Chamari Athapaththu : सामना एक, ‘विक्रम’ अनेक..! अटापट्टूच्‍या खेळीने श्रीलंकेचा ऐतिहासिक विजय | पुढारी

Chamari Athapaththu : सामना एक, 'विक्रम' अनेक..! अटापट्टूच्‍या खेळीने श्रीलंकेचा ऐतिहासिक विजय

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : क्रिकेट खेळातील प्रत्‍येक चेंडू हा कोणत्‍या तरी नव्‍या विक्रमाकडेच वाटचाल करत असतो, असे म्‍हटलं जाते. या वाक्‍याची प्रचिती श्रीलंका विरुद्‍ध दक्षिण आफ्रिका सामन्‍यात प्रेक्षकांना आली. या दोन संघात सुरु असणार्‍या वनडे मालिकेतील दुसर्‍या सामन्‍यात नेमकं काय घडलं याविषयी जाणून घेवूया..

दक्षिण आफ्रिका कर्णधार वोल्वार्डची दमदार खेळी

या सामन्‍यात श्रीलंकेचा कर्णधार चमरीने नाणेफेक जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्डने 147 चेंडूंत 23 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद 184 धावा केल्या. महिला एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील खेळाडूची ही पाचवी वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे. वोल्व्हर्टच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांत 5 बाद 301 धावा केल्या. श्रीलंकेची कर्णधार चमरीनेही दक्षिण आफ्रिकेची कर्णधार वोलवार्टसारखीच तुफानी खेळी केली. चमरीने 139 चेंडूंच्या खेळीत 26 चौकार आणि पाच षटकार ठोकले. तिच्‍या स्‍फोटक खेळीमुळे श्रीलंकेने अवघ्या 44.3 षटकांत चार गडी गमावून लक्ष्य गाठले.

महिला वन-डेमध्‍ये ‘अशी’ कामगिरी करणारा श्रीलंका ठरला पहिला संघ

300 हून अधिक धावांचे लक्ष्य यशस्वीपणे गाठणारा श्रीलंका संघ महिला एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील पहिला संघ ठरला आहे. तसेच या संघाने ऑस्ट्रेलियाचा १२ वर्षे जुना विक्रमही माोडित काढला आहे. २०१२ मध्ये ऑस्‍ट्रेलियाच्‍या महिला संघाने न्यूझीलंडविरुद्ध २८९ धावांचे लक्ष्य गाठले होते. यापूर्वी महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक यशस्वी लक्ष्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. याशिवाय श्रीलंकेची धावसंख्या ही महिला क्रिकेटमधील एकत्रित सर्वोच्च धावसंख्या आहे. तत्पूर्वी, 2017 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने दिलेल्या 374 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने नऊ गडी गमावून 305 धावा केल्या होत्या.

Chamari Athapaththu :पाठलाग करताना दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या

श्रीलंकेचा कर्णधार चमरीच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. पुरुष आणि महिला वनडे क्रिकेट इतिहासात धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणारी ती दुसरी खेळाडू ठरली आहे. तिने माजी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू शेन वॉटसनला मागे टाकले आहे. वॉटसन याने २०११ मध्ये नाबाद १८५ धावांची खेळी केली होती. ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल आहे, ज्याने गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध पाठलाग करताना नाबाद 201 धावा केल्या होत्या. महिला क्रिकेटमध्ये नाबाद 152 धावा करणाऱ्या मेग लॅनिंगला मागे टाकत चमरी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली आहे.

प्रथमच दोन्ही संघांच्‍या कर्णधारांनी केल्‍या १७५ पेक्षा अधिक धावा

एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन्ही संघांच्या कर्णधारांनी एकाच सामन्यात 175 हून अधिक धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या सामन्यात वोलवॉर्टने नाबाद 184 धावा केल्या आणि अटापट्टूने नाबाद 195 धावा केल्या. दोन्ही खेळाडूंनी मिळून एकूण 379 धावा केल्या, जे एकदिवसीय क्रिकेटमधील कर्णधारांची सर्वोच्च धावसंख्या आहे. या प्रकरणात चमरी आणि वोल्वार्ड यांनी विराट कोहली आणि अँजेलो मॅथ्यूजला मागे टाकले आहे. या दोघांनी 2014 मध्ये 278 धावा केल्या होत्या. त्या सामन्यात विराट कोहलीने नाबाद 139 धावा केल्या होत्या, तर तेवढ्याच धावा मॅथ्यूजनेही केल्‍या होत्‍या.

एकापेक्षा जास्त वेळा १७५+ धावा करणारा खेळाडू बनला

महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये 175 पेक्षा जास्त धावा करणारी चमरी ही पहिली खेळाडू ठरली आहे. यापूर्वी तिने 2017 च्या विश्वचषक सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 178 धावांची खेळी केली होती.

Chamari Athapaththu : अटापट्टूच्‍या खेळीने श्रीलंकेचा ऐतिहासिक विजय

श्रीलंकेच्या महिला संघाची कर्णधार चमरी अटापट्टूने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात १९५ धावांची विक्रमी खेळी करत संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. चमरीच्या या विक्रमी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने महिला वनडे इतिहासातील सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग केला. चमरीच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेचा सहा गडी राखून पराभव केला आणि तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

हेही वाचा :

 

 

Back to top button