हिंगोली लोकसभा भाजपकडे येण्यासाठी प्रयत्न सुरु; सागर बंगल्यावर धडकलेल्या शिष्टमंडळाला फडणवीस यांचे आश्वासन | पुढारी

हिंगोली लोकसभा भाजपकडे येण्यासाठी प्रयत्न सुरु; सागर बंगल्यावर धडकलेल्या शिष्टमंडळाला फडणवीस यांचे आश्वासन

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : हिंगोली लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाला जागा सोडण्याचे जवळपास निश्‍चित झाल्याचे बोलले जात आहे. केवळ उमेदवार जाहीर करण्याची औपचारिकता बाकी आहे. परंतु महायुतीमध्ये मात्र जागा वाटपाचा गुंता अद्यापही सुटला नसल्याचे चित्र आहे. गुरूवारी (दि. २१) भाजपच्या जम्बो शिष्टमंडळाने थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत हिंगोली लोकसभा मतदार संघ भाजपला सोडवून घेण्याची आग्रही मागणी केल्याने शिंदे गटाच्या मनसुब्यावर पाणी फेरल्याचे दिसून आले. एकूणच हिंगोली लोकसभेचा सस्पेन्स कायम असल्याचे दिसून येते.

मागील दोन वर्षापासून भाजपने प्रवास योजनेच्या माध्यमातून हिंगोली लोकसभा मतदार संघात संघटन बांधणी केली. अनेक केंद्रीय मंत्र्यांसह राज्यातील भाजपच्या नेत्यांनी हिंगोलीवर लक्ष केंद्रीत केले. त्यामुळे भाजपच हिंगोली लोकसभा मतदार संघ लढविणार यावर सातत्याने चर्चा होत आली. भाजपकडूनच अप्रत्यक्षपणे शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात सामान्य जनतेत नाराजी असल्याचे चित्र रंगविण्यात आले. त्यामुळे काही प्रमाणात खासदार हेमंत पाटील बॅकफुटवर गेल्याचे चित्र होते. परंतु मध्यंतरी शासन आपल्या दारीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हेमंत पाटील यांनी पुन्हा कमबॅक करीत हिंगोली लोकसभा मतदार संघावरील शिंदे गटाचा दावा मजबूत केला होता. मध्यंतरी हिंगोलीची जागा शिंदे गटालाच ठेवून उमेदवार बदलल्याची चर्चाही झडली. भाजपमधील काही इच्छुकांची नावे शिंदे गटाकडून चर्चित आली. परंतु मागील दोन दिवसात ते पेल्यातील वादळ ठरले. भाजपने माघार घेतल्याची चर्चा असतानाच गुरूवारी मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी भाजपचे जम्बो शिष्टमंडळ थेट सागर बंगल्यावर धडकले. या शिष्टमंंडळात आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष गजानन घुगे, लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर, माजी खासदार शिवाजी माने, रामराव वडकुते, उमेश नागरे, मिलींद यंबल, श्रीकांत पाटील, कैलास काबरा, संतोष टेकाळे यांचा समावेश होता. सकाळपासून शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीच्या प्रतिक्षेत होते. सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास फडणवीस यांनी शिष्टमंडळातील पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. पहिल्यांदाच शिष्टमंडळात एकोपा दिसून आला. इच्छुकांसह पक्षसंघटनेतील पदाधिकारीही शिष्टमंडळात सहभागी झाल्याचे दिसून आले.

अन् फडणवीस म्हणाले एकसंघ असल्याचा आनंद आहे

भाजपच्या जम्बो शिष्टमंडळास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सव्वाचारच्या भेटीची वेळ दिली होती. अत्यंत व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सव्वा पाचच्या सुमारास शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतले. हिंगोलीतील भाजप एकसंघ असल्याचा मला आनंद आहे. मला संपूर्ण माहिती आहे. माझा हिंगोली लोकसभा भाजपसाठी सोडवून घेण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न राहील असे सांगून शिष्टमंडळाला आश्‍वास्त केले. परंतु त्यांनी ठामपणे मात्र काही सांगितले नाही.

Back to top button