Hingoli Lok Sabha Election 2024 : हिंगोली लोकसभा निवडणूक: भाजपच्या आग्रहाला शिंदे गटाचा कोलदांडा | पुढारी

Hingoli Lok Sabha Election 2024 : हिंगोली लोकसभा निवडणूक: भाजपच्या आग्रहाला शिंदे गटाचा कोलदांडा

हिंगोली : पुढारी वृत्तसेवा : महायुतीमध्ये हिंगोली लोकसभेच्या जागेवरून भाजप व शिंदे गटामध्ये रस्सीखेच सुरू आहे. अद्यापही हिंगोलीबाबत निर्णय झाला नाही. बुधवारी भाजपच्या शिष्टमंडळाने शेवटचा प्रयत्न म्हणून एकोप्याने थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हिंगोली लोकसभा भाजपला सोडण्याची विनंती केली होती. तर दुसरीकडे शिंदे गटाने आपला दावा कायम ठेवून शनिवारपासून शिवसेनेच्या उपनेत्यांच्या उपस्थितीत संपूर्ण मतदार संघात संवाद मेळावा कार्यक्रम हाती घेतल्याने भाजपच्या आग्रहाला शिंदे गटाकडून कोलदांडा दिल्याची चर्चा आहे. Hingoli Lok Sabha Election 2024

महाविकास आघाडीकडून हदगावचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांची उमेदवारी जवळपास निश्‍चित असल्याचे बोलले जात आहे. परंतु, महायुतीमध्ये शिंदे गट व भाजपमध्ये चुरस निर्माण झाली आहे. शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनी थेट मुंबई येथे तळ ठोकून कोणत्याही परिस्थितीत आपला पत्ता कट होऊ नये, यासाठी फिल्डींग लावली असतानाच बुधवारी भाजपच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जागा भाजपला सोडण्याचा आग्रह केला. विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात नाराजी असल्याचा दावाही शिष्टमंडळातील पदाधिकार्‍यांनी फडणवीस यांच्यासमोर केला. त्यामुळे भाजपमधील इच्छुकांच्या नजरा आता पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लागल्या आहेत. Hingoli Lok Sabha Election 2024

शिष्टमंडळ हिंगोलीत दाखल होण्यापूर्वीच शिंदे गटाकडून लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेचे उपनेते आनंदराव जाधव यांचा दौरा जाहीर करत ते दोन दिवस संपूर्ण मतदार संघात संवाद मेळाव्याच्या माध्यमातून संघटनेच्या पदाधिकार्‍यांशी संवाद साधणार आहेत. 23 मार्च रोजी हदगाव, उमरखेड, किनवट तर 24 मार्च रोजी कळमनुरी, वसमत, हिंगोली मतदार संघातील पदाधिकार्‍यांशी संवाद मेळाव्याच्या माध्यमातून मोर्चेबांधणी करणार आहेत. यावेळी कळमनुरीचे आमदार तथा जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांची देखील उपस्थिती राहणार आहे. एकीकडे भाजपने हिंगोली लोकसभेसाठी जोरबैठका सुरू केल्या असताना दुसरीकडे शिंदे गटानेही आपला दावा मजबूत असल्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.

Hingoli Lok Sabha Election 2024 : वेगवेगळ्या चर्चेने इच्छुक गोंधळात

मागील पंधरा दिवसांपासून महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटला नसल्याने हिंगोली लोकसभेसाठी भाजपमधून इच्छुक असलेल्या इच्छुकांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी शिंदे गटालाच जागा कायम ठेवून उमेदवार बदलला जाणार असल्याची चर्चा होती. तर पुन्हा मागील दोन दिवसांपासून हिंगोलीची जागा भाजपकडे जाणार अशी चर्चा वेगाने सुरू झाली. ही चर्चा सुरू असतानाच भाजपच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घेतलेली भेट चर्चेची ठरली. शुक्रवारी मात्र शिंदे गट व भाजपला समसमान संधी असल्याच्या चर्चा झडू लागल्या. त्यामुळे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या समर्थकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे भाजपतील इच्छुकांची आशा अजूनही कायम असल्याचे चित्र आहे. एकंदरीत हिंगोली लोकसभेवरून शिंदे गट व भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येते.

हेही वाचा 

Back to top button