Pune News : हाँगकाँगमधील रॅकेटचा पर्दाफाश: पुण्यातील ५ जणांना अटक | पुढारी

Pune News : हाँगकाँगमधील रॅकेटचा पर्दाफाश: पुण्यातील ५ जणांना अटक

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : हाँगकाँगमधून चालणाऱ्या फसवणुकीच्या रॅकेटचा पिंपरी- चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला. सायबर सेलने सापळा रचून ५ जणांना बेड्या ठोकल्या. पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांची फसवणूक करून मिळालेले ४ कोटींहून अधिक रुपये क्रिप्टोकरन्सीद्वारे हॉंगकॉंगमधील आरोपीला पाठवल्याचे तपासात समोर आले आहे. Pune News

जुनेद मुख्तार कुरेशी (वय २१, रा. टिंगरे नगर, पुणे), सलमान मन्सूर शेख (वय २२, रा. इंदिरानगर, लोहगाव रोड, पुणे), अब्दुल अजीज अन्सारी (वय २३, रा. इंदिरा नगर, लोहगाव रोड, पुणे), आकिफ अन्वर आरिफ अन्वर खान (वय २९, रा. कोंढवा खुर्द, पुणे), तौफिक गफ्फार शेख (वय २२, रा. इंदिरानगर, लोहगाव रोड, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. Pune News

गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुसगाव येथील एका महिलेला इंस्टाग्रामवर शेअर मार्केट क्लासेस आणि शेअर मार्केट गुंतवणूक संदर्भात एक जाहिरात दिसली. महिलेला यामध्ये आवड असल्याने त्यांनी जाहीरातीच्या लिंकवर क्लिक केले. त्यानंतर महिलेला फिर्यादीला एका व्हाट्स अप ग्रुपला जॉईन करण्यात आले. इन्स्टिट्यूशनल डी मॅट अकाउंट काढण्यासाठी अनोळखी आरोपींनी एक फॉर्म पाठवला. त्यानंतर शेअर मार्केट मध्ये नव्याने येणाऱ्या कंपन्यांचे आयपीओ खरेदी करण्यासाठी फिर्यादीकडून आरोपींनी वेगवेगळ्या बँक खात्यावर ३१ लाख ६० हजार रुपये घेतले. फिर्यादी यांनी काही दिवसानंतर गुंतवलेली रक्कम परत मागितली असता ती रक्कम देण्यासाठी आरोपींनी चॅरिटी डोनेशन म्हणून आणखी चार लाख रुपये घेतले.

या गुन्ह्याचा तपास करताना बँक खात्यांचे सायबर सेलने तांत्रिक विश्लेषण केले. त्यानुसार, बँक खाते हाताळणारे आरोपी निष्पन्न करून पोलिसांनी पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून सात मोबाईल फोन, रोख रक्कम मोजण्याची मशीन, आठ डेबिट कार्ड, १२ चेकबुक, एक पासबुक आणि सात लाख रुपये रोख रक्कम जप्त केली.

Pune News  : १२० बँक खात्यांची चाचपणी

अटक आरोपींकडे तब्बल १२० बँक खात्यांचे तपशील आढळून आले. त्या सर्व खात्यांवर आरोपींनी फसवणुकीच्या वेगवेगळ्या प्रकारणांमधील पैसे घेतले आहेत. बँक खात्यात पैसे आल्यानंतर आरोपी ते पैसे काढून घेत. त्यानंतर ते युएसडीटी या क्रिप्टोकरन्सी मार्फत हॉंगकॉंग या देशात पाठवत होते. आरोपींनी आत्तापर्यंत चार कोटी रुपयांहून अधिक पैसे हॉंगकॉंग येथे त्यांच्या म्होरक्याला क्रिप्टोच्या माध्यमातून पठवल्याचे समोर आले आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे ७५ पेक्षा अधिक तक्रारींची नोंद आहे.

हँगकाँगच्या जाहिरातींची भुरळ

या प्रकरणातील मुख्य आरोपी ग्रेग हा हॉंगकॉंग येथे वास्तव्यास आहे. तिथून तो हे फसवणुकीचे नेटवर्क चालवतो. हॉंगकॉंग मधून सोशल मीडियासाठी जाहिराती आणि लिंक तयार केल्या जातात. या जाहिरातींना भुलून संपर्क केल्यास नागरिकांना फोन येण्यास सुरुवात होते.

  यांनी केली कामगिरी

ही कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त (गुन्हे) विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण यांनी केली.

हेही वाचा 

Back to top button