बलुचींचा प्रकोप ! | पुढारी

बलुचींचा प्रकोप !

पाकिस्तानात शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले असले, तरी ते दुबळे असल्याचे त्या पक्षातील ज्येष्ठ नेतेच जाहीरपणे सांगत आहेत. पाकिस्तानातील तालिबानी दहशतवादी अफगाणिस्तानात लपून बसले आहेत, अशी माहिती मिळताच पाक लष्कराने तेथे हवाई हल्ले केले. त्याला अफगाणिस्तानमधून प्रत्युत्तर दिले गेले. या दोन देशांच्या सीमाभागात तणाव निर्माण झाला असून, तो मिटता मिटत नाही.

3 नोव्हेंबर, 2023 रोजी बलुचिस्तानमधील ग्वादर जिल्ह्यात पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला झाला आणि त्यात 14 सैनिक ठार झाले. त्यापूर्वी खैबर पख्तुनख्वामधील डेरा इस्माईल खानमध्ये सुरक्षा दलांना लक्ष्य करत बाँबस्फोट केले गेले. त्यात पाच सैनिक ठार झाले. दहशतवाद्यांचे दुष्ट हेतू यशस्वी होऊ देणार नाही, अशी गर्जना तेव्हाचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर-उल-हक-काकर यांनी केली होती; परंतु त्या पोकळ गर्जनांचा काहीही उपयोग झाला नाही. पाकच्या व्यापारासाठी महत्त्वाचे बंदर ग्वादरवर नुकताच हल्ला होऊन, त्यात 8 बलुच हल्लेखोर आणि दोन सुरक्षारक्षक मारले गेले. ग्वादर बंदर प्रधिकरणाच्या आवारात घुसून दहशतवादी हल्ला करतात, याचा अर्थ पाकिस्तानमधील सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत.

आठही दहशतवाद्यांचा खात्मा केला गेला असला, तरी आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या द़ृष्टीने मोक्याचे असलेले बंदर लक्ष्य करण्यात आले, हे नोंदवण्यासारखे आहे. बंदी घातलेल्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीशी (बीएलए) संबंधित असलेल्या माजिद ब्रिगेडने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. ग्वादर बंदरात चीनच्या भागीदारीत विविध कामे सुरू आहेत. चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हच्या महाप्रकल्पाअंतर्गत या बंदराचा विकास केला जात आहे. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरच्या द़ृष्टीने बंदराचे विशेष महत्त्व आहे. या बंदरावर मोठ्या संख्येने चिनी कर्मचारी काम करत आहेत. त्यामुळे चिनी कर्मचार्‍यांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेचा विषय बनला आहे. मुळात चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरसाठी या देशाने प्रचंड कर्जे उचलली आहेत. देशाला आर्थिक पातळीवर पूर्णत: पंगू करून सोडणार्‍या या प्रकल्पाने पाकिस्तानचा शेवटचा घास घ्यायचे बाकी आहे. प्रकल्पाची गती मंदावल्याने त्यासाठी चीनने देशाला अनेकदा धारेवर धरले आहे.

संबंधित बातम्या

आता या प्रकल्पातच बाधा आल्यास, देशाच्या आर्थिक दिवाळखोरीत आणखीच वाढ होईल आणि ती आता रोखणे कोणाच्याच हाती राहणार नाही. माजिद ब्रिगेडने यापूर्वी पाकिस्तानच्या आयएसआय तसेच लष्करी गुप्तचर यंत्रणेच्या कार्यालयांवर हल्ले चढवले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी ‘बीएलएफ’ने 10 लष्करी वाहनांच्या ताफ्यावर केच येथे हल्ला चढवला होता. गेल्या दोन वर्षांत बलुच घुसखोरी व आक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले. बलुच दहशतवादी गटांची शस्त्रसज्जता वाढली असून, ते वारंवार पाक सरकारला अंगावर घेत आहेत. बीएलए, बीएलएफ, बलुच नॅशनलिस्ट आर्मी आणि बलुच रिपब्लिकन गार्ड यांनी मिळून ‘बलुच राजी अजोई संगर’ ही एक शिखर संघटना सहा वर्षांपूर्वी स्थापन केली. संघटनेने 2023 मध्येच 612 हल्ले घडवून, 600 सैनिकांचे प्राण घेतले. बीएलएने तर क्वेट्टा येथे एक लष्करी केंद्रच ताब्यात घेतल्याची घटनाही ताजी आहे.

गेल्या वर्षी बलुचिस्तानच्या हद्दपार पंतप्रधान नेला कादरी यांनी भारतास भेट दिली होती. हरिद्वार येथील व्हीआयपी घाटावर त्यांनी गंगेची आरती करताना बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य लढ्याला यश मिळावे, अशी प्रार्थना केली. पाकने बलुचिस्तानचा प्रदेश जबरदस्तीने बळकावला असून, त्याच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही संयुक्त राष्ट्रात आवाज उठवला आहे, या मागणीस भारताने पाठिंबा देण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. बलुचिस्तान एकेकाळी स्वतंत्र होता; पण पाकने तो बळकावला. तेथील समृद्ध खनिज संपत्तीची पाक लूट करत असून, बलुची लोकांची घरे जाळली जात आहेत आणि तिथल्या तरुण मुलींवर अत्याचार केले जात आहेत, असा बलुच बंडखोरांचा आरोप आहे. या अत्याचारी कृत्यांना चीनचा पाठिंबाच आहे; मात्र भारतात नरेंद्र मोदींचे सरकार आल्यानंतर त्यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याबाबत आवाज उठवला.

पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तानमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचेही त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते. बलुचिस्तानात आज हजारो पुरुष बेपत्ता होत आहेत. अनेकांचे अपहरण करून त्यांना ठार मारले जात आहे. गेल्या ऑक्टेबरमध्ये बालच मौला बक्ष हा 24 वर्षांचा बलुच तरुण बेपत्ता झाला आणि त्याचा शोध लागेना. त्यावेळी अभूतपूर्व आंदोलन झाले आणि त्याच्या परिणामी न्यायालयाने आदेश दिल्यानंतर दहशतवादविरोधी अधिकार्‍यांवर प्राथमिक गुन्हा दाखल केला गेला; परंतु त्यानंतर पुढे कोणतीही कारवाई झाली नाही. ‘बलुच यकजेहती समिती’च्या प्रमुख नेत्या महरंग बलुच यांच्या पित्याचा एन्काऊंटर करण्यात आला. त्यानंतर महिलांनी महरंग यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली. महिला गटाने डिसेंबरमध्ये इस्लामाबादेत तेथील नॅशनल प्रेस क्लबसमोर धरणे धरले.

पाकिस्तानात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या दरम्यान महरंग बलुच यांच्या स्वागतासाठी महारॅली काढली गेली. ही सभा पाकिस्तानमधील कोणत्याही राष्ट्रीय पक्षाच्या सभांपेक्षा मोठी होती. महिला निदर्शकांना सरकारकडून योग्य वागणूक मिळाली नाही. त्यामुळे संतापलेल्या बलुच दहशतवाद्यांनी पाक सुरक्षा दलांवर एकापाठोपाठ एक दहशतवादी हल्ले सुरू केले. केवळ बलुचिस्तानच नव्हे, तर खैबर पख्तुनख्वामध्येही चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरचे काम सुरू असून, या हल्ल्यांमुळे ते धोक्यात आले आहे. इराण-पाकिस्तान गॅस पाईपलाईनही संकटात सापडू शकते. ग्वादर बंदराची सुरक्षा धोक्यात आल्यास, इराणमधील चाबहार बंदराचा व्यापार अधिक वाढेल. अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवट बलुच बंडखोरांना समर्थन देत असल्याचा आरोप पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी केला आहे. इराणने अलीकडे जेव्हा बलुचिस्तानात हवाई हल्ले केले, तेव्हा पाकने त्याला उत्तरही दिले. पाकिस्तानचे केवळ भारताशीच नाही, तर इराण व अफगाणिस्तानशीसुद्धा चांगले संबंध नाहीत. दहशतवाद्यांना पोसून भारतविरोधी कारवाया करणार्‍या पाकिस्तानला आता दहशतवाद्यांकडून स्वतःचाच बचाव करण्याची वेळ आली आहे!

Back to top button