Sharad Pawar : हुकूमशाही मोदी -शहा सरकारचा पराभव करा: शरद पवार | पुढारी

Sharad Pawar : हुकूमशाही मोदी -शहा सरकारचा पराभव करा: शरद पवार

करमाळा: पुढारी वृत्तसेवा : आज देशात हुकूमशाही सरकार असून अशा या मोदी-शहा सरकारला आज उलथून टाकणे, पराभव करणे गरजेचे आहे. मोदी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या अनेक मंत्र्यांना आज मोदी सरकार तुरुंगात पाठवण्याचे काम करीत आहे. झारखंडचे मुख्यमंत्री, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये टाकले आहे. अशा या हुकूमशाही सरकारला देशात राहण्याचा नैतिक अधिकार नाही”, असा घाणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांनी मोदी सरकारवर केला. Sharad Pawar

ते आज (दि.२६) करमाळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते – पाटील यांच्या प्रचारार्थ करमाळा येथील आयोजित सभेत बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी उपमुख्यमंत्री  विजयसिंह मोहिते -पाटील होते. Sharad Pawar

यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रोहित पवार, माजी आमदार नारायण पाटील, माजी आमदार उत्तमराव जानकर, होळकर वंशाचे श्रीमंत राजे होळकर, पुणे जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी, अॅड. सविता शिंदे, माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, माजी उपसभापती अतुल पाटील, सवितादेवी राजे भोसले, देवानंद बागल, सुभाष गुळवे, राजाभाऊ कदम, धुळाभाऊ कोकरे, डॉ. वसंत पुंडे, हनुमंत माढंरे, संतोष वारे आदी उपस्थित होते.

माजी कृषिमंत्री  पवार पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या शेतमालाला आजही भाव नाही. शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे. बेरोजगारी वाढत आहे. खाजगीकरणाने जोर धरला आहे. शेतकऱ्यांच्या दुधाला, ऊस, कांदा पिकाला भाव दिला जात नाही. अशा या शेतकरी विरोधी सरकारला सत्तेतून पायउतार व्हावे लागले.

यावेळी माजी आमदार नारायण पाटील यांनी करमाळा तालुक्यातील रिटेवाडी उपसा सिंचन योजना, कुकडी, उजनीचे नियोजन व उजनीचे वाहून जाणारे पाणी तसेच प्रलंबित विविध विकास कामाकडे शरद पवार यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी माजी आमदार पाटील यांनी केली.

याशिवाय आमदार रोहित पवार, माजी आमदार उत्तमराव जानकर, अॅड सविता शिंदे , श्रीमंत होळकर यांचीही भाषणे झाली. नितीन चोपडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शिवराज जगताप यांनी आभार मानले.

Sharad Pawar सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री असतानाच्या जुन्या आठवणींना उजाळा

1972 मध्ये मी या सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. त्याकाळी मला जिल्ह्याचे नेते कै. नामदेवराव जगताप, कै शंकरराव मोहिते पाटील, कै. औदुंबर पाटील तसेच कै. विठ्ठलराव शिंदे आदी नेत्यांच्या मला राजकीय सहवास लाभला असेही शरद पवार यांनी बोलताना जुन्या आठवणीना उजाळा दिला.

देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील या उभयतांनी भाजपचे नेते  माजी आमदार जयंतराव जगताप यांची कृषी उत्पन्न बाजार समितीत जाऊन  भेट घेतली. सध्या जगताप हे युवा नेते शंभूराजे जगताप यांच्या सह भाजपच्या गोटातून विरोधात आहे.

त्यामुळे या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. या भेटीनंतर शरद पवार यांनी जिल्ह्याचे नेते कै. नामदेव जगताप यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी माजी आमदार जयंतराव जगताप यांनी शरद पवार व विजयसिंह मोहिते पाटील यांचा सत्कार केला.

माजी आमदार नारायण पाटील यांनी शिवसेनेच्या शिंदे गटातुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटामध्ये प्रवेश केला. यावेळी उपस्थितांनी जोरदार टाळ्याचा गजर करत स्वागत केले.यावेळी नारायण पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

जन समुदायाकडून ” रामकृष्णहरी ” चा गजर

या व्यासपीठावरून बहुतेक प्रत्येक वक्त्यानी उपस्थित जनसमुदायाकडून ” रामकृष्णहरी ” चा गजर करून घेतला. तर काहींनी मोदी हटावच्या घोषणा दिल्या. “अब की बार भाजप तडिपार”, “भारत माता की जय” चा नारा लावला.

Sharad Pawar स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा

यावेळी शेट्टीच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष  गणेश मंगवडे सुदर्शन शेळके यांनी माढा मतदारसंघापुरता राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठिंबा दिला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे सचिन जगताप , बळीराजा  दलचे आण्णा सुपनवर, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी  तसेच अनेक संघटनांनी व्यासपीठावर जाऊन पाठिंबा दिला. या सर्वांचे पवार यांनी स्वागत करून आभार मानले.

हेही वाचा 

Back to top button