Lok Sabha Election 2024: ठाकरे गटाने उमेदवारांची यादी जाहीर करताच काँग्रेसची नाराजी | पुढारी

Lok Sabha Election 2024: ठाकरे गटाने उमेदवारांची यादी जाहीर करताच काँग्रेसची नाराजी

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीत अद्यापही रस्सीखेच सुरू आहे. सांगली आणि मुंबईच्या लोकसभा जागेवरून काँग्रेसने जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. जागा वाटपांची चर्चा सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाने सांगली आणि मुंबई येथील उमेदवाराची घोषणा केली आहे. हे योग्य नाही, अशी नाराजी काँग्रेस नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आघाडी धर्म पाळणे सर्वांची जबाबदारी आहे, असे सांगून ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. Lok Sabha Election 2024

उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. ज्यामध्ये सांगली आणि मुंबईतील ज्या जागांवर चर्चा सुरू होती, तेथीलही उमेदवार जाहीर केले. जेव्हा आम्ही त्या प्रलंबित जागांच्या संदर्भाने चर्चेमध्ये आहोत, काँग्रेसची त्या जागांचा बाबत आग्रही मागणी आहे, अजूनही त्यावर तोडगा निघालेला नाही, असे असतानाही त्या जागांवरून उमेदवार जाहीर करणे हे योग्य नाही. आघाडी धर्माचे पालन सगळ्यांनीच केले पाहिजे असे माझे मत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, शिवसेनेने या जागांवर फेरविचार करावा, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.Lok Sabha Election 2024

 महाविकास आघाडीचा जागावाटप चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी दोन जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. आघाडी धर्म पाळला असता तर बरे झाले असते. चर्चा सुरू असताना उमेदवार घोषित करणे, हे आघाडी धर्माला गालबोट लागले, यावर त्यांनी पुनर्विचार करावा, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने १७ उमेदवारांची यादी जाहीर (Lok Sabha Elections 2024)

लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने १७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. रायगडमधून अनंत गिते यांना तर सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. (Lok Sabha Elections 2024) सांगलीच्या जागेवर काँग्रेसने दावा केला असतानाही येथून ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
सांगलीत सामना रंगणार

चंद्रहार पाटील यांना ठाकरे शिवसेना गटाने सांगली लोकसभा रिंगणात उतरवले आहे. सांगली मतदारसंघात काँग्रेसचे विशाल पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाचे पैलवान चंद्रहार यांच्यात धूमशान सुरू आहे. काँग्रेसने ही जागा आपणच लढणार, असे पुन्हा पुन्हा सांगितल्याने तिढा निर्माण झाला आहे.

भाजपने पहिल्या यादीतच सांगलीतून विद्यमान खासदार संजय पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. महाविकास आघाडीत मात्र जागेसाठी रस्सीखेच पाहायला मिळाली. कोल्हापूरची आमची जागा काँग्रेसला सोडली असे सांगून, त्याबदल्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सांगलीच्या जागेवर दावा ठोकला आणि आता सांगलीतून चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणाही ठाकरे गटाने केली आहे.

हेही वाचा 

Back to top button