पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे वेधशाळेचे हवामान विभागप्रमुख हवामान शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी हे रविवारी (दि.31) भारतीय हवामान विभागात 32 वर्षे सेवा देऊन निवृत्त झाले. सर्व कर्मचारी, अधिकार्यांनी त्यांना निरोप दिला. उत्तम समन्वयक, मनमिळाऊ अधिकारी म्हणून ते या विभागात प्रसिद्ध होते. दरम्यान, त्यांचा पदभार डॉ. मेधा खोले घेणार असल्याची चर्चा या विभागात आहे. मात्र, अजून त्यांच्या नियुक्तीची घोषणा झाली नाही. डॉ. कश्पयी यांनी 31 मार्च रोजी रविवार असूनही त्यांनी सुटी न घेता पूर्णवेळ काम करत आपला शेवटचा दिवस याच सेवेत घालवला.
डॉ. कश्यपी यांचा पदभार कोणाकडे दिला, याबाबत मात्र अधिकृत माहिती या विभागाने अजून दिलेली नाही. मात्र, यापूर्वीच्या हवामान विभागप्रमुख डॉ. मेधा खोले यांच्याकडे पुन्हा हा पदभार दिला जाऊ शकतो, अशी चर्चा या विभागातील कर्मचारी वर्गात गेला आठवडाभरापासून सुरू आहे.
मी सेवानिवृत्त झालो तरी हवामानतज्ज्ञ म्हणून काम करत राहणार आहे. अजून दहा वर्षे म्हणजे सत्तरीपर्यंत मी समाजासाठी काम करणार आहे. पश्चिम बंगालमधून मी 1992 मध्ये पुणे शहरात आलो होतो. शहराने मला खूप प्रेम दिले. पुणे आवडल्याने मी येथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे.
-डॉ. अनुपम कश्यपी, हवामान विभागप्रमुख, पुणे वेधशाळा
हेही वाचा