महाराष्ट्रावर जलसंकट : मराठवाड्याच्या घशाला कोरड | पुढारी

महाराष्ट्रावर जलसंकट : मराठवाड्याच्या घशाला कोरड

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : पाऊस सरासरीपेक्षा किंचित कमी झाला, तरीही मार्चपासूनच मराठवाड्यात टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी चार जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात 763 टँकर सुरू करण्यात आले आहेत. मागेल त्याला टँकर असे महसूल खात्याचे धोरण नाही. त्यामुळे गरजेपेक्षा किती तरी कमी प्रमाणात टँकर सुरू करण्यात आले आहेत. परिणामी, जूनपर्यंत या तीव्र होत जाणार्‍या झळा सोसण्याखेरीज लोकांपुढे पर्याय उरलेला नाही. ‘हर घर जल’ योजनेचा लाभ घरोघरी पोहोचलेला नसल्यामुळे किमान दोन जिल्ह्यांतील लोकांना सकाळपासूनच पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

गतवर्षी जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या चार महिन्यांत मराठवाड्यात सरासरीच्या 85.58 टक्के पाऊस पडला. जुलै आणि सप्टेंबरमध्ये तो सर्वाधिक म्हणजे, अनुक्रमे 146.4 आणि 119.9 टक्के पडला. त्यामुळे पावसाअभावी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली, असे मानण्यास वाव नाही.

नांदेड जिल्ह्यात 108.44 टक्के, तर संभाजीनगरात 90.13 टक्के पाऊस पडला आहे, तरीही संभाजीनगर जिल्ह्यात 240 गावे आणि 45 वाड्यांमध्ये सर्वाधिक 385 टँकर सुरू झाले आहेत. नांदेड जिल्हा मात्र अजून टंचाईच्या झळांपासून दूर आहे. परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्हेही टँकरपासून दूर आहेत. म्हणजेच तेथे लहान-मोठे तलाव आणि विहिरींमध्ये पिण्यापुरते पाणी शिल्लक आहे.

धरणांमधील पाणी अन् जमिनीतील आर्द्रता वेगाने घटतेय…

फेब्रुवारीपासून तापत गेलेल्या वातावरणामुळे धरणांमधील पाणी आणि जमिनीतील आर्द्रता वेगाने घटत चालली असून, टंचाईमागील हेच एक प्रमुख कारण आहे. मार्चअखेरपर्यंत छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील पाणी प्रश्नाने उग्र रूप धारण केले आहे. त्यातही संभाजीनगर, फुलंब्री, पैठण, गंगापूर आणि वैजापूर तालुक्यांत परिस्थिती गंभीर आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर, भोकरदन, जालना आणि घनसावंगी तालुक्यांत प्रत्येकी 25 ते 40 गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जूनपर्यंत या संख्येत भर पडणार आहे.

भूजल पातळी खालावली

मराठवाड्यातील केवळ संभाजीनगर जिल्ह्याची भूजल पातळी महसूल विभागातून उपलब्ध झाली आहे. त्यानुसार सर्वाधिक खालावलेली पाणी पातळी खुलताबाद तालुक्यात 13.58 मीटर एवढी आहे. जायकवाडी जलाशय जेथे आहे, त्या पैठण तालुक्यातील पातळी 11.83 मीटरपर्यंत, तर वैजापूर (13.38 मी.), कन्नड (11.09 मी.), गंगापूर (10.96), फुलंब्री (10.71 मी.), सिल्लोड (10.71 मी.) येथील भूजल पातळी खालावली आहे. सोयगाव तालुक्यातील भूजल पातळी मात्र 6.9 मी. आणि संभाजीनगर तालुक्यातील 8.91 एवढीच खालावली आहे. जिल्ह्याची सरासरी पाणी पातळी 10.44 मीटरने खालावली आहे. शेती, पिण्यासाठी बेसुमार उपसा आणि कोरड्या हवामानामुळे पाणी पातळी खालावत चालली असून, विहिरीदेखील तळ गाठत आहेत.

Back to top button