे : आराम बसमधून गुटखा तस्करी करण्याचा डाव हाणून पाडला | पुढारी

धुळे : आराम बसमधून गुटखा तस्करी करण्याचा डाव हाणून पाडला

धुळे : पुढारी वृत्तसेवा

प्रवासी वाहतुकीऐवजी आराम बसमधूनच गुटखा तस्करी करण्याचा प्रकार धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने हाणून पाडला आहे. या कारवाईत आरामबसमधून तब्बल अकरा लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात तिघांना ताब्यात घेण्यात आले असून गुटका विक्री करणारे आणि खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या भोवती आता फास आवळला जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.

गुजरात राज्यातून जळगाव जिल्ह्यात आरामबसमधून गुटख्याची तस्करी होणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार हेमंत पाटील यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुक्यातील नेर येथे नागपूर सुरत महामार्गावर सापळा लावला.

या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक सागर काळे , पोकॉ प्रवीण पाटील, धीरज सांगळे, कुणाल शिंगणे ,प्रमोद ईशी आदींनी सापळा रचला. यावेळी गुजरात राज्यातून येत असलेली (जीजे 19 एक्स 9993) क्रमांकाची आरामबस या पथकाने थांबवून चालकाकडे विचारणा केली असता चालकाने पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू केला.

गुटख्याचे पोते रचून त्याची तस्करी होत असल्याचा प्रकार

त्यामुळे पोलिस पथकाने आरामबसची डिकी उघडून पाहिले असता यात पांढऱ्या गोण्यांमध्ये गुटखा आढळून आला. त्याच प्रमाणे आराम बसच्या आत देखील गुटख्याचे पोते रचून त्याची तस्करी होत असल्याचा प्रकार दिसून आला. त्यामुळे पोलिसांनी सुमारे अकरा लाखाच्या गुटख्यासह चालक शेख लतीफ शेख अन्वर, क्लीनर विकास महादू महाजन यांना ताब्यात घेतले. आरामबस कंपनीचा मॅनेजर नदीम खान आसिफ खान याला देखील ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान गेल्या आठवडाभरापासून धुळे जिल्ह्यातून वाहतूक होत असलेल्या गुटख्याचा साठा पोलिसांनी छापा मारून पकडणे सुरू केल्यामुळे गुटखा तस्करांनी गुजरात राज्यातून आरामबस मधूनच गुटख्याची तस्करी करण्याची शक्कल लढवली. मात्र धुळे तालुका पोलिस दलाच्या अधिकाऱ्यांनी हा तस्करांचा प्रयत्न हाणून पाडला.

दरम्यान गुटख्याचा हा साठा चाळीसगाव येथे उतरवला जाणार असल्याची माहिती तपासात पुढे आली असून या व्यापार्‍यावर देखील गुन्हा दाखल करण्यात येणार असून त्याला अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी या वेळेस दिली आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button