‘प्रेमदिवानी’ला ‘Love Brain’ झाल्‍याचे निदान! जाणून घ्‍या या आजाराविषयी | पुढारी

'प्रेमदिवानी'ला 'Love Brain' झाल्‍याचे निदान! जाणून घ्‍या या आजाराविषयी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : प्रेम..मानवी मनातील एक उत्कट भावना! प्रेम या अडीच अक्षरी शब्‍दाला इंग्रजीत लव्‍ह म्‍हणतात. आता तुम्‍ही म्‍हणाल, हा काय बाळबोधपणा? हे सर्वांनाच माहित आहे; पण हे सांगायचे कारण म्‍हणजे याच प्रेमाचा अतिरेक झाल्‍याने चीनमधील एका १८ वर्षाच्या तरुणीला ‘लव्ह ब्रेन’ (Love Brain) नावाचा आजार झाल्याचे निदान डॉक्‍टरांनी केले आहे. प्रेमाच्‍या उत्‍कट भावनेत आकंठ बुडालेल्‍या तरुणीने आपल्‍या प्रियकराला दररोज शेकडो फोन आणि मेसेज पाठवण्‍यास सुरुवात केली. एक दिवस तर कहरच झाला, तिने प्रियकराला १०० हून अधिकवेळा फोन केले आणि तेवढेच मेसेजही केले. त्‍याच्‍याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर तिने घरात गोंधळ घालायला सुरुवात केली. इमारतीच्‍या बाल्कनीतून उडी मारण्याची धमकीही दिले. अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्‍टरांनी तरुणीला लव्ह ब्रेन झाल्‍याचे निदान केले. जाणून घ्या या आजाराविषयी…

‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने दिलेल्‍या वृत्तानुसार, शिओयू ही १८ वर्षांच्या तरुणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध आहेत. मागील काही दिवसांपासून तिच्‍या वागणुकीत अचानक बदल झाला. ती प्रेमात आकंठ बुडाली होती. ती आपल्‍या प्रियकरासोबत प्रत्‍येक गोष्‍ट शेअर करु लागली. ती त्‍याच्‍यावर पूर्णपणे अवलंबून राहू लागली. सातत्‍याने तो कोठे आहे? काय करत आहात? यासाठी दिवसातून शेकडो वेळा कॉल आणि मेसेज करू लागली.

बॉयफ्रेंडला १०० हून अधिकवेळा फोन, घरात तोडफोड …

एक दिवस तर कहरच झाला. शिओयूने आपल्‍या प्रियकराला एका दिवसात १०० पेक्षा अधिकवेळा फोन केला. त्‍याने उत्तर दिले नसल्याने ती प्रचंड अस्वस्थ झाली. तिने घरातील साहित्‍याची तोडफोड सुरु केली. अखेर स्‍वत:च्‍या सुरक्षिततेसाठी प्रियकराने पोलिसांकडे धाव घेतली. याची माहिती मिळताच शिओयूने इमारतीच्‍या बाल्कनीतून उडी मारण्याची धमकी दिल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणीला ताब्यात घेतले. तिची मानसिकस्‍थिती ठीक नसल्‍याचे त्‍यांच्‍या निदर्शनास आलं. त्‍यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. डॉक्‍टरांनी तिला लव्ह ब्रेन डिसीज असल्याचे निदान केले.

संबंधित बातम्या

‘Love Brain’ म्‍हणजे काय?

लव्ह ब्रेन ही काही मेडिकल सायन्‍समधील संज्ञा नाही; पण प्रेमीयुगुलांमधील प्रेमाची मोठी उत्कटता हा एक प्रकारे मानसिक विकारच मानला जातो. याला बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसऑर्डर असे म्‍हणतात. या आजारात एखाद्या व्‍यक्‍तिवरील प्रेम इतके वरचढ होते की, हा विकार झालेल्‍या व्यक्तीला आपल्‍याला प्रिय असणारी व्‍यक्‍ती सतत आपल्या सोबतच राहावी असे वाटते. तसेच ही व्‍यक्‍ती सोबत नसेल तर ती काय करत असेल, याबद्दलही सर्वकाही जाणून घ्यायची प्रचंड उत्‍सुकता असते. अशा प्रकारच्या बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसऑर्डरला लव्‍ह ब्रेन ही संज्ञा वापरली जाते.

‘लव्‍ह ब्रेन’ हा आजार का होतो?

सध्‍या शिओयूवर मानसिक उपचार सुरु आहेत. तिच्‍यावर उपचार करणारे डॉ. डू ना यांनी सांगितले की, लव्‍ह ब्रेन हा विकार काहीवेळा चिंता, नैराश्य आणि इतर परिस्थितींसोबत होऊ शकतो. अशा परिस्थिती बालपणातील मानसिक तणावाशी संबंधित असू शकता. बहुतांशवेळा ज्‍या मुलांचे बालपणात आपल्‍या पालकांबरोबर चांगले संबंध नसतात त्‍यांना हा विकार होण्‍याची शक्‍यता असते, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

हेही वाचा :

 

 

Back to top button