‘जेम्स वेब’ने लावला अनेक ‘उडाणटप्पू’ ग्रहांचा शोध | पुढारी

‘जेम्स वेब’ने लावला अनेक ‘उडाणटप्पू’ ग्रहांचा शोध

वॉशिंग्टन : काही लोक कोणत्याही हेतूशिवाय उगीचच इकडे तिकडे हिंडत आणि खोडसाळपणा करीत असतात. अशा ‘उडाणटप्पू’ लोकांसारखे चक्क काही ग्रह जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने शोधले आहेत. या शेकडो रहस्यमय ग्रहांबाबत सातत्याने संशोधन सुरू होते व आता त्यांचे रहस्य उलगडण्यात आले आहे.

हे सर्व ग्रह विचित्र आणि अंतराळात इतस्ततः तरंगत फिरणारे आहेत. यापैकी अनेक ग्रहांना स्वतःचा तारा नाही, ज्याच्याभोवती ते विशिष्ट कक्षेत फेर्‍या मारतील. अशा ग्रहांना ‘फ्री-फ्लोटिंग प्लॅनेटस्’ (एफएफपी) असेही म्हटले जाते. त्यामध्ये आपल्या ग्रहमालिकेतील सर्वात मोठा ग्रह असलेल्या गुरूच्या आकाराच्या जुळ्या ग्रहांचा समावेश आहे. हे दोन ग्रह एकमेकांभोवतीच प्रदक्षिणा घालतात. आता हे जुळे ग्रह कसे बनले असतील याचे गूढ उकलण्यात यश आले आहे.

हवाईमधील युनायटेड किंगडम इन्फ्रारेड टेलिस्कोपच्या साहाय्याने या विचित्र अशा जुळ्या ग्रहांना शोधण्यात आले होते. त्यानंतर अशाप्रकारचे अनेक ग्रह शोधण्यात आले. जेम्स वेब अंतराळ दुर्बिणीने तर पाचशेपेक्षाही अधिक असे ग्रह ‘ओरियन नेब्युला’मध्ये शोधले. विशेष म्हणजे, त्यापैकी 80 ग्रह गुरूपेक्षा 0.7 ते 13 पट अधिक वस्तुमान असलेले आहेत, जे जोडी बनवून एकमेकांभोवतीच फिरतात. एका सिद्धांतानुसार, असे वेगवेगळे ग्रह कालांतराने एकत्र येऊन जोड्या बनवतात, तर दुसर्‍या सिद्धांतानुसार ज्यावेळी वायू आणि धुळीचे ढग त्यांच्या स्वतःच्या गुरुत्वाकर्षणामुळे धडकतात त्यावेळी असे ग्रह बनतात. काहींच्या मते, जवळून जाणार्‍या एखाद्या तार्‍याच्या गुरुत्वाकर्षणामुळेही असे ग्रह खेचले जात असतात.

Back to top button