आचारसंहितेचे पालन स्वयंस्फूर्तीने व्हावे | पुढारी

आचारसंहितेचे पालन स्वयंस्फूर्तीने व्हावे

प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर

देशात 18 व्या लोकसभेसाठीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू असतानाच आचारसंहितेला गालबोट लावणारी प्रकरणेही समोर येताहेत. मतदारांना आमिष दाखवण्याचा मुद्दा असो, प्रचार सभांमधील खालच्या स्तरावर होणारी टीका असो किंवा आयोगाकडून जप्त करण्यात आलेला मद्याचा, रोख रकमेचा, सोन्या-चांदीचा साठा असो, या सर्वांमुळे आदर्श आचारसंहितेचा विसर पडल्याचे दिसत आहे.

कोणत्याही लोकशाही राष्ट्रात प्रथा, परंपरा, आचारसंहितेला विशेष महत्त्व आहे; कारण या प्रथा, परंपरा या त्या राष्ट्राच्या राष्ट्रीय जीवनातील सामाजिक, सांस्कृतिक प्रवाहातून निश्चित झालेल्या असतात. भारतीय लोकशाहीचा इतिहास हा 5 हजार वर्षांचा असला, तरी केवळ स्वातंत्र्यानंतरची वाटचाल ही लोकशाहीला पोषक राहिली आहे. ही वाटचाल आचार, तत्त्वे, मूल्य परंपरा यांच्या विकसनासाठी नवी संजीवनी देणारी आहे. खरे तर भारतात आदर्श आचारसंहिता ही 1952 मध्ये पहिल्या निवडणुकीत लागू झाली.

या आचारसंहितेला व्यापक अधिष्ठान प्राप्त करून देण्याचे आणि लोकमान्यता मिळवून देण्याचे श्रेय टी. एन. शेषन यांच्याकडे जाते. त्यांनी बारकाईने अभ्यास करून आचारसंहिता प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी व्यापक मोहिमा केल्या. प्रचार माध्यमात आणि लोकमानसातही आचारसंहितेचे महत्त्व प्रभावीपणे बिंबवले. आदर्श निवडणूक आचारसंहिता ही भारतामध्ये निवडणूक आयोगाकडून लागू केली जाते. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ती अस्तित्वात येते आणि निवडणुका होऊन सरकार अस्तित्वात येईपर्यंत कायम असते. या आचारसंहितेचे पालन राजकीय पक्ष, कार्यकर्ते, प्रसारमाध्यमे आणि राजकीय व्यवस्थेतील सहभागी घटकांनी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करावे, अशी अपेक्षा असते.

वास्तविक आचारसंहिता दोन प्रकारच्या असतात. एक आचारसंहिता लावलेली असते, तर दुसरी स्वतःहून स्वीकारलेली असते. भारतात निवडणूक आयोगाने तयार केलेली आचारसंहिता ही दुसर्‍या प्रकारची आहे. राजकीय पक्षांच्या सहमतीने ही आचारसंहिता तयार केली आहे. तिचे स्वरूप हे पक्ष आणि लोकांच्या स्वीकृतीवर आधारलेले आहे. त्यामुळे या आचारसंहितेचे पालन स्वयंस्फूर्तीने होणे आणि तिचे पालन, नियोजन करताना सामुदायिक जबाबदारीचे भान ठेवणे, ही बाब सर्वांत महत्त्वाची आहे. त्या अनुषंगाने या आचारसंहितेच्या पालनासाठी आजवर केलेले प्रयत्न हे विशेष महत्त्वाचे आहेत. या आचारसंहितेचे पालन करण्याची जबाबदारी जशी राजकीय पक्षांवर, दबावगटांवर, प्रसारमाध्यमांवर आहे, त्याचप्रमाणे सामाजिक द़ृष्टीने विचार करता ती प्रत्येक नागरिकावरही आहे; कारण लोकशाहीचे यश हे सामाजिक सहभागावर अवलंबून असते. लोकशाही अशी व्यवस्था आहे की, ती एका व्यक्तीच्या किंवा समूहाच्या इच्छेनुसार नव्हे, तर सर्वसामान्यांच्या इच्छा, आशा, आकांक्षा पल्लवित करणारी, सर्वांना सहभागी करून विकासाच्या दिशेने वाटचाल करणारी राजकीय व्यवस्था आहे, असे म्हटले जाते.

खरे तर राष्ट्र जीवनातील मूल्यव्यवस्थांना आकार देऊन लोकशाही जीवनाचा मार्ग बनवण्यासाठी करावयाच्या प्रयत्नात तीन संस्थांना विशेष महत्त्व आहे. एक म्हणजे संविधान. त्या-त्या देशातील संविधान तेथील राजकीय व्यवस्थेचे विकसन करते. भारताच्या निवडणूक आयोगाची निर्मितीही भारतीय संविधानातील तरतुदींनुसारच केली आहे. निवडणूक आयोग ही संस्था भारतात संविधानातील तरतुदीनुसार विकसित केली असून, त्याच्या कार्यप्रणालीत निवडणूक कार्यक्रम ठरवणे जसे महत्त्वाचे आहे, तसेच निवडणूक कार्यक्रमाचे यशस्वी कार्यान्वयन करण्यासाठीच्या विविध कामांना महत्त्व आहे. त्यातच आचारसंहितेचा समावेश होतो. तिसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे आचारसंहितेची तत्त्वे. हा पैलू प्रथा आणि परंपरांवर आधारित आहे. इंग्लंडमधील लोकशाही व्यवस्था ही पक्ष लिखित तत्त्वांपेक्षा प्रथा व परंपरांवर अधिक विकसित झालेली आहे. भारतामध्येही आचारसंहितेच्या तत्त्वांचे पालन करताना विशिष्ट नियमाप्रमाणे प्रथा व परंपरांनाही महत्त्व आहे.

काळाच्या प्रवाहात विशिष्ट काटेकोर नियमांप्रमाणे या प्रथा-परंपरांचे विकसन महत्त्वाचे आहे. ही तत्त्वे जेव्हा प्रत्यक्षात लोक स्वीकारतील आणि त्या तत्त्वांचे अनुशीलन व पालन निष्ठेने करतील, तेव्हा तत्त्वांपेक्षा आचारसंहितेचे महत्त्व प्रथा-परंपरेच्या प्रवाहातून विकसित होईल. या तीनही द़ृष्टीने विचार करता भारतामध्ये निवडणूक आयोगाची आदर्श विचारसंहिता, आचारसंहिता ही विशेष महत्त्वाची आहे. आपल्यासमोर आदर्श असले, तरीही ते प्रत्यक्ष व्यवहारात येतील असे नाही. आदर्शाचे पालन करणे म्हणजे एका दीपस्तंभाच्या दिशेने वाटचाल करण्यासारखे असते. राष्ट्रहिताची नौका सुरळीतपणे पुढे जावी आणि सुरक्षित राहावी या द़ृष्टीने करावायच्या सर्व प्रयत्नांना आपण आदर्श आचारसंहिता म्हणू शकतो. आदर्श आचारसंहिता ही एक नमुनेदार व्यवस्था आहे. या व्यवस्थेचे विकसन, कार्यान्वयन करण्यासाठी तयार केलेली यंत्रणा विशेष महत्त्वाची आहे. राजकीय पक्षाकडून जेव्हा आचारसंहितेचा भंग होतो, तेव्हा त्या पद्धतीने त्यांना सूचना देऊन खुलासा मागून घेण्याचा अधिकारसुद्धा निवडणूक आयोगाला आहे.

या द़ृष्टीने विचार करता ही आचारसंहिता महत्त्वाची आहे. देशात सध्या 18 व्या लोकसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया सुरू आहे; परंतु यंदा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या 79,000 हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. 1 मार्च ते 21 एप्रिल या कालावधीत अबकारी, आयकर, पोलिस, अमली पदार्थ विभाग आणि इतर अंमलबजावणी संस्थांनी 31648.92 लाख रुपयांचे मद्य, ड्रग्ज, मौल्यवान धातू आणि रोकड जप्त केली आहे. यामध्ये 2958.56 लाख रुपयांची रोकड, 4222.65 लाख रुपयांची दारू, 21149.75 लाख रुपयांचे ड्रग्ज, 2161.59 लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तू आणि 1156.38 लाख रुपयांचा अन्य माल जप्त केला आहे. जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणवल्या जाणार्‍या भारतासाठी ही आकडेवारी खचितच शोभनीय नाही.

Back to top button