Maharashtra politics : माझ्या मुलाला ‘ईडी’चं टेन्शन! अमोल कीर्तिकरांच्या चौकशीवरून वडील गजानन कीर्तिकर संतापले | पुढारी

Maharashtra politics : माझ्या मुलाला 'ईडी'चं टेन्शन! अमोल कीर्तिकरांच्या चौकशीवरून वडील गजानन कीर्तिकर संतापले

पुढारी ऑनलाईन डेस्क : खिचडी गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांना ईडीने अनेकवेळा समन्स बजावले आहे. ते चौकशीलाही हजर राहिले आहेत. त्यांची चौकशीही पूर्ण झाली आहे. परंतु, त्यांना वारंवार चौकशीला बोलावून दबाव टाकला जात आहे, असा आरोप करून खासदार गजानन किर्तीकर यांनी संताप व्यक्त केला आहे. आज (दि.१२) ते पत्रकार परिषदेत बोलत होते. Maharashtra politics

ते पुढे म्हणाले की, भाजपचा ‘अब की बार, ४०० पार’, चा नारा म्हणजे दर्प आहे, अशी टीका करून भाजप कार्यकर्ते चुकीचे वागत आहेत. भाजपला ईडीचे प्रयोग करण्याची गरज आहे का ? असा सवाल करून विरोधी पक्षाच्या नेत्यांवर ईडीच्या कारवाई केल्यामुळे लोकांच्या मनात चीड आहे. संताप आहे. Maharashtra politics

खासदार असताना अनेक चांगले निर्णय झाले आहेत. मी युतीतून खासदार आहे, याची मला जाणीव आहे. मी  दिल्लीत असताना अनेक चांगल्या गोष्टी पाहिल्या आहेत. देशात मागील १० वर्षात अनेक चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. राम मंदिर, ३७० कलम हटवले आहे, अशी अनेक चांगली कामे पंतप्रधान मोदी यांनी प्रामाणिकपणे केली आहेत. मोदी पुढील १० वर्षे भारताचे पंतप्रधान राहावेत. त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान,  कोरोना काळात मुंबई महानगर पालिकेकडून स्थलांतरीत परप्रांतियांना तांदूळ आणि मसूरची खिचडी तयार करुन वाटप करण्यात आले होते. ५२ कंपन्यांना दिलेल्या कंत्राटानुसार चार महिन्यांत चार कोटी खिचडी पाकिटांचे वाटप करण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. यात घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी करत पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार प्राथमिक तपास करत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणात सहा कोटी ३७ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप ठेवत गुन्हा दाखल केला आहे. (Khichdi scam)

हेही वाचा 

Back to top button