INDW vs AUSW : ऐतिहासिक योगायोग! 24 डिसेंबरला भारतीय पुरुष-महिला क्रिकेटमध्ये नेमके काय घडले? | पुढारी

INDW vs AUSW : ऐतिहासिक योगायोग! 24 डिसेंबरला भारतीय पुरुष-महिला क्रिकेटमध्ये नेमके काय घडले?

पुढारी ऑनलाईन डेस्क : INDW vs AUSW : भारतीय क्रिकेटच्या इतिहासात 24 डिसेंबरचा दिवस सुवर्ण अक्षरांमध्ये नोंदवला गेला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाचा एकमेव कसोटीत 8 विकेट्सने पराभव केला. या विजयासह इतिहास रचला गेला. लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघाचा कांगारूंविरुद्धचा हा पहिला विजय ठरला आहे. या विजयासह एक विलक्षण असा ऐतिहासिक योगायोग जुळून आला आहे. भारतीय पुरुष संघाने देखील 1959 च्या 24 डिसेंबरलाच ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी विजयाची नोंद केली होती. ही वस्तुस्थिती थोडी आश्‍चर्यकारक असली तरी ती खरी आहे.

गुलाबबाई रामचंद यांच्या नेतृत्वाखाली भारताने 1959 मध्ये ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा कसोटी क्रिकेटमध्ये पराभूत केले. जसुभाई पटेल यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर हा इतिहास रचण्यात भारताला यश आले. त्या सामन्यात भारताने कांगारूंचा 119 धावांनी पराभव केला होता. जसुभाई पटेल यांनी या काळात एकूण 14 विकेट घेतल्या होत्या आणि ते भारताच्या विजयाचे हिरो ठरले होते.

तब्बल 64 वर्षांनी महिलांच्या सामन्यात देखील एका गोलंदानेच ऑस्ट्रेलियन फलंदाजीला सुरुंग लावण्याची किमया केली आहे. फिरकीपटू स्नेह राणाने ही भूमिका बजावली. या ऑफस्पिनरने पहिल्या डावात तीन आणि दुसऱ्या डावात चार असे एकूण 7 बळी घेतले. या चमकदार कामगिरीसाठी तिला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने गौरविण्यात आले.

तत्पूर्वी या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेला ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात 219 धावांवर सर्वबाद झाला. ताहलिया मॅकग्रा ही अर्धशतक झळकावणारी एकमेव फलंदाज होती. भारताकडून पूजा वस्त्राकरने 4 आणि स्नेह राणाने 3 बळी घेतले. दिप्ती शर्मालाही दोन विकेट्स मिळाल्या.

ऑस्ट्रेलियाच्या 219 धावांसमोर भारताने स्मृती मानधना (74), ऋचा घोष (52), जेमिमाह रॉड्रिग्स (73) आणि दिप्ती शर्मा (78) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पहिल्या डावात 406 धावा केल्या. पहिल्या डावानंतर भारताने पाहुण्यांवर 187 धावांची आघाडी घेतली.

ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात भारताला केवळ 74 धावांची आघाडी मिळवता आली. त्यांचा संपूर्ण संघ 261 धावांवर आटोपला. अशाप्रकारे भारताला विजयासाठी 75 धावांचे माफक लक्ष्य मिळाले. जे यजमान संघाने 2 विकेट गमावून गाठत विजयाचा इतिहास रचला.

Back to top button