तडका : वयम् मोठम् खोटम्..! | पुढारी

तडका : वयम् मोठम् खोटम्..!

राजकारण असो समाजकारण असो किंवा कुटुंब संस्था असो, आज कोणीही म्हातारे व्हायला तयार नाही, हे एक कटू वास्तव आहे. खानदेशातील एक नेते कितीतरी वर्षे एका पक्षात होते. त्यानंतर काही कारणामुळे त्यांना घरी बसावे लागले. त्यानंतर विविध कारणांमुळे त्यांनी तो पक्ष सोडला आणि दुसर्‍या पक्षात गेले. नवीन आणि विरुद्ध विचारसरणीच्या पक्षात आमदारकी मिळवून चार वर्षे झाल्यानंतर त्यांना पुन्हा साक्षात्कार झाला की, पहिलाच पक्ष चांगला होता. मग त्यांनी स्वगृही परतण्याची खटपट सुरू केली. अर्थात, जुन्या मित्रांनी त्यांना साथ दिली आणि लवकरच ते आपल्या मूळ पक्षात म्हणजे स्वगृही येत आहेत. स्वतःला नीट चालता येत नाही, गुडघे पार कामातून गेलेले आहेत, वय अमृतमहोत्सवी वर्षाच्या जवळपास पोहोचले आहे, तरी अजूनही आपण कोलांटउड्या मारू शकतो हा जबरी आत्मविश्वास येतो कुठून, हे मात्र रहस्यच आहे. चाळीस-पन्नास वर्षे आपण राजकारणात काढली, सगळी पदे भूषवली, त्याच बरोबर कुटुंबातील सर्वांना पदे मिळवून दिली, तरी अजूनही मला काहीतरी द्या, हा अट्टहास देशात सर्वत्र सुरू आहे.

पूर्वीच्या काळी बरे होते. आयुष्याचे 75 वे वर्ष येण्यापूर्वी राजकारणी लोक आपल्या मुलाबाळांना सेटल करून देत असत आणि त्यानंतर निसर्गोपचार केंद्र म्हणून एखाद्या राज्यामध्ये राज्यपाल म्हणून पाच एक वर्षे काढत असत. दरम्यान, त्यांचे वय 80 च्या पुढे सरकत असे. त्यानंतर कालांतराने अमुकतमुक निवर्तले, अशी छोटीशी बातमी येत असे. शेवटी आयुष्य म्हणजे असते तरी काय? जन्मापासून मृत्यूपर्यंतचा एक थांबा.

तुम्हा आम्हा सर्वसामान्य लोकांना कुटुंब चालवणे, मुलाबाळांना शिकवणे, त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करणे आणि निवृत्त झाल्यानंतर देवाचे नाव घेत शेवटचा दिवस गोड करणे एवढेच असते; परंतु राजकारणी लोकांचे वेगळेच असते. त्यांना बर्‍याच लोकांचे हिशेब सेटल करायचे असतात. त्यासाठी ते आयुष्यभर आटापिटा करत असतात. डाय लावला, फेशियल केले तरीही प्रत्येकाची गळ्यापाशी असलेली त्वचा ढिली पडत असते आणि तिथेच त्यांचे वय दिसत असते. विशेषत: चालताना गुडघे साथ देत नाहीत आणि चालीवरून समजते की, तुमचे वय किती आहे ते.

संबंधित बातम्या

राजकारणाच्या चाली मात्र वेगळ्या असतात. त्या नेहमी तिरक्या आणि उतारवयात चुकीच्या असतात. वयस्कर माणसाने योग्य वेळी स्वभावात गोडवा आणला नाही तर झाडावरच पिकून फळ खाली पडण्याची शक्यता असते. आता माझे सर्व व्यवस्थित झाले आहे, आता मी फक्त आशीर्वाद देईन, सर्वांप्रति सद्भावना ठेवेन, तरुण लोकांना मार्गदर्शन करेन, असा काही भाव आजकाल कोणामध्ये दिसत नाही. मागच्या इलेक्शनला त्याने मला पाडले आहे, याचा एक ना एक दिवस बदला घेण्याची खुमखुमी 80 वर्षांच्या राजकारणी माणसामध्येही असते. त्याच्या सभोवतालच्या लोकांचा नाईलाज असतो. ते बिचारे समजावून सांगतात, ‘बाबा, आजी, काका… आता पुरे करा. तुम्हाला होणार नाही’; परंतु डाय लावून किंवा कृत्रिम केस उगवून काही लोक अजूनही आपण तारुण्यात आहोत, या भ्रमात वावरत असतात.

Back to top button