400 पार होणार नाही म्हणणाऱ्या पोपटांना खानदेशी जनता मतदानातून उत्तर देईल : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | पुढारी

400 पार होणार नाही म्हणणाऱ्या पोपटांना खानदेशी जनता मतदानातून उत्तर देईल : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – ही निवडणूक कोणी उमेदवाराची नसून एका सर्वसामान्य माणसाला पुन्हा पंतप्रधान बनवायचं आहे. संविधानामुळेच आपण देशाचे नेतृत्व ठरवणार आहोत. ना की राजाचा मुलगा राजा होणार , त्यामुळे संविधानात दिलेल्या अधिकाराचा उपयोग करून आपल्याला पुन्हा पंतप्रधानपदी मोदींना बसवायचे आहे. सध्या बरेच पोपट तयार झालेले आहेत व ते म्हणतात की 400 पार होणार नाही. या पोपटांना आपल्या मतदानातून ही खानदेशी जनता उत्तर देईल असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. जळगाव येथे झालेल्या स्वातंत्र्य चौकातील सभेमध्ये ते बोलत होते.

रावेर व जळगाव लोकसभेच्या उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दुपारी अडीच वाजता जळगावला आले. स्वातंत्र्य चौकात झालेल्या सभेमध्ये बोलताना ते म्हणाले की, मोदींचा नाराच आहे, सबका साथ सबका विकास त्यामुळे सर्वसामान्यांपासून शेतकरी, मजुरांपर्यंत सर्वांचा विकास करण्यासाठी आपल्याला पुन्हा महायुतीच्या सरकारला मतदान करायचे आहे. शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी कापूस व सोयाबीनीला इतर शेतमालाला भाव मिळावा म्हणून मोदींनाच पंतप्रधान करावयाचे आहे. शेतकऱ्यांना त्या व्यतिरिक्त चार हजार कोटी दिले आहेत मात्र आचारसंहिता लागल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकता येत नाही अशी माहिती त्यांनी दिली. देशातील 12 बलुतेदारांचा विचार करणारे हे पहिले केंद्रातील सरकार आहे. त्यासाठी 12 हजार कोटी रुपये दिले आहे असेही ते म्हणाले.

आज आपला भारत देश मोदींमुळे सुरक्षित झालेला आहे. पूर्वी आपल्याला शस्त्र सुद्धा आयात करावी लागत होती. आपण आता स्वतः शस्त्र बनवत आहोत. देशाची अर्थव्यवस्था अधिक भक्कम होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मोदी देशाला सुपर पॉवर कडे नेणारे नेतृत्व-गिरीश महाजन

जळगाव जिल्हा हा बदला घेणारा जिल्हा आहे. त्यामुळे जळगावची जनता ही 13 तारखेला आपल्या मतदानाच्या पेटीतून ते दाखवून देणार आहे. विरोधकांनी भाडे देऊन लोक बोलवली होती मात्र ही मोदींवर प्रेम करणारी जनता आहे. त्यामुळे इतक्या उन्हातही या ठिकाणी आलेली आहे. आज सध्या देशात एकमेव नेतृत्व म्हणजे नरेंद्र मोदी. देशाला सुपर पॉवर कडे नेणारे नेतृत्व असल्याचे वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले.

पाकीस्तानही घाबरु लागला- गुलाबराव पाटील

पूर्वी पाकिस्तानी ही आपल्याला डोळे वटारून बघत होतो. मात्र आज नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात पाकिस्तान आपली शेपूट घालून बसलेला आहे. आपल्याकडे अत्याधुनिक असे ब्रह्मास्त्र सारखे हत्यारे असल्यामुळे तेही घाबरू लागलेले आहेत. मोदीजींनी सर्वसामान्यांपासून आपल्या संपूर्ण देशाचा विकास केला आहे.

Back to top button