संविधान हे गरिबांचे हत्यार, मोदींकडून ते संपविण्याचा प्रयत्न: राहुल गांधी | पुढारी

संविधान हे गरिबांचे हत्यार, मोदींकडून ते संपविण्याचा प्रयत्न: राहुल गांधी

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: संविधान केवळ पुस्तक नाही तर गरिबांचं हत्यार आहे. मात्र नरेंद्र मोदी हे हत्यार बावीस-पंचवीस लोकांना हाताशी धरून संपविण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ज्याही वेळेस मी हा मुद्दा उपस्थित करतो, त्यावेळेस मोदी जनतेचे लक्ष कधी पाकिस्तान तर कधी चायना अशा अन्य मुद्द्याकडे वळवितात, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. ते बुधवारी (२४) अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचार सभेत बोलत होते.
राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, राम मंदिर, नवीन संसद याचे उद्घाटन आपण पाहिले असेल. मात्र या दरम्यान आपण राष्ट्रपतींचा चेहरा पाहिला का. राष्ट्रपती आदिवासी समाजाच्या आहेत. मात्र त्या भारताच्या राष्ट्र प्रमुख देखील आहेत. त्यांना राम मंदिरातही जाऊ दिले नाही आणि पार्लमेंटमध्ये उद्घाटनाच्या वेळी देखील प्रवेश करू दिला नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. आदिवासींना भाजपचे लोक वनवासी म्हणतात. मात्र ते आदिवासीच आहेत. आदिवासी म्हणजे भारताचे मूळ नागरिक होत. देशाचा एक्स-रे म्हणजेच जात निहाय जनगणना होणे आवश्यक आहे, आमचे सरकार आल्यास जातनिहाय जनगणना करणार असेही राहुल म्हणाले.
मोदी सरकार संविधान संपविण्याचा मार्गावर आहे. देशाची शाण व गरिबांचे हत्यार म्हणून ओळखले जाणारे संविधान कोणतीच शक्ती बदलवू शकणार नाही, असा इशारा देखील राहुल गांधी यांनी मोदी सरकारला दिला.
दहा वर्षात नरेंद्र मोदी सरकारने देशातील बावीस- पंचवीस लोकांचाच विचार केला. मात्र आम्ही देशातील सर्वच घटकाला न्याय देऊन त्यांच्या उत्थानासाठी प्रयत्न करणार आहोत. इंडिया आघाडी सरकारमध्ये  गोरगरीब महिलांकरिता महालक्ष्मी योजना,श्रीमंतांच्या मुलांप्रमाणेच बेरोजगार युवकांसाठी अप्रेंटिशिप चा अधिकार तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकरीता किसान आयोग आणणार असल्याची घोषणा राहुल गांधींनी केली.
या सभेला विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, आ. यशोमती ठाकूर,माजी खासदार अनंत  गुढे,शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, शिवसेना संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी, प्रकाश पोहरे, पदवीधर मतदार संघांचे आमदार धीरज लिंगाडे,काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख, काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष वसाहत मिर्झा ,काँग्रेस प्रवक्ते दिलीप एडतकर, राष्ट्रवादी महिला अध्यक्ष संगीता ठाकरे, शिवसेना जिल्हा अध्यक्ष सुनील खराटे, अकोला लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार डॉ.अभय पाटील,शिवसेना नेत्या प्रीती बंड  यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती.

करोडो गरिबांना लखपती बनविणार

मोदी सरकार हे गरिबी व संविधान विरोधी सरकार असून त्यांनी केलेले काम हे फक्त श्रीमंत आणि विशिष्ट वर्गासाठी केले असल्याचे दिसून येते. नोटबंदी, जीएसटी, कृषी कायदा हे विशिष्ट लोकांसाठी घेतलेले निर्णय आहे, असे राहुल गांधी म्हणाले. उद्योगपतींना कर्जमाफी देऊन मोदींनी शेतकरी व गरिबांचे हक्क हिरावले आहेत. त्यांनी विशिष्ट लोकांना श्रीमंत केले असले तरी इंडिया आघाडी चे सरकार बनताच आम्ही करोडो गरिबांना लखपती बनविणार असल्याचे राहुल गांधीनी सांगितले. याकरिता महालक्ष्मी व अप्रेंटिशिप सारख्या योजनांमधून गरीब कुटुंबातील महिलेला व बेरोजगार युवकाला वर्षाकाठी १ लाख रुपये देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
हेही वाचा 

Back to top button