कोल्हापूर: शिरोळमध्ये ‘केवायसी’ अभावी नागरिकांचे बँकेत हेलपाटे | पुढारी

कोल्हापूर: शिरोळमध्ये 'केवायसी' अभावी नागरिकांचे बँकेत हेलपाटे

विनोद पुजारी

नृसिंहवाडी: राष्ट्रीयकृत बँकेत सेंट्रल केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील बँक ऑफ इंडियासह राष्ट्रीयकृत बँकांच्या बहुसंख्य शाखांमध्ये नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत.

बँक ऑफ इंडियाच्या दोन मुख्य शाखा आणि काही ग्राहक सेवा केंद्रे तालुक्यात कार्यरत आहेत. राष्ट्रीयकृत बँक असल्याने शाखांमध्ये निवृत्तीवेतन, कृषी अनुदान, पीक कर्ज अशा सुविधांसाठी मोठी गर्दी असते. एका शाखेतच ५० हजारांहून अधिक खाती आहेत. सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याने आरबीआयने दर दोन वर्षांनी केवायसी करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे केवायसी अभावी बँकेकडून अनेक खाती गोठविण्यात आली आहेत. केवायसीचा अर्ज, आधारकार्ड, पॅनकार्ड अशा कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय पैसे काढणे मुश्किलीचे झाले आहे.

अशातच बँकेत अनेक पदे रिक्त असल्याने कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे. कर्मचारी वर्ग ग्राहकांच्या प्रश्नाची नीट उत्तरे देत नाही. आपण त्यांच्याशी बोला यांच्याशी बोला असे सांगण्यात येते, अशी तक्रार ठेवीदार, सभासद, कर्जदार ग्राहकांनी ‘दैनिक पुढारी’शी बोलताना केली. केवळ राष्ट्रीयकृत बँक असल्याने व्यवहार करणे बंधनकारक असल्याची भावना अनेकांनी मांडली. पैसे काढण्याच्या एका स्लीपवरून ५० हजार रुपये काढता येण्याची मर्यादा घालण्यात आली आहे. त्यामुळे अनेक अशिक्षित लोकांना वारंवार स्लीपा भरण्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पैसे काढण्यासाठी तासन् तास रांगेमध्ये थांबल्यानंतरही केवायसी नसल्याने पैसे मिळत नाहीत. त्यामुळे लांबून आलेल्या ग्राहकांना माघारी परतावे लागते. केवायसी करून घेण्याबद्दल तसेच बदललेल्या नियमांबाबत बँकेने ग्राहकांना माहिती द्यावी, जेणेकरून हेलपाटे वाचतील. कर्मचारी वर्गाने ग्राहकांना सौजन्याची व सहकार्याची वागणूक द्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

बँक ऑफ इंडियाच्या कुरुंदवाड शाखेने ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या सेवा देण्याची सुविधा सुरू केली आहे. अनेकांचे मोबाईल नंबर लिंक नसल्याने केवायसीची माहिती पोहोचत नाही. त्यामुळे खातेधारकांचे नंबर लिंक करण्याचे काम सुरू आहे. बँकेत सध्या स्टाफ कमी आहे. त्यामुळे ताण पडत आहे. लवकरच शाखेतील कर्मचारी, अधिकारी यांची बैठक घेऊन योग्य त्या सुधारणा करू.

– आनंद माने, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया, कुरुंदवाड

हेही वाचा  

Back to top button