सांगलीचा वाद चिघळला; चंद्रहार पाटील यांना घेऊन संजय राऊत तातडीने मुंबईला | पुढारी

सांगलीचा वाद चिघळला; चंद्रहार पाटील यांना घेऊन संजय राऊत तातडीने मुंबईला

सांगली/मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटातील जागावाटपाचा पेच काही सुटायला तयार नाही. विशेषत: सांगलीच्या जागेवरचा वाद रविवारी चिघळला. गेले तीन दिवस प्रचारासाठी सांगलीत ठाण मांडून असलेले शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना घेऊन रविवारी हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना झाले. दरम्यान, राऊत यांनी शनिवारी बोलताना सांगलीत आमची कोंडी करण्याचा प्रयत्न कराल, तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची कोंडी करू, असा इशारा दिला होता. काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी हा इशारा दिला होता.

त्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी तडाखेबंद उत्तर दिले. लोकशाही विरोधातील भाजपचे सरकार कोणत्याही परिस्थितीत पुन्हा सत्तेत यायला नको, यासाठी आम्ही कोणतेही परिणाम भोगायला तयार आहोत, अशी भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे. असे असताना राऊत यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने लहान कार्यकर्त्यासारखे वक्तव्य करू नये. त्यांनी सुधारणा करावी. सामंजस्याने मार्ग काढण्याची आमची भूमिका आहे, असे पटोले म्हणाले.

काँग्रेस श्रेष्ठीच करतील चंद्रहारची घोषणा : संजय राऊत

सांगली लोकसभा मतदारसंघात डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील आणि दोनच दिवसांत काँग्रेसच्या श्रेष्ठींकडूनही तशी घोषणा केली जाईल, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी येेथे रविवारी पत्रकारांना दिली. माजी मंत्री, आमदार डॉ. विश्वजित कदम, काँग्रेसतर्फे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व नेते आणि कार्यकर्ते चंद्रहार यांचाच प्रचार करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, मैत्रीपूर्ण लढत हा घातक शब्द आहे. एका ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करण्याचा प्रयत्न झाला, तर संपूर्ण महाराष्ट्रात तशाच प्रकारच्या मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात. माझ्या दृष्टिकोनातून सांगलीतील संपूर्ण वाद मिटलेला आहे. याबाबत विश्वजित कदम यांच्याबरोबरसुद्धा फोनवर बोलणे झाले आहे.

सांगलीचा विषय दोन दिवसांत सोडवू : पटोले

आ. विश्वजित कदम यांनी सांगलीचा विषय लावून धरला आहे. यावर बोलताना सांगली मतदारसंघाचा विषय आम्ही दोन दिवसांत संपवू. आघाडीमध्ये हा प्रश्न सामोपचाराने सोडवण्यात येईल, असे पटोले म्हणाले.

महाजन हेच मुंगेरीलाल : राऊत

राऊत म्हणाले, गिरीश महाजन हेच मुंगेरीलाल आहेत. त्यांची जागा दाखविण्यासाठी जळगावमध्ये शिवसेनेने उमेदवार उभा केलेला आहे. जळगावमध्ये शिवसेनेचाच उमेदवार विजयी होणार असून, गिरीश महाजन यांनी आपली जागा वाचवून दाखवावी. ते म्हणाले, एकीकरण समिती आणि मराठी माणसांत फूट पाडण्याचा प्रयत्न असतो. मराठी माणसांचे संघटन मजबूत करण्यासाठी त्या ठिकाणी मराठी माणसांनी निवडणूक लढवणे गरजेचे आहे.

Back to top button