पुणे-सातारा महामार्गावर चक्का जाम.. | पुढारी

पुणे-सातारा महामार्गावर चक्का जाम..

नसरापूर : पुढारी वृत्तसेवा : पुणे-सातारा महामार्गावरील शिवरे येथील उड्डाणपुलाचे काम संबंधित ठेकेदाराकडून नियोजनशून्य होत असल्याने पुणे-सातारा महामार्गावर तीन किलोमीटर वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या. पुणे बाजूकडे जाणार्‍या रस्त्यावर वाहतूक कोंडीत भर पडली होती. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत वाहतूक संथगतीने सुरू असल्याने प्रवाशी त्रस्त झाले होते.
महामार्गावरील शिवरे (ता. भोर) येथील उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. रविवारी (दि. 31) पुण्याकडे निघालेल्या प्रवाशांच्या वाहनांची महामार्गावरील मोठी गर्दी होती. उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने दोन्ही बाजूचे महामार्ग बंद करून वाहतूक सेवा रस्त्यावर वळविण्यात आली आहे; मात्र, सेवा रस्त्यावर मोठा गतिरोधक टाकल्याने वाहनांचा वेग सावकाश होत आहे.

अचानक वाहने थांबली जात असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. वर्वे ते खोपी-बोरमाळपर्यंत वाहनाच्या लांब रांगा लागून वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. जोडून आलेल्या सुट्या संपल्याने चाकरमानी पुणे, मुंबईकडे जाण्यासाठी बाहेर पडले होते. त्यातच उड्डाणपुलाचे काम सुरू करणार्‍या ठेकेदाराकडून कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना न केल्याने वाहतूक कोंडीत रोजच भर पडत आहे. या वेळी अवजड वाहने, एसटी बस, ट्रक, खासगी कार, दुचाकी अशी वाहने खचाखच रस्त्यावर खोळंबली होती. तब्बल 10 तासांहून अधिक काळ वाहतूक संथगतीने सुरू असल्याने प्रवाशासह, लहान मुले हैराण झाली होती.

रुग्णवाहिकादेखील अडकल्या

पुणे-सातारा महामार्गावर वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली असून, याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. रविवारच्या वाहतूक कोंडीत दोन रुग्णवाहिका खोळंबल्या होत्या. यामुळे रुग्णांचा जीव गेल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल होत आहे.

हेही वाचा

Back to top button