धायरी गावठाणात रस्त्यांची कामे अर्धवट; नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त | पुढारी

धायरी गावठाणात रस्त्यांची कामे अर्धवट; नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त

धायरी : पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रस्त्यावरील धायरी गावातील श्रीखंडोबा मंदिर रस्ता, अंबाईदरा रस्ता, धनगर वस्ती रस्ता, पार्वती विश्व रस्ता आदी चार रस्त्यांची कामे रखडल्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. ही सर्व कामे साधारणतः एक कोटी रुपयांची आहेत. अधिकारी व ठेकेदार यांच्या हलगर्जीपणामुळेच या कामात मोठी दिरंगाई झाल्याचे येथील नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. तसेच महापालिकेच्या वतीने या कामासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला एक कोटी रुपयांचा निधी वाया गेला आहे. येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी संपूर्ण रस्ता जेसीबीने उकरण्यात आला आहे.

तर काही ठिकाणी रस्ता उकरून त्यावर फक्त खडी टाकण्यात आली आहे. त्यामुळे येथून जाताना नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वाहनचालकांना वाहन चालवताना मोठा मनस्ताप होत आहे. येथून दुचाकी चालवणे अवघड होऊन बसले आहे. ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी या अर्धवट रस्त्याच्या कामामुळे वैतागून गेले आहेत.  एकंदर येथील नागरिकांचा सुखाचा जीव दुःखात व संकटात गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आगीतून उठून फुफाट्यात पडण्याची येथील नागरिकांवर वेळ आली आहे. याबाबत संबंधित महापालिका अधिकारी यांना संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

हेही वाचा

Back to top button