पुणे : शिरोली खुर्द येथील बालिकेवर हल्ला करणारा बिबट्या अखेर जेरबंद  | पुढारी

पुणे : शिरोली खुर्द येथील बालिकेवर हल्ला करणारा बिबट्या अखेर जेरबंद 

नारायणगाव; पुढारी वृतसेवा : संस्कृती संजय कोळेकर या दीड वर्षाच्या बालिकेला ठार करणाऱ्या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी शिरोली खुर्द येथे वन खात्याने पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात आज (दि.१२) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती जुन्नरचे वनक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दिली. पकडलेला बिबट्या नर असून त्याचे वय सुमारे आठ वर्षाचे आहे. त्याला माणिकडोह येथील निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे.

जुन्नर तालुक्यातील शिरोली खुर्द येथे संपत मोरे यांच्या शेतावर मुक्कामी असलेल्या धनगराची दीड वर्षाची चिमुरडी संस्कृती संजय कोळेकर हिला गुरुवारी (दि. ११) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बिबट्याने झडप घालून बाजूच्या उसात घेऊन पसार झाला होता. वन खात्याने तातडीने शोधाशोध केल्यावर अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या एका उसात बिबट्याने तिचा अर्धवट खाल्लेला मृतदेह सापडला होता. घटना घडल्याच्या दिवशी दुपारी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान वन विभागाने पकडलेला बिबट्या हा संस्कृती कोळेकर हिच्यावर हल्ला करणाराच असावा, असा प्राथमिक अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे. तथापी अधिकृत दुजोरा शनिवारी मिळू शकेल, असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. संस्कृतीला ज्या उसात बिबट्या घेऊन गेला होता त्याच्या बाजूलाच लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला आहे. दरम्यान परिसरात अधिक बिबटे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे असल्याने वन खात्याने १२ पिंजरे परिसरात लावले आहेत. तसेच ट्रॅप कॅमेरेही लावले असून ३० लोकांचे पथक तैनात केले आहे.

जुन्नरचे आमदार अतुल बेनके, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर व शरद सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन संस्कृतीच्या आई-वडिलांचे सांत्वन केले व वन विभागाला अधिक सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान महिन्यापूर्वी उंब्रज येथील आयुष शिंदे या मुलावर हल्ला केल्यावर बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात चौथा बिबट्या देरबंद झाला आहे. परंतु आयुषवर हल्ला करणारा बिबट्या कोणता? हे मात्र अद्याप स्पष्ठ झाले नाही.

धनगर समाजातील नागरिकांना दररोज बिबट्याचा सामना करावा लागत आहे. मेंढराच्या आशेने बिबट्या दररोजच धनगरांच्या वाड्यावर हमखास येत असतोच. दिवसभर मेंढरं सांभाळायची व रात्री बिबट्याचं राखण करीत राहायचं काय? असा संतप्त सवाल विचारला जात आहे. धनगर मंडळींना स्वसंरक्षणासाठी आवाजाच्या बंदूका देण्यात याव्यात. ही अंमलबजावणी चार दिवसात करावी अन्यथा जुन्नरच्या तहलीस कचेरीच्या आवारात ही सगळी मेंढरं ठेवली जातील, असा इशारा कुलस्वामी पतसंस्थेचे संचालक संतोष घोटणे यांनी दिला आहे.

हेही वाचा :

Back to top button