वासिम रिझवी यांची भूमिका : ‘मी इस्लामचा त्याग करून हिंदू झालो कारण’ | पुढारी

वासिम रिझवी यांची भूमिका : ‘मी इस्लामचा त्याग करून हिंदू झालो कारण’

शिया वक्फ बोर्डचे माजी अध्यक्ष वासिम रिझवी यांचं पुस्तक ठरलं आहे वादग्रस्त

पुढारी ऑनलाईन डेस्क 

मला इस्लाम धर्मातून बहिष्कृत करण्यात आले. मी स्वतः इस्लाम धर्म सोडलेला नाही. धर्मातील काही चुकीच्या प्रथांविरोधात मी लिहिलं होतं आणि या प्रथा बदलल्या पाहिजेत. पण आत्मपरीक्षण करण्याऐवजी मलाच भीती दाखवली जाऊ लागली, अशी प्रतिक्रिया वासिम रिझवी यांनी दिली आहे.

उत्तर प्रदेशाच्या शिया वक्फ बोर्डचे माजी अध्यक्ष असलेल्या वासिम रिझवी यांनी आज हिंदू धर्म स्वीकारला. त्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका सविस्तर मांडली आहे. रिझवी यांनी जितेंद्र नारायण सिंह त्यागी असे नाव स्वीकारले आहे. गाझियाबाद येथील दसना देवी मंदिरात त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला.

रिझवी यांनी बाबरी मशिद पाडल्याचा दिवस ‘पवित्र’ मानत हा दिवस धर्मांतरासाठी निवडला.

रिझवी यांचे पुस्तक वादग्रस्त

रिझवी यांनी मोहंमद हे पुस्तक काही दिवसांपूर्वी लिहिले आहे. या पुस्तकावर इस्लाममधील शिया आणि सुन्नी या दोन्ही पंथातून टीका होत आहे. या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणीही उत्तर प्रदेश सरकारकडे काही मुस्लिम धर्मगुरूंनी केली आहे.

या पुस्तकामुळे मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, असा आरोपही रिझवी यांनी केला आहे.

‘हिंदुत्वासाठी कार्य कार्यरत राहाणार’

रिझवी यांनी सनातन हिंदू धर्म हा सर्वांत पवित्र असल्याचे म्हटले आहे, तसेच येथून पुढे हिंदुत्वासाठी काम करू असेही म्हटले आहे.

रिझवी यांनी यापूर्वी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल करून कुराणमधील २६ आयत काढून टाकाव्यात अशी मागणी केली होती. त्यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता.

मृत्यू पश्चात आपला अत्यंविधी हिंदू धर्मप्रथेनुसार व्हावा, आणि त्यासाठी आपला मृतदेह आपले मित्र महंत नरसिंहानंद सरस्वती यांना सोपवण्यात यावा असेही ते एकदा म्हणाले होते.

हेही वाचा

पाहा व्हिडिओ :

Back to top button