आरटीई प्रवेशाचे अर्ज आजपासून भरता येणार : पालकांना अर्जासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत | पुढारी

आरटीई प्रवेशाचे अर्ज आजपासून भरता येणार : पालकांना अर्जासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार, याकडे राज्यभरातील पालकांचे लक्ष लागले होते. आता आरटीईअंतर्गत विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया सुरू होत असून, पालकांना आजपासून (दि. 16) ते 30 एप्रिल या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरता येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे. एखाद्या पालकाला प्राधान्यक्रम म्हणून अनुदानित शाळेऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेची किंवा शासकीय शाळेची निवड करायची असल्यास पालकाच्या प्राधान्यक्रमानुसार संबंधित शाळा निवडता येणार आहे. आरटीई प्रवेशासाठी महापालिकेच्या शाळा, नगरपालिका शाळा, नगरपरिषद शाळा, नगरपंचायत शाळा, कटक मंडळाच्या शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महापालिकेच्या स्वयंअर्थसाहाय्यित शाळा, खासगी अनुदानित शाळा आणि स्वयंअर्थसाहाय्यित याच शाळांमध्ये प्रवेश दिले जाणार आहेत. अल्पसंख्याक शाळांमध्ये प्रवेश दिले जाणार नाहीत.

पालकांनी प्राधान्यक्रम लक्षात घ्यावा

शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित, दुर्बल, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांतील विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत प्रवेश दिले जातात. शालेय शिक्षण विभागाने यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेत बदल केला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांची शाळा नसेल तरच एक किलोमीटरच्या अंतरावरील स्वयंअर्थसाहाय्यित शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. शाळा निवडताना अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आणि त्यानंतर स्वयंअर्थसाहाय्यित शाळा या प्राधान्यक्रमानुसार प्रवेश दिला जाणार आहे.

यंदा जागा वाढल्या

आरटीई प्रवेश प्रक्रियेत केलेल्या बदलामुळे यंदा मोठ्या प्रमाणात जागा वाढल्या आहेत. राज्यभरातील 75 हजार 974 शाळांमधील 9 लाख 72 हजार 823 जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. त्यानुसार पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 30 एप्रिलपर्यंतचा कालावधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा

Back to top button