प्रेमळ हिंसा नेहमी असते घातक! का ते जाणून घ्या? | पुढारी

प्रेमळ हिंसा नेहमी असते घातक! का ते जाणून घ्या?

डॉ. प्रदीप पाटील, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट व कौन्सेलर

तिचे एका मुलावर प्रेम आहे. तो आमच्या जातीचा नाही; शिवाय त्याचे बॅकग्राऊंड खूपच खराब आहे.
त्या 15 वर्षांच्या मुलीचे पप्पा मला सांगत होते.
तिला आम्ही खूप समजाऊन सांगतोय, पण ती ऐकत नाही!
मग काय केलंत तुम्ही..?- मी विचारले.
तीचे कॉलेज बंद केले. तरीही ती चोरून त्याला फोन करताना सापडली. म्हणून तिला दोन कानाखाली ठेवून दिल्या.-पप्पा म्हणाले.
मग थांबलं का सगळं?-मी विचारले.
नाही ना… मैत्रिणीच्या घरी जाते म्हणून गेली आणि त्याला भेटून आली. मग माझं डोकं सणकलं. तिला तर मार दिलाच; पण तिच्या प्रियकरालाही झोडपून काढलो..

समाजमान्य हिंसा !

पप्पांना, मारहाण करणे हा कौटुंबिक हिंसाचार वाटत नाही. कॉलेज बंद करणे हा छळ वाटत नाही. आपल्याच नातेवाईकांनी छळ किंवा हिंसाचार करणे यात गैर काहीच न वाटणे हे हिंसा समाजमान्य झाल्याचे धोकादायक लक्षण आहे! प्रेमात तो आणि ती गेले वर्षभर आहेत. पण, अलीकडे सारखी भांडणं सुरू आहेत…ती अमुक मुलाशी का बोलली म्हणून…तो उठसूट संशय घेतो म्हणून…रात्री व्हॉटस्अ‍ॅपवर ती एक वाजेपर्यंत होती म्हणून…त्याला फोन केला, तर सारखं कामात आहे म्हणून फोन सारखा कट करतो म्हणून…वगैरे वगैरे वगैरे.

धोकादायक लक्षणे!

त्यातून त्याने तिला भर रस्त्यात देखील मारहाण सुरू केली. ती त्याला फोनवर बोलून बोलून मानसिक छळ करत राहिली. एकदा तर त्याला वाटले तिला मारून टाकावे! इंटिमेट पार्टनरचा व्हायलन्स यात गैर काहीच न वाटणे हे हिंसा समाजमान्य झाल्याचे धोकादायक लक्षण आहे! हा कौटुंबिक हिंसाचार अनेक वळणांनी चालू राहतो. जसे की, शारीरिक मारहाणीने, शाब्दिक छळाने, आर्थिक बंदी घालून, भावनिक अत्याचार करून, लैंगिक बळजबरी आणि शोषण करून!

जिवलगी दहशतवाद!

हा एक प्रकारचा जिवलगी दहशतवाद असतो. जबरदस्तीने जोडीदारास आपल्या कह्यात ठेवण्याचा आततायीपणा असतो. हे बहुसंख्येने पुरुष करतात. यातून स्त्रियांना हॉस्पिटलात अ‍ॅडमिट होण्यापर्यंत परिस्थिती उद्भवते. काही वेळा घरातून हाकलून दिले जाते. पुरुषांचा होणारा छळ सहसा नोंदवला जात नाही. पण, ते त्याऐवजी स्त्रीला किंवा जोडीदारणीला रागाने घातक शारीरिक इजा करतात. थोडक्यात, स्त्रिया स्वतःचा बचाव करण्यासाठी व प्रतिक्रिया म्हणून कमी हिंसा करतात; तर पुरुष दीर्घकाळ स्त्रियांना मारहाण करत छळत राहतात.

व्यसनाधीनतेकडे!

दर तीन स्त्रियांपैकी एकीला तरी या हिंसेला तोंड द्यावे लागते, असे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटले आहे. सातत्याने होणार्‍या या कौटुंबिक हिंसाचारामुळे व्यसनाकडे वळणार्‍यांचे प्रमाण लक्षणीय आहे. सगळ्यात जास्त संख्येने तंबाखूच्या वा गुटखा-माव्याच्या व्यसनाच्या आहारी जाणे घडत आहे. यातून डिप्रेशन, चिंता विकृती, पोस्ट ट्रुमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डर आणि आत्महत्या यांनी जीवन नकोसे होते. स्त्रियांना नको असलेल्या गर्भधारणेस सामोरे जावे लागते किंवा एड्स रोगाची लागण होते.

घरगुती हिंसाचार ओळखण्याच्या मानसिक चाचण्या असतात. उदाहरणार्थ, एच आय टी एस (हिट्स) म्हणजे, हर्ट (इजा), इंसल्ट (अपमान), थ्रेटन (धमक्या) व स्क्रीम (किंचाळून आरडाओरडा करणे). प्रेमळ हिंसा नेहमीच घातक असते, हे विसरू नका!

Back to top button