नक्षलवादावर अंकुश कधी? | पुढारी

नक्षलवादावर अंकुश कधी?

देवेंद्र व्यास, विश्लेषक

सर्व प्रयत्न करूनही छत्तीसगडमधील नक्षलवादी समस्येला तोंड देणे हे एक आव्हान आहे. वेळोवेळी नक्षलवादी तेथे सक्रिय होऊन सुरक्षा दलांना आव्हान देत राहतात. आ तापर्यंत त्यांनी मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल, राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी मारले आहेत. सुरक्षा दलांनी ऑपरेशन करून अनेक नक्षलवाद्यांचा खात्माही केला आहे. तसेच नक्षल्यांच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवले जाते.

छत्तीसगडमधील विजापूरमध्ये नुकत्याच झालेल्या चकमकीत दहा नक्षलवादी ठार झाले. नक्षलवाद्यांनी मनसुबे अमलात आणण्याआधीच त्यांना टिपण्यात आले, हे सुरक्षा दलांचे मोठे यश म्हणता येईल; पण छत्तीसगडमधून नक्षलवादाचा पूर्णपणे नायनाट कसा होईल, हे सांगणे कठीण आहे. नक्षलवाद्यांवर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने कठोर दडपशाहीचा प्रयत्न केला; परंतु त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्यात यश मिळू शकलेले नाही. किंबहुना, छत्तीसगडमधील आदिवासी गटांना असे वाटू लागले आहे की, सरकार भांडवलदारांना त्यांच्या संसाधनांवर कब्जा करू देण्याचा प्रयत्न करीत आहे.

त्यामुळे आदिवासींमध्ये नक्षलवाद्यांपेक्षा सरकारविषयीच असंतोषाची भावना आहे. वास्तविक, सरकारने आपली बाजू मांडताना ही बाब स्पष्ट केली आहे की, विकास कार्यक्रम पुढे नेण्यासाठी आणि आदिवासी समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी औद्योगिक घटकांचा विस्तार आवश्यक आहे. यासंदर्भात सुरुवातीला सरकार आणि नक्षलवादी नेत्यांशी बोलणी करण्याचे प्रयत्नही करण्यात आले; मात्र त्यातून काही ठोस निष्पन्न झाले नाही. मग सरकारने आदिवासींमधूनच नक्षलवाद्यांविरुद्ध बंडखोरी आणि दडपशाहीची रणनीती आखली; पण तीही यशस्वी झाली नाही. उलट त्यामुळे रक्तपात पूर्वीपेक्षा जास्त वाढला होता.

ताज्या घटनेमध्ये छत्तीसगड राज्याच्या कांकेर जिल्ह्यातील छोटेबेठिया पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हिदूरच्या जंगलात माओवाद्यांची उपस्थिती असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी जी कारवाई केली, त्यामध्ये 10 लाख रुपयांचे बक्षीस असणार्‍या माओवादी एलजीएस कमांडर एसीएम नागेशवरला ठार मारण्यात आले आहे. यावेळी करण्यात आलेल्या शोधमोहिमेदरम्यान हिदूरच्या जंगलात कांकेर डीआरजी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. सुमारे एक तास ही चकमक सुरू होती. या चकमकीनंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त करण्यात यश आले आहे. तथापि, बस्तर फायटरचे कॉन्स्टेबल रमेश कुरेठी चकमकीत शहीद झाले.

गेल्या आठवड्यात घडलेल्या आणखी एका घटनेत छत्तीसगडमधील कांकेर येथे सुरक्षा जवानांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा घातपात करण्याचा उद्देशाने गडचिरोली-छत्तीसगडच्या सीमेलगत गेल्या काही दिवसांमध्ये नक्षलवाद्यांचा वावर वाढला असल्याचे समोर आले आहे. या नक्षलवाद्यांवर कारवाईसाठी पोलिसांनीदेखील कंबर कसली असून, प्रत्येक बारीकसारीक गोष्टीकडे पोलिस लक्ष देऊन आहेत. आधुनिक माहिती यंत्रणा, हेलिकॉप्टर आदीद्वारे नक्षलवाद्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे प्रयत्न अनेक दिवसांपासून सुरू आहेत.

नक्षलवादी गटांना मिळणारी आर्थिक मदत, उपकरणे इत्यादींची उपलब्धता थांबवण्याचे आणि स्थानिक लोकांपासून त्यांचे अंतर वाढवण्याचे प्रयत्नही करण्यात आले आहेत; परंतु या दिशेने विशेष यश मिळालेले नाही. जोपर्यंत व्यावहारिक तोडगा निघत नाही, तोपर्यंत या समस्येवर मात करणे कठीणच राहणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून नक्षलवाद्यांचा धुडगुस सुरू आहे; पण त्यावर अंकुश ठेवण्यात केंद्र सरकारला यश आलेले नाही. एकीकडे आपण विकासकामांच्या आणि देश विकसित करण्याच्या दिशेने जात असताना देशात अनेक अंतर्गत विषय कायमच आहेत. दहशतवाद आणि नक्षलवादाने देशाची खूपच हानी केलेली आहे. पूर्वोत्तर राज्यांतही दहशतवादाने थैमान घातले आहे. जोपर्यंत याला आळा घातला जात नाही आणि त्यावर ठोस कारवाई केली जात नाही, तोपर्यंत त्यांचा उच्छाद सुरू राहील.

Back to top button