आवाडेंचे बंड अपेक्षेप्रमाणे थंड

प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र

कोल्हापूर : हातकणंगले मतदारसंघातून भाजपचे सहायोगी आमदार प्रकाश आवाडे यांनी करू पाहिलेले बंड मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर अपेक्षेप्रमाणे थंड झाले आहे. माघारीपूर्वी त्यांनी आपल्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार आपणच असू, असा शब्द घेतला असणार, त्याशिवाय ते माघार घेणारच नाहीत. आवाडेंची नाराजी मुख्यमंत्र्यांनी दूर केली, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना सावरत जनतेवर जबाबदारी दिली आहे. महाआघाडीचे उमेदवार मंगळवारी अर्ज दाखल करतील, तेव्हा ते महायुतीच्या नेत्यांच्या आरोपांना काय उत्तर देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महायुतीकडून प्रकाश आवाडे लोकसभेसाठी इच्छुक होते; मात्र विद्यमान खासदार शिंदे शिवसेनेचे असल्याने तिकिटाचा मार्ग सुकर नाही, याची जाणीव मुरब्बी आवाडे यांना नक्कीच होती. सर्व्हेच्या आधारावर एक जागा भाजपला मिळणार, याची खात्री भाजपचे नेते खासगीत देत होते; मात्र भाजपकडे महाडिक घराण्यातील उमेदवार किंवा समरजित घाटगे हेच पर्याय होते. भाजपने राज्यसभेच्या ज्या नेत्यांना लोकसभेच्या आखाड्यात उतरण्यासाठी तयार राहा, असे सांगितले होते, त्यात धनंजय महाडिक यांचा समावेश नव्हता; कारण ते अलीकडेच राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे हा पर्याय संपला होता. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून समरजित घाटगे यांचे नाव चर्चेत असले तरी समोर काँग्रेसचे उमेदवार म्हणून शाहू महाराज आहेत, त्याचाही विचार झाला असणार. कारण पक्ष सांगेल ते अशी सावध भूमिका सुरवातीपासून घाटगे यांनी घेतली होती, तर विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी नाकारणे कठीण होते.

इचलकरंजीतून आवाडेंना हवी महायुतीची उमेदवारी

याचदरम्यान ताराराणी पक्षाच्या वतीने आपण हातकणंगले लोकसभा लढविणार अशी भूमिका भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे यांनी जाहीर केली. खरे तर बंड करण्यापूर्वी त्यासाठी जी काही तयारी करावी लागते ती त्यांनी केली होती का, या प्रश्नाच्या उत्तरातच त्यांच्या बंडाचे उत्तर लपले आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजपचे सुरेश हाळवणकर यांचा पराभव करून प्रकाश आवाडे विजयी झाले. विजयाचा गुलाला लागताच त्यांना भाजपला पाठिंबा जाहीर केला. आता 2024 च्या निवडणुकीत त्यांना महायुतीची विशेषत: भाजपची उमेदवारी हवी आहे, हे लपून राहिलेले नाही.

बंडामागे आमदारांची ताकद नव्हती

सुरुवातीला मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव त्यांनी नाकारला. नंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आवाडे यांच्या संभाव्य बंडखोरीचे प्रकरण सोपविण्यात आले; मात्र एकच दिवसात मुख्यमंत्र्यांसमोर आवाडेंनी बंडाची तलवार म्यान केली. सुरुवातीला आवाडे, विनय कोरे व राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची चर्चा झाली होती. त्यामुळे हातकणंगले मतदारसंघातील महायुतीच्या या तीनही आमदारांचा आवाडेंच्या बंडामागे हात आहे का, अशी शंका यावी, अशी परिस्थिती तयार झाली; मात्र मुख्यमंत्र्यांशी बोलताना विनय कोरे यांनी आपण प्रकाश आवाडे यांना पक्षाकडे उमेदवारी मागणे चूक नाही; मात्र उमेदवार जाहीर झाल्यानंतर बंडाची भाषा योग्य नाही. आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील त्याप्रमाणे वागणार, असे सांगितले व आवाडे यांच्या बंडाच्या शिडातील हवाच निघून गेली. तीन आमदारांचा बंडाला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट झाले.

मुख्यमंत्र्यांनी केली निवडणूक प्रतिष्ठेची

आता उमेदवारी अर्ज दाखल करत रणांगण सुरू झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही जागा प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. शनिवारी कोल्हापुरात आलेले मुख्यमंत्री रात्रभर निवडणुकीच्या जोडण्या लाऊन रविवारी पहाटे परतले. तर पुन्हा सोमवारी सकाळी आपल्या पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थीत राहीले. त्यापूर्वी आवाडे यांचे बंड थंड करत त्यांनी आवाडेना पक्षाच्या व्यासपीठावर आणले.त्यानी आपल्या पक्षाच्या उमेदवारंचा मार्ग निष्कंटक केला. आता जबाबदारी उमेदवार व स्थानिक नेत्यांची आहे. मुख्यमंत्र्यांच्या उमेदवाराविरूध्द त्याच आघाडीतील नेत्यानी बंड करणे तेवढी सोपी गोष्ट नव्हती.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रयतेची निवडणूक असल्याचे सांगुन आपल्या पक्षाच्या नेत्यांना सेफ केले आहे. अजित पवार यांच्या वक्तव्यात अनेक अर्थ दडले आहेत.

महायुती व महाविकास आघाडीपासून समान अंतरावर राहण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची इच्छा या दोघांनीही पूर्ण केली आहे. त्यामुळे स्वाभिमानीतर्फे निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या शेट्टी यांना त्यांचेच सहकारी सदाभाऊ खोत यांनी महायुतीच्या व्यासपीठावरून डिवचले आहे. निवडणूक आली की, शेट्टी यांना बैलगाडी आठवते, अशी टीका खोत यांनी केली; मात्र कोणाच्याही आरोपाला उत्तर देत नसल्याचे सांगून शेट्टी यांनी सदाभाऊंना रिटर्न गिफ्ट दिले आहे. महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळविण्यात आपल्याला सतेज पाटील व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा विरोध असल्याचा आरोप मात्र त्यांनी केला.

आवाडे यांना भाजपकडून उमेदवारीचा शब्द

प्रकाश आवाडे यांनी बंडखोरीची घोषणा केल्यानंतर शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी चर्चा केली. रविवारी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश आवाडे यांच्याशी चर्चा केली. सोमवारी पुन्हा मुख्यमंत्री शिंदे यांनी आवाडे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आवाडे यांनी माघार घेतली. या चर्चेच्या सर्व प्रक्रियेत आवाडे यांना इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारीचा शब्द देण्यात आल्याचे समजते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news