हिंगोली : मराठा आरक्षणासाठी तरूणाने जीवन संपवले; आतापर्यंत जिल्‍ह्यात १३ घटना | पुढारी

हिंगोली : मराठा आरक्षणासाठी तरूणाने जीवन संपवले; आतापर्यंत जिल्‍ह्यात १३ घटना

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील माळसेलू येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाने जीवन संपवल्‍याची घटना काल (मंगळवार) रात्री उघडीकस आली. विलास श्रीराम वामन (वय 29) असे या तरुणाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी अद्याप हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झालेली नाही.

माळसेलू येथील विलास वामन हा तरुण पदवीधर आहे. मागील काही दिवसांपासून तो एका खासगी दवाखान्यात काम करत होता. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात तो सक्रीय होता. समाजाला आरक्षण मिळत नसल्याने तो मागील काही दिवसांपासून अस्वस्थ होता.
दरम्यान, मंगळवारी दुपारी चार वाजता तो वडिलांना कडती फाटा येथे सोडण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. त्याचे वडिल रात्री घरी आल्यानंतर विलास घरी आलाच नसल्यानचे लक्षात आले. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी तसेच गावकऱ्यांनी त्याचा शोध सुरु केला. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्याची दुचाकी शेतात आढळून आली. त्यानंतर परिसरात पाहणी केली असता त्याचा मृतदेह एका झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय रामोड, जमादार अनिल डुकरे, आकाश पंडीतकर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने विलास याचा मृतदेह खाली काढला. त्याच्या खिशात मराठा आरक्षणासाठी जीवन संपवत असल्याची चिठ्ठी आढळून आली आहे. मराठा आरक्षणासाठी जीवन संपवल्‍याची ही हिंगोली जिल्हयातील तेरावी घटना आहे. या प्रकरणी अद्याप पर्यंत हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही. दरम्यान, मृत विलास यांच्या पश्‍चात आई, वडिल, पत्नी, एक मुलगा असा परिवार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

हे ही वाचा :

Back to top button