Loksabha election : केंद्रीय पथकाचे काँग्रेसच्या नेत्यांवर लक्ष : काय आहे प्रकरण? | पुढारी

Loksabha election : केंद्रीय पथकाचे काँग्रेसच्या नेत्यांवर लक्ष : काय आहे प्रकरण?

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची पुनरावृत्ती लोकसभा निवडणुकीत करून भाजप महायुतीच्या उमेदवाराचा पराभव करण्याची तयारी काँग्रेसकडून सुरू आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला काँग्रेसमधूनच धोका होण्याचा अहवाल काँग्रेसच्या वरिष्ठांना मिळाला आहे. त्यानुसार काँग्रेसचे केंद्रीय पथक पुण्यात आले असून ते काँग्रेसच्या नेत्यांवर लक्ष ठेवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लोकसभेची निवडणूक रंगणार आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि मराठा समाज यांचे उमेदवार रंग भरणार आहेत. मात्र, पुणे शहराचा विचार करता महायुती व महाविकास आघाडी वगळता इतरांनी आपले उमेदवार जाहीर केले नाहीत. उमेदवार जाहीर झाल्यानंतर भाजप आणि काँग्रेसमधूनही स्वपक्षाच्या उमेदवाराबद्दल नाराजीचे सूर निघू लागले आहेत.

महाविकास आघाडीमध्ये पुणे लोकसभा काँग्रेसच्या वाट्याला असल्याने कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. धंगेकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या उमेदवारीला पक्षातूनच विरोध झाला. अद्यापही प्रमुख पदाधिकार्‍यांचे मनोमिलन होताना दिसत नाही. कसबा पोटनिवडणुकीची पुनरावृत्ती होऊन भाजप महायुतीच्या उमेदवाराचा पराभव होऊ शकेल, असे वातावरण शहरात आहे. मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवारास स्वकीयांकडून म्हणजेच काँग्रेसच्याच नेत्यांकडून दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी मनापासून एकत्र नसल्याचे निदर्शनास येत असल्याने काँग्रेसच्या केंद्रीय पातळीवरून याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. केंद्रीय पातळीवरून आठ ते नऊ लोकांचे विशेष निरीक्षक पथक पुण्यात पाठवण्यात आले आहे. या पथकाकडून काँग्रेसचा उमेदवार निवडून येण्यासाठी कोणकोणत्या घटकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, याची माहिती संकलित करून ती केंद्रीय पातळीवर पाठवली जाणार आहे. तसेच हे पथक काँग्रेसच्या नेत्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणार असून केंद्रीय पातळीवरून येणार्‍या सूचनांनुसार स्थानिक पातळीवरील पदाधिकार्‍यांना काम करावे लागणार असल्याचे काँग्रेसच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
या पथकामधील बहुसंख्य सदस्य उत्तर भारतीय असून हे पथक पुण्यात स्थायिक झालेल्या उत्तर भारतीय मतदारांना काँग्रेसकडे वळवण्यासाठी प्रयत्न करणार असून काँग्रेसमधील नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठीही प्रयत्न करणार आसल्याचे सांगण्यात येते.

हेही वाचा

Back to top button