सत्तेचा वापर लोकांना घाबरवण्यासाठी केला जातोय : शरद पवार | पुढारी

सत्तेचा वापर लोकांना घाबरवण्यासाठी केला जातोय : शरद पवार

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : जवाहरलाल नेहरू यांनी देशाला स्वातंत्र्य मिळावे, म्हणून लढा दिला. त्यांच्यावर भाजपाकडून सतत टीका केली जात आहे, हे योग्य नाही. पंतप्रधानांनी सर्वांना बरोबर घेवून पुढे जाण्याचे काम करायला हवे, मात्र तसे होताना दिसत नाही. सत्तेचा वापर लोकांना घाबरवण्यासाठी केला जात असून विरोधात बोलणाऱ्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकता, हे जनता खपवून घेणार नाही. आज तुमच्याकडे हुकूमशाही असेल तर लोक तुम्हाला खाली खेचायला कमी करणार नाहीत, हे लक्षात ठेवा, असा इशारा देत शरद पवारांनी यांनी आज (दि.२६) भाजपावर निशाणा साधला.

महाविकास आघाडीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार प्रणिती शिंदे, माढा लोकसभा उमेदवार धैर्यशील मोहिते- पाटील यांच्या प्रचारार्थ पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.

पुढे बोलताना पवार म्हणाले की, रोजगार हमीच्या कामावर जावून उदरनिर्वाह करणारा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख होती. ती पुसण्याचे काम आम्ही केले. उजनी धरण पाण्याचे नियोजन केले. त्यामुळेच आज या जिल्ह्यात ४० साखर कारखाने उभे आहेत. मतदासंघातील प्रश्न सोडवण्याची दृष्टी या नव्या उमेदवारांमध्ये असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

अभिजित पाटील म्हणाले, उजनी धरणातून शेतीला पाणी नियोजन करणारा, भीमा नदीवर हायड्रॉलिक पद्धतीचे छोटे छोटे बंधारे बांधणारा खासदार आम्हाला हवा आहे. संत विद्यापीठ पंढरपूर येथे होणे गरजेचे आहे. तसेच पंढरपूर येथे एमआयडीसी, कृषी पर्यटन उभारणेही गरजेचे आहे, जेणेकरून तरुणांना रोजगार मिळण्यास मदत होईल. तसेच सोलापूरला विमानसेवा सुरू व्हावी, मागणीही त्यांनी यावेळी केली. उत्तमराव जानकर म्हणाले, मी सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून तिकीट मागितले होते, पण माझी फसवणूक झाली. या फसवणुकीचा बदला मी घेणार, ही खून गाठ बांधली. आणि मोहिते- पाटील यांच्याशी जुळवून घेतले. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात चांगले वातावरण तयार झाल्याचे जानकर यांनी सांगितले. यावेळी धैर्यशील मोहिते- पाटील, प्रणिती शिंदे यांनीही आपले विचार व्यक्त केले

यावेळी विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, भूषण सिंह राजे होळकर, प्रवीण गायकवाड, रघुनाथ निंबाळकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे, उत्तमराव जानकर, साईनाथ अभंगराव, सक्षणा सलगर, अजिंक्य चांदणे, किरण घाडगे, संग्राम पाटील, संदीप मांडवे, दीपक वाडदेकर, सुभाष भोसले, दीपक पवार, प्रकाश पाटील, डॉ.अनिकेत देशमुख, आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button