केंदूरसह दुष्काळग्रस्त गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडवणारच : अजित पवार

केंदूरसह दुष्काळग्रस्त गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडवणारच : अजित पवार

केंदूर : पुढारी वृत्तसेवा : शिरुरमधील बारा गावांचा दुष्काळ अजित पवारच संपवणार, मात्र मतदार बंधूंनो, आमच्या मताधिक्यात बिलकुल हयगय नको, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीचे शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिरुरच्या खासदारपदी मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन केले.अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे दुष्काळग्रस्त बारा गावच्या ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र केंदूर येथे पहायला मिळाले. महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ केंदूरच्या श्रीराम चौकात आयोजित सभेत ते बोलत होते.

आमदार मेघना बोर्डीकर-साकोरे, पुणे जिल्हा दुध संघाच्या माजी अध्यक्षा केशरताई पवार, जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्षा जयश्री पलांडे, भिमाशंकरचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, माजी सभापती प्रकाश पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुर-आंबेगाव विधानसभेचे तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, उपसभापती सविता पर्‍हाड, प्रमोद पर्‍हाड, सविता बगाटे,सरपंच अमोल थिटे, माजी सरपंच सुवर्णा थिटे, सतीश थिटे, भगवानराव शेळके, चंदन सोंडेकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजित पवार पुढे म्हणाले की, बारा गावांच्या दुष्काळाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्ग काढला आहे.

कारण या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आणि आपले लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांनी ही प्रयत्न केलेले असल्याने या प्रश्नाबाबत सर्वेक्षणाचे आदेश ही झालेले आहेत.त्यामुळे तुम्ही एकच करा आढळरावांना मताधिक्याने निवडून आणा,बारा गावांचा दुष्काळ मी संपवणारच आत्ताच हा शब्द देतो. ते पुढे म्हणाले की, पूर्वीचा बारामती आणि आताचा शिरुर हा मतदारसंघ असा आढावा मी लक्षात घेतला सन 1992 मध्ये येथे खासदार राहील्याने येथील सर्व प्रश्न मला ज्ञात आहेत.मूळचे केंदूर येथील असलेले माजी गृहमंत्री बापूसाहेब थिटे यांच्या आठवणींना देखील पवार यांनी उजाळा दिला.सूत्रसंचालन राम साकोरे यांनी तर अमोल थिटे यांनी आभार मानले.

पाणी प्रश्नासाठी पाठपुरावा हवा : मेघना बोर्डीकर-साकोरे

मेघना बोर्डीकर-साकोरे म्हणाल्या की, या भागातील दुष्काळ, येथील पाणी प्रश्न याकरिता वळसे पाटील आणि आढळरावांसह देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठका झालेल्या आहेत. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी थोडा पाठपुरावा व्हावा ही अपेक्षा आहे.

शरद पवार यांच्याकडून निर्णयच नाही

अजित पवार म्हणाले की ,सन 2004 मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाची संधी असतानाही ती शरद पवार यांनी नाकारली. सोनिया गांधीचा विदेशी असल्याचा मुद्दा पुढे करीत त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. पुढे सन 2019 मध्ये भाजपा सोबत जायचे ठरले तेव्हाही त्यांनी माघार घेतली. शरद पवार यांच्याकडून निर्णय होत नाही,धरसोड होते यामुळे मी शेवटी भाजपासोबत जावून सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला आणि 72 तास उपमुख्यमंत्रीही झालो. मात्र राजकीय निर्णयांमध्ये धरसोडवृत्ती घातक असल्याचे मी त्यांना सांगूनही साहेबांचा हट्ट काही संपत नव्हता.

मी त्यांचा मुलगा असतो तर असे निर्णय त्यांनी घेतले असते का याचे उत्तर मलाही समजत नाही.या सर्व घडामोडींना वैतागुनच अखेर मी निर्णय घेतला व आज तुमच्यापुढे उभा आहे. वयाच्या साठीनंतर तरी आम्हाला आमचे निर्णयाचे स्वातंत्र यामुळे मिळाले पण अशा स्थितीत निवडणूकीच्या वातावरणात इथले वातावरणही भावनिक करण्याचा प्रयत्न होईल.मात्र तुम्ही तसे काही होवू देवू नका. बारामतीत मोठ्या फरकाने आम्ही विजयी होणार हा आत्मविश्वास आहेच,शिरुरमध्येही असे व्हावे यासाठी आपण निर्णय घ्या म्हणत अजित पवारांनी मतदारांना मताधिक्य देण्याचे आवाहन केले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news